रशिया युक्रेन संघर्ष : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ताबा, आतापर्यंत काय-काय घडलं?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

युक्रेन आणि रशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्षत्र व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. तर दुसरीकडे युक्रेनवर हल्ला केलेल्या रशियन फौजांनी चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवलाय. युद्धाच्या पहिल्या दिवशी युक्रेनमध्ये 137 जण मारले गेले.

दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेली हिंसा तात्काळ बंद करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना केली आहे. चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्याचा प्रय्तन करावा असंही मोदी म्हणाले.

युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी या प्रकरणी भारतानं मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. मोदींच्या राजकीय उंचीचा विचार करता, त्यांच्या मताचा पुतिन विचार करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चर्नोबिल अणुभट्टीचा ताबा घेतल्याची माहिती आहे. प्रचंड संघर्षानंतर ही अणुभट्टी गमावल्याची माहिती युक्रेननं दिली आहे.

गुरुवारी झालेल्या संघर्षात युक्रेनच्या सैन्य आणि नागरिक मिळून 137 जणांनी प्राण गमावल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे.

शांततेच्या मार्गाने तोडगा काढा, मोदींची विनंती

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन करत या संपूर्ण परिस्थितीवर चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान वादानंतर सुरु झालेला हिंसक संघर्ष तत्काळ थांबवावा अशी विनंती मोदींनी केली आहे.

युक्रेनबरोबर असलेले मतभेद हे चर्चेच्या माध्यमातून सोडवणं शक्य आहे. त्यामुळं सर्व पक्षांनी चर्चेच्या आणि वाटाघाटीच्या माध्यमातून यावर तोडगा काढावा असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांच्या आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंताही पुतिन यांच्यासमोर व्यक्त केली. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी म्हणाले.

दरम्यान, पुतिन यांनी युक्रेन संदर्भात घडलेल्या घडामोडींची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. दोन्ही देश सामायिक हितांच्या मुद्द्यांवर एकमेकांच्या संपर्कात राहतील यावर या दोन्ही नेत्यांचं एकमत झालं.

चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ताबा

रशियाच्या सैन्यानं युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवला आहे. 1986 मध्ये घडलेल्या आपत्तीनंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं.

त्यामुळं या परिसरातील संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय आण्विक घडामोडींवर लक्ष ठेऊन असलेल्या संस्थांनी काळजी व्यक्त केली आहे.

हा परिसर आता सुरक्षित आहे किंवा नाही हे सांगणं आता कठीण असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखायलो पोडोल्याक यांनी म्हटलं आहे. तीव्र संघर्षानंतर युक्रेननं याठिकाणचा ताबा गमावल्याचं ते म्हणाले.

एका व्हीडिओमध्ये रशियाचे रणगाडे या एकेकाळच्या अणुऊर्जा केंद्राच्या बाहेर उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. बीबीसीनं या व्हीडिओची सत्यता पडताळली आहे.

इतिहासातील सर्वात गंभीर अशा आण्विक दुर्घटना झालेल्या ठिकाणांपैकी चेर्नोबिल ही एक आहे. याठिकाणी 1986 मध्ये चारपैकी एका अणुभट्टीचा स्फोट झाला होता.

पुन्हा किरणोत्सर्गाचा धोका?

चेर्नोबिल अणुभट्टीच्या परिसरात सुरू असलेल्या संघर्षाच्या धोक्याबाबत शेफिल्ड विद्यापीठातील अणु विषयक तज्ज्ञ प्राध्यापिक क्लेअर कोरखिल यांनी माहिती दिली. परिसरात दारुगोळा असावा किंवा दारुगोळा असलेली विमानं उडावी यासाठी हे ठिकाण योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या. "याठिकाणी आण्विक कचरा प्रतिबंधक सुविधा आहेत. 1986 च्या स्फोटात नुकसान झालेल्या अणुभट्टीला झाकणारं आणि सुरक्षा करणारा घुमट याठिकाणी आहे." या इमारती किरणोत्सर्ग करणारं साहित्य आतच राहावं या दृष्टीनं तयार करण्यात आल्या आहेत. युद्धक्षेत्रासारख्या वापरण्यासाठी त्या तयार केलेल्या नाहीत, असंही त्या म्हणाल्या. याठिकाणी काही नुकसान झाल्यास किरणोत्सर्गी साहित्य हटवण्याच्या कामामध्ये 30 वर्षे मागे ढकलले जाऊ शकतो. तसंच स्थानिक परिसरात किरणोत्सर्ग पसरण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीत रशियन सैन्यानं चर्नोबिल अणुभट्टीतल्या कर्मचाऱ्यांना बंदी बनवलं असल्याचं म्हटलं आहे. याचा निषेध करत असून, त्यांच्या सुटकेची मागणी अमेरिकेनं केली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)