You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया - युक्रेन युद्ध : इव्हानो, फ्रँकिव्हस्क आणि नीप्रोवर हल्ले
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा 16वा दिवस आहे. रशियन सैन्याने युक्रेनमधल्या नवीन शहरांवर हल्ले केले आहेत. रशियन सैन्याच्या या हल्ल्यात युक्रेनमधल्या सैनिकांपेक्षा अधिक नागरिक मारले गेले असल्याचं युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटलंय.
युक्रेनमधील लुत्सक, इव्हानो-फ्रँकिव्हस्क या शहरांसोबत नीप्रो शहरावरही रशियन फौजांनी पहिल्यांदाच हल्ला केलाय.
रशियन सैन्याच्या या हल्ल्यात युक्रेनमधल्या सैनिकांपेक्षा अधिक नागरिक मारले गेले असल्याचं युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेझ्निकोव्ह म्हणाले आहेत.
रशियन हल्ल्यांना तोंड देणाऱ्या युक्रेनच्या चेर्निहिव्ह शहराचा पाणी पुरवठा हल्ल्यांनंतर बंद झालाय. या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीने फेसबुकवर म्हटलंय, "रात्रीच्या हल्ल्यांदरम्यान पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गळती झाल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. आम्हा हा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत."
युक्रेनची राजधानी कीव्ह आणि आजूबाजूच्या भागांवर रशियन सैन्याचे हल्ले सुरूच आहेत. अनेक नागरिकांनी पश्चिमेतल्या शहरांमध्ये पळ काढला आहे तर अनेक जणांनी हवाई हल्ल्यापासून बचावासाठी भूमिगत मेट्रो स्ट्रेशन्समध्ये आसार घेतलाय.
कीव्हमधली परिस्थिती दाखवणारे हे काही फोटो
युक्रेनमधल्या मारिओपोल शहराला रशियन सैन्याने चहुबाजूंनी वेढलंय. रशियन सैन्य सतत बॉम्बहल्ले करत असल्याने मारिओपोल शहराचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलाय.
अनेकांनी यापूर्वीच शहरातून पळ काढला असला तरी अजूनही अनेकजण शहरात अडकले असून त्यांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
युक्रेनमधले एक खासदार दिमित्रो गुरिन हे मारिओपोलमध्ये लहानाचे मोठे झाले. त्यांचे आईवडील या शहरात अडलेले आहेत आणि चार दिवसांपूर्वी गुरिन यांचं त्यांच्या शेजाऱ्यांशी शेवटचं बोलणं झालं होतं.
गुरिन सांगतात, "आ्ही तीस सेकंदं बोललो. ते नंतर अशा ठिकाणी गेले जिथे फोनला सिग्नल मिळत होता. शहरातल्या काही ठिकाणीच फोनला सिग्नल मिळतोय हे लोकांना माहिती आहे. माझे आई-वडील जिवंत आहेत आणि त्यांच्या निवासी इमारतीच्या तळघरात राहतायत. पण इथे वीज - पाणी - टॉयलेट नाही. ते काही शेल्टर नाही. फक्त एक तळघर आहे."
चार लाख लोकवस्तीचं मारिओपोल शहर रशियासाठी महत्त्वाचं आहे. गेल्या 9 दिवसांपासून रशियाने इथे सतत हल्ले केले आहेत. यामुळे अनेक इमारती आणि निवासी संकुलं जमीनदोस्त झाली आहेत. बुधवारी (9 मार्च) मारिओपोलवर झालेल्या हल्ल्यात दोन वयस्कर व्यक्ती आणि एका मुलीचा मृत्यू झाला होता. तर 17 जण यात जखमी झाले. मारिओपोलमधल्या मॅटर्निटी हॉस्पिटल आणि लहान मुलांच्या वॉर्डवरही रशियाने हल्ला केला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)