तालिबानः एकट्या महिलेला दूरचा प्रवास करता येणार नाही

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं महिलांना प्रवासासाठी नवी अट घातली आहे. महिलांना सार्वजनिक बस किंवा इतर वाहनांद्वारे दूरचा प्रवास करायचा असेल, तर एकटीने जाता येणार नाही. तालिबानच्या नव्या अटीनुसार, या प्रवासादरम्यान महिलेबरोबर तिचा जवळचा पुरुष नातेवाईक असणं बंधनकारक आहे.

रविवारी, 26 डिसेंबर रोजी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं याबाबतची घोषणा केली.

यंदा ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर सातत्यानं तालिबान सरकार नवनवे नियम जाहीर करत आहे. त्याच नियमांच्या मालिकेतील हा नियम आहे.

अफगाणिस्तानातील सत्ता ताब्यात घेतल्यापासून तालिबाननं मुलींच्या शिक्षणावर बंधनं लागली आहेत. मुलींच्या अनेक शाळा बंद केल्या आहेत, महिलांना काम करण्यास बंधनं आणण्यात आली आहेत.

ह्युमन राईट्स वॉच या संघटनेच्या मते, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचं महिलांच्या प्रवासासाठीचे नवे नियम म्हणजे महिलांना कैदी बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे.

सद्गुणांचं संवर्धन आणि दुर्गुणांना प्रतिबंध अशा कामांसाठी तालिबाननं स्वतंत्र मंत्रालय सुरू केलं आहे. या खात्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातल्या एखाद्या महिलेला 72 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा प्रवास करायचा असल्यास तिच्याबरोबर घरातील पुरुष नातेवाईक असणं बंधनकारक आहे.

तसंच, नव्या नियमांनुसार, ज्या महिलांनी अशा लांबच्या प्रवासादरम्यान चेहरा झाकण्यासाठी काही वस्त्र वापरलं नसेल, तर त्यांना त्या गाडीमालकाने प्रवासास परवानगी देऊ नये. मात्र, या नियमात नेमके कोणते वस्त्र वापरायचे, हे सांगितलं गेलं नाही. कारण अफगाणिस्तानातील महिला आधीपासूनच स्कार्फ वापरतात.

गाड्यांमध्ये गाणी वाजवण्यासही बंदी आणण्यात आली आहे.

काबुलमध्ये राहणाऱ्या फातिमा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मला खूप वाईट वाटतंय. मी बाहेर एकटी जाऊ शकत नाही. जर माझी मुलं आजारी असतील आणि पती घरी नसेल, तर मी काय करायचं?"

"तालिबाननं आमचा आनंदच आमच्यापासून हिरावून घेतलाय. मी माझं स्वातंत्र्य आणि आनंद दोन्ही गमावून बसलेय," असं फातिमा म्हणाल्या.

आणखी एका अफगाण महिलेनं बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "या निर्णयानं काही महिलांना 'निश्चिंत' वाटू शकेलही. पण नातेवाईक बरोबर असल्यानं हिंसा किंवा छळ होणारच नाही, याची काहीही खात्री देता येत नाही."

त्या पघमनमध्ये 2015 साली घडलेल्या घटनेचा दाखला देतात. त्या सांगतात की, चार महिलांचं बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.

"तालिबाननं महिलांना सुरक्षित वाटेल असं वातावरण अफगाणिस्तानात निर्माण करण्याची आवश्यकता आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

तालिबाननं अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर अनेक बंधनं लादली आहेत. कामावर जाण्यास बंदीपासून मुलींच्या शाळा बंद करण्यापर्यंत अनेक निर्णय आतापर्यंत घेण्यात आले आहेत.

तालिबाननं या सर्व बंधनांना 'तात्पुरतं' म्हटलं आहे.

तालिबानच्या आधीच्या सत्ताकाळात म्हणजे नव्वदीच्या दशकातही त्यांनी मुलींच्या शिक्षणावर आणि महिलांच्या कामावर बंदी आणली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)