Kentucky tornadoes : अमेरिकेतल्या चक्रीवादळातील मृतांची संख्या 100 च्या वर जाण्याची भीती

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिकेत केंटकी भागात आलेल्या चक्रीवादळानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळातल्या बळींची संख्या 100 चा आकडा ओलांडण्याची शक्यता कंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी व्यक्त केलीय.

अँडी बेशियर म्हणाले की, "राज्याच्या इतिहासातील हे सर्वांत विनाशकारी चक्रीवादळ आहे. आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंचा आकडा 100 च्या वर जाण्याची भीती आहे."

हजारो नागरिकांची घरं उद्धव्स्त झाली आहेत. 1925 मध्ये आलेल्या चक्रीवादळात 695 जणांनी जीव गमावला होता. ते सगळ्यात विनाशकारी चक्रीवादळ होतं.

केंटकीमध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बचावलेल्या लोकांना अन्न-पाणी पुरवण्याचंही काम सुरू आहे.

नॅशनल गार्डचे जवळपास 300 हून अधिक जण घराघरात जाऊन लोकांचा बचावकार्य करतायेत आणि मदत पोहोचवतायेत.

"अधिक लोकांना वाचवू शकू, या चमत्काराच्या आशेसह आम्ही प्रयत्न करतोय,2 असं गव्हर्नर बेशियर म्हणाले. त्यांनी चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मेफिल्ड भागात पाहणी दौरा केला.

"या चक्रीवादळानं जवळपास 365 किलोमीटर परिक्षेत्रातील भागाचं नुकसान केलंय. हजारो नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. नुकसानीचा नेमका आकडा अजूनही सांगता येत नाहीय," असं बेशियर म्हणाले.

1925 साली शेवटचं सर्वाधिक विनाशकारी चक्रीवादळ अमेरिकेच्या भूमीवर धडकलं होतं. त्यावेळी 695 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना केंटकीत 'सर्वांत मोठी आपत्ती' म्हणून जाहीर केली आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी प्रशासनाला केलं आहे.

दरम्यान, जो बायडेन एके ठिकाणी म्हणालेत की, "हवामान बदलाचा संबंध या चक्रीवादळाशी आहे का, याबाबत पर्यावरण रक्षण यंत्रणेला या चक्रीवादळाच्या निमित्तानं परीक्षण करण्यास सांगितलं जाईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)