रशिया-युक्रेन : अमेरिका, युके, कॅनडासह जपानचे मॉस्कोवर निर्बंध, अमेरिकेच्या लष्करी हालचालींना वेग

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेन आणि रशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियानं उचललेल्या आक्रमक पावलामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला इशारा दिला आहे. रशियावर निर्बंध लादणार असल्याचं जो बायडन यांनी म्हटलं आहे.
रशियाच्या संसदेनं लष्कराला देशाबाहेर सशस्त्र कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. म्हणजेच युक्रेनमधील दोनेत्स्कसारख्या भागात रशिया आता सैन्य पाठवण्याची शक्यात आहे.
या संपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला इशारा दिला आहे. रशियावर निर्बंध लादणार असल्याचं जो बायडन यांनी म्हटलं आहे.
रशियानं उचललेल्या पावलांना प्रत्युत्तर म्हणून आम्ही त्यांच्यावर निर्बंध लादायला सुरुवात करणार असल्याचं जो बायडन यांनी प्रामुख्यानं म्हटलं आहे.
'आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी 2014 मध्ये ज्या पद्धतीची पावलं उचलली होती, त्याच्याही पुढं जाऊन आम्ही पावलं उचलणार आहोत. तरीही रशियानं युक्रेनमध्ये हल्ला करणं सुरुच ठेवलं तर, आम्हीही आणखी पुढं जाण्यास तयार आहोत,' असा इशाराही बायडन यांनी दिला आहे.
शेजारी देशांच्या भूभागावर असलेल्या भागात नव्या देशांची घोषणा करण्याचा अधिकार पुतीन यांना कोणी दिला? असा सवाल त्यांनी केला आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उघडपणे केलेलं उल्लंघन असून, त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून ठोस प्रतिसाद देणं गरजेचं असल्याचंही, बायडन यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे रशियानं केलेल्या कृत्यांच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या निर्बंधांची घोषणा करत आहोत. रशियानं कारवाई सुरू ठेवल्यास आणि निर्बंध लावणं सुरू ठेवणारा आहोत, असंही जो बायडन यांनी स्पष्ट केलं.
"आम्ही रशियाच्या दोन मोठ्या आर्थिक संस्थांवर पूर्णपणे निर्बंध जाहीर करत आहोत. म्हणजेच पाश्चिमात्य वित्तीय गटातून रशियाला बाहेर करत आहोत. त्यामुळे त्यांना पाश्चिमात्य प्रदेशातून आर्थिक पाठबळ मिळणार नाही. तसंच त्यांना बाजारपेठेत किंवा युरोपीयन बाजारात कर्जाचे नवे व्यवहारही करता येणार नाहीत," असं बायडन यांनी सांगितलं.
मंगळवारी 22 फेब्रुवारीला त्यांनी हे निर्बंध जाहीर केले. रशियातील उच्चभ्रू वर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही निर्बंध लादले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
"आम्हाला रशियाबरोबर युद्धात काहीही रस नाही. मात्र अमेरिका त्यांच्या सहकाऱ्यांसह नाटोच्या ताब्यातील भूभागाच्या एक-एक इंच जमिनीचं संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे, हा संदेश आम्ही देऊ इच्छितो," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी भाषणामध्ये युक्रेनबाबत केलेलं वक्तव्य हे चिंता वाढवणारं असलयाचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलं. पुतीन हे युक्रेनला सार्वभौम देश मानत नाहीत. त्यामुळं त्यावर हल्ला करून पुन्हा त्याचा रशियात समावेश करण्याचा त्यांची योजना असल्याचं ब्लिंकन म्हणाले आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांच्याबरोबरची बैठकही ब्लिंकन यांनी रद्द केली. रशियानं हल्ला सुरू केला आहे, म्हणजे त्यांनी चर्चा फेटाळल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे बैठकीला काही अर्थ नसल्याचं ते म्हणाले.
युद्ध आणि चर्चा दोन्ही एकाचवेळी सुरू ठेवण्याची परवानगी आम्ही रशियाला देऊ शकत नाही, असं ते म्हणाले.
युद्धाची भीती आणि पुतीन यांना पाठिंबाही

फोटो स्रोत, EPA
रशियातील नागरिकांमध्ये या संपूर्ण परिस्थितीमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं समोर येत आहे. रशियातील प्रशासनानं तर पाश्चिमात्य देशांच्या टीकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर देश एकटा पडला असला तरी हे परिणाम भोगायची रशियाची तयारी असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
रशियातील नागरिकांना मात्र या वातावरणाची भीती वाटत आहे. "हे सर्व अत्यंत गंभीर असून कधीही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते," असं मॉस्कोमधील एक पॅव्हेर या रहिवाशानं बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.
तर आम्हाला मुलं, कुटुंब आहे. त्यामुळे आम्हाला भीती वाटत आहे. आम्हाला युद्ध होऊ नये असं वाटत असल्याचं अॅला नावाच्या एक महिला म्हणाल्या.
युक्रेनला लागून असलेल्या रोस्तोव्ह शहरातील स्थानिकांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांना पाठिंबा दर्शवला आहे.
"पुतीन जे काही करत आहेत, ते योग्य आहे. अमेरिकेनं युक्रेनवर वाईट प्रभाव टाकला आहे," असं याठिकाणचे एक स्थानिक म्हणाले. त्याचवेळी मोठं युद्ध सुरू होईल अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
रशियाचे सैन्य शांतीदूत नाहीत-संयुक्त राष्ट्र
रशियन लष्कराला युक्रेनमध्ये प्रवेशाचे आदेश दिल्यामुळे शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केली आहे.
एखाद्या देशाचे सैनिक दुसऱ्या देशात परवानगीशिवाय प्रवेश करत असतात तेव्हा ते शांतीदूताची भूमिका बजावत नसतात. ते शांतीदूत नसतात असं त्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.
रशियानं त्यांचं लष्कर शांतीदूत म्हणून तैनात केलं असल्याचा दावा केला होता. मात्र अमेरिकेनं त्यांचा हा दावा निरर्थक असल्याचं आधीच म्हटलं आहे.

फोटो स्रोत, EPA
युक्रेनच्या दुतावासामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना परत बोलावण्यात येणार असल्याची घोषणा रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे.
लवकरात लवकर त्यांनी युक्रेनमधून बाहरे पडावं, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. कीव्ह तसंच ओडेसा, लिव आणि खारकिव येथील दुतावासात 2014 नंतर काही हल्ले झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं हे पाऊल उचचलं जात आहे.
अमेरिकेच्या सैन्य हालचाली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भाषणानंतर पँटागॉननं युरोपात युक्रेनमधील परिस्थितीचा विचार करता सैन्य हालचाली सुरू केल्या आहेत.
जवळपास 800 जवान हे इटलीहून बाल्टिक भागात पाठवण्यात येणार आहेत. तर आठ F-35 फायटर देट नाटोच्या पूर्वेच्या भागात पाठवण्यात येत आहेत. तसंच अमेरिका 32 AH-64 अपाचे हेलिकॉप्टर्स हे बाल्टीक परिसर आणि पोलंडलाही पठवत आहे.
'अमेरिकेचं आणखी शस्त्र पुरवण्याचं आश्वासन'
अमेरिकेनं रशियावर लावलेले निर्बंध हे पहिलं ठोस पाऊल असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलं आहे.
कुलेबा यांची मंगळवारी जो बायडन यांच्याबरोबर बैठक झाली. त्यात अमेरिकेनं आणखी शस्त्र देण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही त्यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितलं.
मात्र, त्याचवेळी युक्रेनला त्यांच्या भूमीवर असलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी अमेरिकेची ढालसारखी मागणी केलेली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कॅनडाचेही आर्थिक निर्बंध
अमेरिका, युके, युरोपीयन महासंघ आणि इतरांप्रमाणेच कॅनडानंही रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. रशियानं उचललेलं पाऊल हे सार्वभौम देशात घुसखोरीचा प्रकार असल्याच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो म्हणाले.

फोटो स्रोत, EPA
रशियाबरोबरच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध लादण्याची घोषणा त्यांनी केली. तसंच कॅनडातील कोणालाही युक्रेनमधील दोन वादग्रस्त प्रांतांबरोबर आर्थिक व्यवहार करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
जपाननेही लादले निर्बंध
जपाननंही रशियावर निर्बंध लादले आहेत. पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी जपानमध्ये रशियन बाँड मंजूर करण्यावर तसंच काही रशियन व्यक्तींना व्हिसा रद्द करून त्यांची मालमत्ता गोठवली जाणार असल्याचं म्हटलं आहे.
रशियानं उचललेल्या पावलामुळे युक्रेनच्या सार्वभौमत्वावर हल्ला झाला आहे. जर परिस्थिती आणखी गंभीर झाली, तर पुढची पावलं उचलणार असल्याचंही किशिदा यांनी म्हटंल आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























