पाकिस्तानात 15-20 वर्षांनी प्रचंड बर्फवृष्टी, 21 जणांचा गारठून मृत्यू

    • Author, शुमायला जाफरी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

पाकिस्तानातल्या मरी आणि पंजाब प्रांतात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याचं पाकिस्तानच्या बचाव अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

मरी हिल स्टेशनला 'डोंगरांची राणी' म्हटलं जातं आणि थंडीच्या मोसमात इथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

इथे बर्फवृष्टी झाल्याने रस्त्यावरची वाहतूक थांबली आणि गाड्यांच्या रांगा लागल्या. हजारो लोकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच रात्र घालवावी लागली.

या भागात आता पर्यटकांना जायला बंदी घालण्यात आलेली आहे. पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद - मरी राष्ट्रीय महामार्ग बंद केला असून मरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

मदत आणि बचाव कार्यामध्ये प्रशासनाची मदत करण्यासाठी सैन्य आणि अर्धसैनिक दलाची मदत घेतली जात आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशिद म्हणाले, "15-20 वर्षांनी पाकिस्तानात इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक मरीला गेले होते. यामुळेच परिस्थिती कठीण झाली. कारण आम्हाला तिथे जाणारा प्रत्येक रस्ता बंद करावा लागला. आताही तिथे हजारो गाड्या रस्त्यावर अडकलेल्या आहेत. आम्ही त्यांना सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत."

"आता फक्त रेशन आणि बचाव कार्यासाठी आवश्यक सामान नेणाऱ्या गाड्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत रस्ते बंद राहतील. आम्ही पायी जाणाऱ्यांसाठीही हे रस्त बंद करत आहोत," त्यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)