पतंगाशी केलेला खेळ आला अंगाशी, युवक पतंगासोबत 40 फूट हवेत उडाला

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पतंग खेळता खेळता त्या पतंगाशीच केलेला खेळ एका युवकाच्या आणि त्याच्या मित्राच्या चांगलाच अंगाशी आला.

पतंग हवेत गेल्यावर त्याची दोरी न सोडता पतंगासोबत तो युवक हवेत उडाला आणि थेट 40 फूट उंचीवर गेला, त्यानंतर मात्र त्याची आणि त्याच्या मित्रांची घाबरगुंडी उडाली.

या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली पण तो वाचल्यामुळे त्याच्या मित्रांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

श्रीलंकेतील जाफना बेटावरील पॉईंट पेड्रो या भागात एक निराळीच घटना घडली. एका पतंग स्पर्धेदरम्यान पतंग उडवतांना एक व्यक्ती पतंगासह 40 फूट हवेत वर गेला.

ही दृश्यं मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे, पतंग स्पर्धेत एक गट एक महाकाय पतंग उडवण्याचा प्रयत्न करत होता.

पतंग उडवताना त्यातल्या एकाने पतंगाची दोरी मात्र सोडली नाही. त्यामुळे तो वर ओढला गेला आणि बराच वेळ हवेतच होता.

हे दृश्य पाहून उपस्थितांना काय करावं ते कळेना. त्याच्या साथीदारांनी एकमेकांना मदतीसाठी आवाज देण्यास सुरुवात केल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं.

अखेर त्याच्या मित्रांनी पतंग खाली उतरवण्यास सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीने जमिनीपासून सुमारे 15 फूट उंचीवरुन उडी मारली.

यात त्याला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला आहे.

हा प्रसंग पाहणाऱ्या स्थानिकांनी ही माहिती माध्यमांना दिली.

काही रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत जाफना येथे थाय पोंगलच्या निमित्ताने पतंग उडवण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. काही स्थानिक उत्साहाने यात सहभागी होतात.

या स्पर्धेत महाकाय पतंग उडवले जातात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)