रशियाः व्लादिमीर पुतीन यांच्या राजवटीत त्यांचे 'खास दोस्त' कसे श्रीमंत झाले?

फोटो स्रोत, Getty Images
रशिया, युक्रेन व पाश्चात्त्य देशांमधील संघर्ष वाढायला लागल्यावर रशियातील धनदांडग्यांकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलं आहे. रशियातील 'अल्पजनसत्ताक' राजवटीमध्ये त्यांचा समावेश होतो.
पाश्चात्त्य देशांमधील माध्यमं अनेकदा या लोकांचा उल्लेख पुतीन यांच्या 'साट्यालोट्याच्या वर्तुळातले मित्र' असा करतात. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चात्त्य राष्ट्रांनी रशियावर घातलेल्या निर्बंधांमध्ये या धनदांडग्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे.
'अल्पजनसत्ताक' म्हणजे काय?
एखाद्या राजवटीत काही मोजक्याच कुलीन अथवा धनदांडग्या लोकांचं शासनव्यवहारावर वर्चस्व असतं, तेव्हा त्या राजवटीला 'अल्पजनसत्ताक' असं संबोधलं जातं.
स्वतःच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी ही मंडळी शासनव्यवहारावर प्रभाव ठेवून असतात आणि यासाठी ते बहुतेकदा संशयास्पद मार्गांचा अवलंब करतात.
सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर रशियामध्ये अशा धनदांडग्यांचं 'अल्पजनसत्ताक' राजवटीमधील स्थान बळकट होत गेलं.
धनदांडगे
ब्रिटनमधील रोमन अब्रामोविच हे रशियन राजवटीशी संबंधित सर्वांत प्रसिद्ध धनदांडगं व्यक्तिमत्व आहे. रोमन हे चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक आहेत. त्यांची मालमत्ता सध्या 14.3 अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सोव्हिएत संघाचा पाडाव झाल्यानंतर त्यांनी खरेदी केलेल्या रशियन सरकारी कंपन्या विकल्या आणि त्यातून गडगंज संपत्ती कमावली.
ब्रिटनमध्येच राहणारे दुसरे एक अब्जाधीश अलेक्झांडर लेबेदेव हे केजीबीचे माजी अधिकारी व बँकर आहेत. त्यांचा मुलगा एवगेनी लेबेदेव लंडनस्थित 'इव्हिनिंग स्टँडर्ड' या मोठ्या वृत्तपत्राचा मालक आहे.
एवगेनी ब्रिटनचे नागरिक आहेत. ते 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'चे सदस्यदेखील आहेत.
थोडक्यात, रशियन राजवटीवर प्रभाव राखून असणारे धनदांडगे खुद्द रशियातच राहतात असं नाही. जगभरातील इतर देशांमधील तथाकथित उच्चकुलीन वर्गातीलही काही व्यक्तींचा त्यात समावेश होतो.
'युक्रेनच्या दुर्दशेला हे धनदांडगे जबाबदार आहेत'
युक्रेनमधील अर्थव्यवस्था, सामाजिक अवकाश, उद्योगविश्व व राजकारण यांमध्ये आलेल्या अडचणींना असे धनदांडगेच जबाबदार आहेत, असं युक्रेनची राजधानी किव्ह इथल्या 'युक्रेनियन इन्स्टिट्यूट फॉर द फ्यूचर' (यूआयएफ) या संस्थेचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यूआयएफच्या एका अहवालात म्हटल्यानुसार, सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर लिओनिद कुचमा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा देशातील जुन्या उमरावांची आणखी भरभराट झाली.
"युक्रेनमधील धनदांडग्यांनी त्यांची बहुतांश मालमत्ता अधिकाऱ्यांशी साटंलोटं करून आणि अपारदर्शक खाजगीकरणाद्वारे कमावली आहे. स्वतःच्या व्यवसायाचं संरक्षण करण्यासाठी राजकारणावर नियंत्रण राखणं त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं," असं या अहवालात म्हटलं आहे.
या धनदांडग्यांनी स्वतःची पोतडी कशी भरली?
यूआयएफचे कार्यकारी संचालक व्हिक्टर एंड्रूसिव्ह यांनी 2019 साली वॉशिंग्टनमधील एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, या धनदांडग्यांचा एक 'विशेष वर्ग' निर्माण झालेला आहे आणि ते 'विशिष्ट तऱ्हेने कारभार' करतात. त्यांच्याकडे 'लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी काही खास पद्धती' आहेत.
एंड्रूसिव्ह म्हणाले होते, "वस्तुतः ते व्यवसाय करत नाहीत. भांडवलशाही देशामध्ये ज्या तऱ्हेने व्यक्ती श्रीमंत होतात, तो मार्ग या मंडळींनी चोखाळलेला नाही. त्यांनी कोणताही उद्योग उभारलेला नाही, तर देशातील राजवटीच्या मदतीने त्यांनी सर्व कारभारावर ताबा मिळवलेला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
रशियात या धनदांडग्यांची इतकी चलती कशी निर्माण झाली?
1991 साली सोव्हिएत संघाचं विघटन झालं, त्यातून या धनदांडग्यांचा उदय झाला.
त्या वर्षी नाताळच्या दिवशी मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी सोव्हिएत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सत्तेची सूत्रं बोरीस येल्तसिन यांच्याकडे सोपवली.
सोव्हिएत संघामध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती, तेव्हा खाजगी मालमत्तेचं वर्चस्व नव्हतं. परंतु, रशियाने भांडवली अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण झालं. विशेषतः उद्योग क्षेत्र, ऊर्जा व वित्तीय क्षेत्रांमध्ये खाजगीकरणाचा विस्तार झाला. परिणामी, नव्वदीच्या दशकात खाजगीकरणामुळे काही लोक आपोआपच श्रीमंत होत गेले.
कोणाचा सत्ताधारी वर्तुळांमध्ये चांगला संपर्क असेल, तर निव्वळ त्या संपर्काच्या आधारावर रशियातील उद्योगविश्वात मोठा वाटा मिळवणं शक्य होत असे. बहुतेकदा हे लोक कच्च्या मालाचा पुरवठा करणआरे असायचे. खनिज, वायू किंवा तेल आदी उद्योगांमध्ये ते सक्रिय होते. याच वस्तूंना जगभरातून मागणी असल्यामुळे त्यांची चलती निर्माण झाली.
आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना हे धनदांडगे सहाय्य करू लागले आणि आपल्या कंपन्यांमध्ये संचालक व तत्सम पदं देऊ लागले.
या धनदांडग्यांनी प्रसारमाध्यमं, तेलाच्या विहिरी, पोलादाचे कारखाने, अभियांत्रिकी कंपन्या, यांवर नियंत्रण मिळवलं. ही मंडळी अत्यल्प कर भरत असत.
याच लोकांनी बोरीस येल्तसिन यांना पाठिंबा दिला आणि 1996 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान त्यांना आर्थिक मदतसुद्धा केली.
पुतीन यांच्या सत्ताकाळातील धनदांडग्यांचं स्थान
बोरीस येल्तसिन यांच्यानंतर रशियाची सूत्रं व्लादिमीर पुतीन यांच्याकडे आली, तेव्हा त्यांनी या धनदांडग्यांना लगाम घालायला सुरुवात केली. परंतु, त्यातील जे धनदांडगे पुतीन यांचा हात धरून राहिले त्यांना मात्र यश मिळत गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
बँकर बोलीस बेरेजोव्स्की यांच्यासारख्या काही कुलीन लोकांनी पुतीन यांची साथ द्यायला नकार दिला, तेव्हा त्यांना देश सोडून पळून जावं लागलं.
एके काळी रशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मानले जाणारे मिखाइल खोदोरकोवस्की सध्या लंडनमध्ये राहतात.
या संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर 2019 साली पुतीन यांनी 'फायनान्शिअल टाइम्स'ला सांगितलं होतं की, "आता आमच्याकडे असा प्रभाव राखून असणारे कोणी धनदांडगे उरलेले नाहीत."
परंतु, पुतीन यांच्याशी निकटचा संबंध असणाऱ्या लोकांनी त्यांच्या सत्ताकाळात स्वतःचं व्यापारी साम्राज्य निर्माण केलं आहे.
अशा लोकांमध्ये बोरीस रोटेनबर्ग यांचा सावेश होतो. पुतीन व रोटेनबर्ग लहानपणी एकाच ज्युडो क्लबमध्ये खेळत होते. ब्रिटनच्या सरकारने पुतीन यांच्या निकटवर्तीयांपैकी एक महत्त्वाचे उद्योगपती म्हणून रोटेनबर्ग यांचं नाव घेतलं आहे. 'फोर्ब्स' नियतकालिकातील बातमीनुसार, रोटेनबर्ग यांच्याकडे सुमारे 1.2 अब्ज डॉलर इतकी मालमत्ता आहे.
त्यामुळे पुतीन यांनी युक्रेनमधील 'डोनेत्सक' व 'लुहान्स्क' या दोन विभाजनवादी प्रदेशांना 'लोकप्रजासत्ताका'चा दर्जा दिला, तेव्हा बोरीस व त्यांचे भाऊ अर्काडी यांच्यावर ब्रिटनमध्ये निर्बंध घालण्यात आले.
ब्रिटनसोबतच युक्रेन, अमेरिका, युरोपीय संघ, ऑस्ट्रेलिया व जपान यांनीही रशियातील या धनदांडग्यांवर निर्बंध लादले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर हे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























