Sex Slavery: युरोपात तस्करी झालेल्या एका स्त्रीची मुक्त होण्याची कहाणी

    • Author, लिंडा प्रेस्ली
    • Role, बीबीसी न्यूज, कोपेनहेगन
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

दरवर्षी हजारो महिलांची युरोपीय शहरांमध्ये तस्करी होते आणि त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. नायजेरियातील तरुण जुएल नर्स बनण्याच्या अपेक्षेने तिथे गेली, पण सेक्स स्लेव्हरीच्या विळख्यात अडकली. अखेरीस दोन योगायोगांमुळे तिला पळून जाणं शक्य झालं.

"मी फक्त प्रकाशाकडे पाहिलं. मी जिथून आलेय तिथे वीज नाही, त्यामुळे बहुतेकदा तिकडे अंधार असतो... पण इथे सगळं चकाकत होतं- खूप सुंदर वाटत होतं."

जुएल (नाव बदललं आहे) डेन्मार्कमधील तिच्या आगमनाची आठवण सांगत होती.

"या देशात यायची संधी दिल्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानत होते. मी काम सुरू करण्यासाठी उत्सुक होते."

वृद्ध लोकांची काळजी घेण्याचं काम आपल्याला मिळणार आहे, अशा विचाराने जुएल नायजेरियामध्ये डेन्मार्कला जाणाऱ्या विमानात बसली.

"तस्करी होत असलेल्या लोकांना लिबियातून तिकडे नेलं जातं आणि सर्वसाधारणतः बस नि बोटींमधून हे प्रवास होतात. पण इथे सगळं इतकं निटनेटकं आणि नियोजित वाटत होतं की मला काही शंका आली नाही," असं ती सांगते.

'आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटने'च्या अंदाजानुसार, भूमार्गे प्रवास करून भूमध्य समुद्र पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 80 टक्के नायजेरियन महिलांची युरोपात लैंगिक व्यापारासाठी तस्करी होते.

संकटांनी भरलेला हा प्रवास करून गेलेल्या महिलांना कोणते भोग भोगावे लागले, त्याबद्दल जुएलला माहिती होती. त्यामुळे तिचा प्रवास लागोस विमानतळावरून सुरू झाला, तेव्हा ती स्वतःच्या भवितव्याविषयी आश्वस्त झाली.

कोपेनहेगनमध्ये तिची एका नायजेरियन महिलेशी ओळख झाली आणि ही महिला पुढच्या दिवशी तिला कोपेनहेगनमधील वेस्टरब्रो या रेड लाइट एरियामध्ये घेऊन गेली.

"तिथे काही हॉस्पिटल वगैरे असेल असं मला वाटत होतं," जुएल सांगते.

त्या दोघी काही वेळ रस्त्यांवरून चालत राहिल्या. जुएलला आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळायला सांगण्यात आलं.

आणि मग त्या सोबतच्या बाईने एकदम बॉम्ब टाकला.

"ती म्हणाली, 'तू इथे काम करणार आहेस.' मी आजूबाजूला बघितलं. मला पटकन न दिसलेल्या एखाद्या बिल्डिंगबद्दल ती बोलतेय की काय, असं मला वाटलं. पण तसं नव्हतं. आम्ही ज्या रस्त्यावरुन चालत होतो, तिथे मला काम करायचंय, असंच तिला म्हणायचं होतं. मी वेश्या होणार आहे, आणि इथे उभं राहून मला ग्राहकांना जाळ्यात ओढायचं आहे, असं तिने मला स्पष्टच सांगितलं. मग जणू काही सगळं डेन्मार्कच माझ्यावर कोसळून पडलं..."

त्या रात्री जुएलची अगदी योगायोगाने मिशेल माइल्डवॉटर यांच्याशी भेट झाली. डेन्मार्कमध्ये तस्करी होऊन आलेल्या लोकांची मदतीसाठी कार्यरत 'होप-नाऊ' या एनजीओसोबत काम मिशेल यांना ही लहानखुऱ्या देहयष्टीची, लाजरीबुजरी, साधारण वीस वर्षांची तरुणी दिसली आणि त्यांनी तिला स्वतःचं कार्ड दिलं. त्यात त्यांचा संपर्क क्रमांकसुद्धा होता.

बाइक घेऊन आलेल्या या इंग्रज बाईवर विश्वास ठेवू नकोस, असं जुएलच्या नायजेरियन 'मॅडम'ने सांगितलं. लगेचच मॅडमने जुएलला तिचा पहिला ग्राहक शोधून दिला.

"त्या माणसाने मला घरी घेऊन जाण्यासाठी तिला चार हजार क्रोनर (620 डॉलर) दिले, आणि मॅडम सरळ निघून गेली," असं जुएल सांगते.

"तो माणूस खूप वेळ मला कारमधून कुठेतरी घेऊन जात होता. मला तेव्हा इथली भाषा बोलता येत नव्हती आणि तो काय बोलतोय त्यातलं काहीच मला समजत नव्हतं. आम्हाला परस्परांशी बोलण्यासाठी गुगल ट्रान्स्लेट वापरावं लागत होतं. भयंकर परिस्थिती होती."

त्यानंतरच्या महिन्यांमध्येसुद्धा जुएल शरीर विक्रीच्या या पेशामध्ये रुळली नाही.

"मला ते चांगल्या तऱ्हेने जमत नव्हतं. मी कोपऱ्यात भिडस्तपणे उभी असायचे. पण मला प्रत्येक वेळी कोणीतरी ग्राहक मिळायचाच, कारण तिथे नियमित येणाऱ्यांना नवीन बाई आल्याचं लगेच कळतं, आणि त्यांना या नवीन बाईची कंपनी हवी असते."

युरोपीय संघाने अलीकडे जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2017-18 या वर्षामध्ये 14 हजारांहून अधिक व्यक्ती तस्करीला बळी झाल्याची नोंद झाली. पण हे केवळ हिमनगाचं टोक आहे, कारण ओळख पटलेल्याच प्रकरणांची दखल या नोंदींमध्ये घेतली जाते.

यातील अर्ध्या व्यक्ती युरोपीय संघाबाहेरच्या होत्या आणि पीडितांमध्ये ज्या देशातील व्यक्तींचा समावेश होता, त्यात पहिल्या पाचांमध्ये नायजेरियन व्यक्ती होत्या.

लैंगिक शोषण हा या तस्करीचा मुख्य उद्देश असल्याचं दिसतं, असं युरोपीय आयोगाने म्हटलं आहे. एका वर्षात यातून मिळालेला गुन्हेगारी महसूल तब्बल 14 अब्ज युरो (16 अब्ज डॉलर) इतका असल्याचा अंदाज आहे.

हा पैसा मिळवणाऱ्या महिलांना त्यांच्या तस्करांना प्रवासासाठी व निवास व्यवस्थेसाठी प्रचंड पैसा द्यावा लागतो.

"त्या एका अर्थी वेठबिगार होऊन जातात," असं डॅनिश इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजमधील स्थलांतरण विभागामधील वरिष्ठ संशोधक सिन प्लॅबेख म्हणतात.

"नायजेरियातून स्थलांतरित होऊन आलेले आणि शरीरविक्री करावी करणारे लोक सर्वाधिक कर्जबाजारी गटांमध्ये मोडतात. त्यांच्यावरील कर्ज 10 हजार ते 60 हजार युरोंदरम्यानचं असू शकतं. इतकं कर्ज असल्यावर तुम्हाला वेगाने पैसे कमावणं गरजेचं ठरतं. आणि तुमच्याकडे रोजगारासाठी आवश्यक कागदपत्रं नसतील, तर वेगाने पैसे कमावण्याचा मार्ग सेक्स उद्योगात मिळतो."

जुएलला 42 हजार युरोंची परतफेड नियमित हप्त्यांमध्ये करावी लागेल, असं तिच्या तस्करांनी सांगितलं. हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी त्यांनी तिला नायजेरियातून निघण्याच्या आदल्या दिवशी एका दफनभूमीमध्ये भयंकर बैठकीसाठी बोलावलं.

"काहीही झालं तरी मी पैसे परत करीन आणि माझी तस्करी कोणी केली हे कधीही उघड करणार नाही, अशी शपथ घ्यायला मला भाग पाडण्यात आलं. मी ही माहिती उघड केली तर मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल, असंही त्यांनी मला सांगितलं."

जुएल डेन्मार्कला पोचल्यावर तस्करांनी नायजेरियात तिच्या कुटुंबाला धमकावलं.

"ते लोक अचानक घरात आले आणि तस्करांबद्दल पोलिसांना काही सांगण्याबाबत, किंवा पैसे परत न करण्याबाबत माझ्या आजीने माझ्याशी बोलावं, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मी तिला कधीही फोन केला तरी ती रडायची आणि मी या लोकांशी करार केलेला आहे, त्यामुळे मी पैसे द्यायलाच हवेत, नाहीतर माझ्या कुटुंबीयांचं काहीतरी बरंवाईट होईल, याची आठवण मला ती करून द्यायची."

जुवेल प्रचंड दबावाखाली होती, त्यामुळे वेस्टरब्रो रस्त्यावर पार्क केलेल्या कारमध्ये किंवा दोन गाड्यांच्या मध्ये, किंवा ग्राहकांच्या घरी सेवा पुरवत असताना ग्राहकांमध्ये आपण निवाडा करू शकतो, असं तिला वाटलंही नाही.

"नकार देणं शक्यच नव्हतं. मला होकारच द्यावा लागत होता, कारण रात्रीत काही पैसा कमावण्याची गरज असलेल्या 10 ते 15 बायका त्याच माणसाकडे पाहत असतात," असं ती सांगते.

पण ग्राहकासोबत त्याच्या घरी जाणं खूपच जोखमीचं ठरू शकतं.

"एकदा तर एकाने मला बाथटबमध्येच थांबायची सक्ती केली होती, त्या रात्री मी मेलेही असते कदाचित," अशी भयंकर आठवण ती सांगते.

"मला एका माणसासोबत त्याच्या घरी जावं लागलं. त्याने मला बाथटबमध्ये जायला सांगितलं. मला आधी वाटलं, ठीक आहे, त्याला माझ्याकडून आंघोळ घालून हवी असेल किंवा तसं काही असेल. पण मग तो बाहेर गेला आणि बर्फाने भरलेल्या दोन बादल्या घेऊन आला. त्या तो बर्फ टबमध्ये माझ्यावर घालायला सुरुवात केली. मी तिथे कपड्यांशिवाय बसले होते आणि हे सगळं हिवाळ्यात सुरू होतं..."

'अपराधी मोकाट'

या वर्षी एप्रिल महिन्यात, मानवी तस्करीशी लढण्यासाठी नवीन व्यूहरचना जाहीर करताना युरोपीय आयोगाने कबुल केलं की, ही समस्या हाताळण्यासाठी गेली 10 वर्षं सुरू असलेले प्रयत्न बहुतांशाने अपयशी ठरले आहेत.

"युरोपीय संघातील तस्करीसंदर्भातील अपराधी मोकाट आहेत, आणि त्यांच्या विरोधात चाललेल्या खटल्यांची व दोष निश्चिती झाल्याची प्रकरणं खूपच कमी आहेत, त्यामुळे तस्करी हा कमी जोखमीचा व जास्त नफ्याचा गुन्हा झाला आहे," असं आयोगाने म्हटलं.

शोषण होणाऱ्या पीडितांच्या सेवांची मागणी कमी करण्यासाठीचे प्रयत्न अपयशी ठरले, असंही आयोगाने नमूद केलं.

मार्च 2020मध्ये पोलिसांनी आधुनिक गुन्हेगारीची 779 प्रकरणं (यात मजुरीविषयक शोषण व लैंगिक शोषण यांचाही समावेश होता) नोंदवली, पण 2019 या वर्षामध्ये 250हून कमी लोकांना अटक झाली, असं युनायटेड किंगडमच्या सरकारने म्हटलं.

आधुनिक गुलामगिरीच्या पीडितांना सहाय्य करण्यासाठी युनायटेड किंगडममध्ये चालवली जाणारी सेवा 'सॅल्व्हेशन आर्मी' या संस्थेच्या हातात आहे. या संस्थेच्या म्हणण्यानुसार, जून 2021ला संपलेल्या त्यांच्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये लैंगिक शोषणाला तोंड देऊनही टिकून राहिलेल्या 610 बिगरब्रिटिश पीडितांचा समावेश होता.

वेस्टेरब्रोमधील इस्टेडगेड या मुख्य रस्त्यावर बार, क्लब, सेक्स शॉप यांची चलती आहे, त्यामुळे शनिवारी रात्री तिथे खूप गोंगाट आणि भडक दिवे लागलेले असतात.

बहुतेकदा दारूमुळे पावलं डगमगणारे पुरुषांचे गट इकडेतिकडे भटकत असतात. बहुतेकशा नायजेरिया आणि पूर्व युरोपातून आलेल्या महिला काटेकोरपणे केशरचना आणि मेक-अप करून शरीरविक्रीसाठी उभ्या असतात.

अंगाला घट्ट बसणारे कपडे त्यांनी घातलेले असतात. काही मोजक्या जणींनी उंच टाचांच्या चपला घातलेल्या असतात आणि कोणीच खास 'सेक्सी' कपडे घालत नाही.

डेन्मार्कमधील परदेशी वेश्यांना दशकभराहून अधिक काळ सहाय्य करणाऱ्या मिशेल माइल्डवॉटर अजूनही या भागात फेऱ्या मारतात आणि जुएलसारख्या महिलांना त्यांचं कार्ड देऊन मदत व समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतात.

रस्त्यावरचं जगणं किती धोकादायक असतं, याची त्यांना स्पष्ट जाणीव आहे. या भागातील एका हॉटेलात घडलेल्या अनेक हिंसक घटना त्यांच्या लक्षात आहेत.

"तिथे अनेक बलात्कार झाले आहेत. अनेकदा रक्ताने माखलेली एखादी बाई तिथून धावत बाहेर आलेली आहे," असं त्या सांगतात.

आठवड्याअखेरीला डॅनिक एनजीओ शरीरविक्री करणाऱ्या महिलांना सेवा पुरवतात. 'रेडेन इंटरनॅशनल' ही संस्था एक कॅफे चालवते. या कॅफेमध्ये विश्रांती घेता येते आणि पुढील ग्राहकासोबत जाण्यापूर्वी थोडं काही खाता येतं. आणि शेजारच्या एखाद्या रस्त्यावर स्वयंसेवकांचे गट इजा कमी करण्यासाठीचा उपक्रम चालवत असतात.

या संस्थेला 'रेड व्हॅन' असं संबोधलं जातं, कारण गाडीमध्ये मागच्या बाजूला पलंग असतो, त्यात भडक दिवे लावलेले असतात आणि कन्डोम व वाइप्सचा पुरवठाही केला जातो. एखाद्या असुरक्षित असू शकणाऱ्या ठिकाणी जाण्याऐवजी वेश्या त्यांच्या ग्राहकाला या खाजगी जागी आणू शकतात.

या व्हॅनची सुविधा वापरण्यासाठी रात्रभर स्थिर गतीने महिलांची व सोबत पुरुषांची रीघ लागलेली असते, तर स्वयंसेवक त्यांच्या खाजगीपणाचा आदर राख पुरेशा अंतरावर उभे राहतात, पण संबंधित महिला संकटात असेल तर कळेल इतपत जवळ थांबतात. चार तासांच्या एका पाळीमध्ये ही व्हॅन 28 वेळा वापरता येऊ शकते.

रेड व्हॅनच्या एक स्वयंसेवक सिन प्लॅमबेख संशोधक आहेत.

"या महिलांसमोर कर्ज, गरिबी, कुटुंब, मुलं यांच्याशी जोडलेली समस्या उभी असते. ही समस्या सोडवण्याकरता त्यांना काम गरजेचं असतं. आपल्याला आवडो अथवा न आवडो त्या शरीर विक्रेय करणारच आहे, त्यामुळे मग आम्ही त्यांना त्यासाठी सुरक्षित जागा तरी पुरवतो," असं प्लॅमबेख म्हणतात.

"गरज नसेल तर बहुतांश महिला या व्यवसायात येणार नाहीत. त्यांच्यासाठी काय चांगलं- काय वाईट याच्या बऱ्याच नैतिक कल्पना आपल्या मनात असतात, पण पैसा कमावणं ही त्यांची गरज असते."

डेन्मार्कमध्ये शरीर विक्रेय बेकायदेशीर नाही, पण त्यासाठी कामाचा परवाना लागतो. कोपेनहेगनमध्ये सेक्स वर्कर्सची भयंकर स्थिती पाहता त्या स्वतःविरोधातील अत्याचार वा हिंसाचार पोलिसांना कळवण्याची शक्यता खूपच कमी असते, त्यामुळे त्या अधिक असुरक्षित अवस्थेत असतात.

बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्याचं डेन्मार्कचं धोरण आहे. कोणी महिला मानवी तस्करीला बळी पडल्याचं दिसून आलं, तरी त्यांनी सरकारपुरस्कृत सुरक्षानिवासात थोडा काळ काढल्यावर आपल्या मायदेशात परत जाणं अपेक्षित असतं.

अस्वस्थ व निराश अवस्थेत रस्त्यांवर फिरल्यानंतर जुएलला स्वतःचा जीव घ्यावा असंही वाटलं होतं, आणि प्रशासनाकडे तक्रार करण्याबाबत ती अनिच्छुक होती. तिच्यावर प्रचंड मोठं कर्ज होतं आणि नायजेरियातील आपल्या कुटुंबाची व आपली सुरक्षितता धोक्यात येईल, अशीही तिला भीती होती.

पण तिचं आयुष्य बदललं. हे अगदी क्षुल्लक किंवा कदाचित परिकथेसारखंही वाटू शकतं- जुएल एका डॅनिश माणसाला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडली. ते पहिल्यांदा सोबत जेवायला गेले, तेव्हा तिने जेवून झाल्यावर त्याला सर्व काही सांगितलं.

"ते ओझं त्याला सहन करावं लागलं," आता तिचा नवरा झालेल्या माणसाविषयी जुएल सांगते.

त्यानंतर जुएलने रस्त्यांवर उभं राहून शरीरविक्री करायचा पेशा बंद केला आणि तिच्या मॅडमला साप्ताहिक परतफेडीसाठी द्यावी लागणारी रक्कम कमावण्यासाठी तिला तिच्या प्रियकराने मदत केली. पण या जोडप्यालाही सल्ल्याची गरज होती. त्यांना मदत करेल अशा कोणाला जुएल ओळखते का, असं तिच्या प्रियकराने विचारलं.

जुएलने मिशेल माइल्डवॉटरने तिला वेस्टरब्रोमध्ये पहिल्या रात्री दिलेलं कार्ड जपून ठेवलं होतं.

मिशेलने जुएलचं समुपदेशन केलं, तिला स्वतःच्या भीतीला सामोरं जाण्यासाठी मदत केली, आणि मॅडमला पैसे देणं थांबवण्यासाठी आवश्यक आत्मविश्वासही दिला. सुदैवाने याचा तिच्यावर किंवा तिच्या कुटुंबीयांवर कोणताही हिंसक परिणाम झाला नाही. कदाचित तिची तस्करी करणारी मंडळी मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याचा भाग नसल्यामुळे असं घडलं असेल.

आता डेन्मार्कमध्ये राहण्यासाठी केलेल्या अर्जाची निष्पत्ती काय होतेय, याची जुएल वाट पाहते आहे. दरम्यान, ती डॅनिश भाषेत पारंगत झाली आहे आणि तिला मूलही झालं आहे. जुएल व मिशेल घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत. जुएलचं लग्न झालं तेव्हा 'होप-नाऊ'मधील कार्यकर्ती मिशेल तिची 'बेस्ट वूमन' म्हणून लग्नसमारंभात सहभागी झाली.

"तो माझ्या आयुष्यातील एक सर्वांत अभिमानाचा क्षण होता. मंचाच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवर मला सोबत करण्यासाठी मिशेल होती," असं जुएल सांगते.

कधीतरी आपण एखाद्या बिझनेस स्कूलमध्ये जाऊ, अशी जुएलला आशा आहे. रस्त्यांवरच्या महिलांसाठी स्वयंसेवी पद्धतीने मदत करायची तिचीही इच्छा आहे.

लॉकडाऊनच्या काही दिवस आधी मिशेल माइल्डवॉटरने जुएलला एका तस्करी झालेल्या महिलेवर नाटक तयार करायला सांगितलं.

स्वतः मिशेल आधी अभिनेत्री होत्या. हे नाटक कोपेनहेगनमधील लोकांसमोर सादर करायला मिशेल यांनी जुएलला प्रोत्साहन दिलं. जुएलने या नाटकाचं नाव 'बाहेर जायची एकमेव वाट आरपार जाते' असं दिलं होतं.

"तो उपचारांसारखाच प्रकार होता. मी नाटकाचा प्रयोग करत असताना जणू काही स्वतःच्या शरीरातून बाहेर येत होते. मी प्रेक्षकांचा भाग असल्यासारखं वटात होतं आणि मला जे काही त्यातून दिसत होतं त्याने खूप हेलावून जायला होत होतं," असं जुएल म्हणते.

"कारण, ही काही केवळ गोष्ट नाहीये- हे लोकांच्या जगण्याचं वास्तव आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)