प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भपात टाळता येणार? नवीन संशोधन काय सांगतं?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

गरोदरपणात सुरुवातीच्या काळात ज्या महिलांना रक्तस्त्राव झाला आणि ज्या महिलांचा किमान एकदा गर्भपात झाला आहे अशा महिलांवर प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाने उपचार केले पाहिजेत.

हेल्थ वॉचडॉग एनआयसीईच्या नवीन मार्गदर्शन संशोधनानुसार, या उपचारामुळे यूकेमध्ये दरवर्षी 8 हजार 450 अधिक जन्म होऊ शकतात.

महिलेचे जितके अधिक गर्भपात झाले आहेत तेवढे अधिक प्रभावी प्रोजेस्टेरॉन होते, असं चाचणीत आढळल्याचंही ते सांगतात. नैसर्गिकरित्या आढळणारे हार्मोन वाढत्या बाळासाठी गर्भाशय तयार करण्यास मदत करते.

जोसी यांचे आतापर्यंत पाच गर्भपात झाले आहेत. त्या आता 15 आठवड्यांच्या गरोदर आहेत. 15 आठवड्यांचं बाळ हा आतापर्यंतचा त्यांचा गर्भधारण करण्याचा सर्वाधिक काळ आहे. प्रोजेस्टेरॉनच्या उपचारामुळे हे शक्य झालं का हे सांगणं अशक्य असलं तरी तिला यामुळे कसं वाटतं यामुळे मोठा फरक पडतो असंही तज्ज्ञ सांगतात.

जोसी म्हणाल्या, "आमच्यासाठी हा उपचार सर्वकाही ठीक करणार असेल तर... हे केवळ चमत्कारिक आहे."

रक्तस्राव सुरूच

गरोदरपणाच्या पहिल्या 12 आठवड्यांत पाचपैकी एका स्त्रीला रक्तस्त्राव होतो किंवा यादरम्यान स्पॉटिंग होतं.

यामुळे बऱ्याचदा कोणती समस्या उद्भवेल असं नाही परंतु खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. रक्तस्त्राव सातत्याने सुरूच राहिला तर गर्भपाताचा धोका असल्याची भीती काहींना असते.

काही महिलांना डॉक्टर आणखी काही दिवस प्रतीक्षा करू, असं सांगत घरी जाण्याचाही सल्ला देतात.

प्रोजेस्टेरॉन पेसरीज दिवसातून दोनदा योनीमध्ये घालण्याची शिफारस नवीन नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्स (एनआयईएस) मार्गदर्शन यांच्याकडून करण्यात आली आहे.

बर्मिंगहॅम महिला रुग्णालयातील डॉक्टरांनी जोसीसाठी हे लिहून (प्रिस्क्राईब) दिले.

टॉमीज नॅशनल सेंटर फॉर मिसकॅरिएज रिसर्चच्या संशोधकांनी केलेल्या चाचणीत असे आढळले की, ज्या महिलांना नुकताच रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा पूर्वी कधीही गर्भपात झालेला नाही अशा महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन उपचारामुळे फारसा फरक पडला नाही. महिलेचे जेवढे अधिक गर्भपात झाले असतील तेवढे प्रोजेस्टेरॉन अधिक प्रभावी असंही त्यांनी सांगितलं.

उत्तम उपचार

टॉमी नॅशनल सेंटर फॉर मिसकॅरिएज संशोधनातील आणि बर्मिंगहॅम विद्यापीठातील प्राध्यापक अरी कूमारासामी म्हणाले: "हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण आहे."

गर्भपात थांबवू शकेल असं काहीतरी आमच्याकडे आहे. यामुळे यूकेतील हजारो जोडप्यांना एक नवीन आशा मिळाली आहे. पण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की केवळ काहीच गर्भपात प्रोजेस्टेरॉनच्या उपचाराने थांबवता येऊ शकतात."

गर्भपाताची आणखीही काही कारण आहेत. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणखी प्रभावी उपचार पद्धती शोधणं गरजेचं आहे.

चारपैकी एका गर्भधारणेचा गर्भपात होतो, याची शक्यता पहिल्या तीन महिन्यांत अधिक असते.

रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचे अध्यक्ष डॉ. एडवर्ड मॉरिस म्हणाले, "एनआयईसीने ताज्या पुराव्याची कबुली दिली हे सकारात्मक आहे."

"तरीही अद्याप गर्भपाताचे कारण अस्पष्ट असलेल्या महिलांसाठी हा उपचार योग्य आहे का याचा अधिक अभ्यास करावा लागेल. या क्षेत्रातील संशोधनाचे आम्ही स्वागत करू."

एनआयईएसचे मुख्य कार्यकारी प्रोफेसर गिलियन लेंग म्हणाले की, संशोधनाचा पुरावा "हे स्पष्ट सांगते की, प्रोजेस्टेरॉन प्रत्येक गर्भपात रोखू शकणार नाही".

परंतु काही स्त्रियांना ही उपचार पद्धती फायदेशीर ठरेल आणि एक स्वस्त उपचाराचा पर्याय त्यांच्याकडे असेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)