चीननं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना म्हटलं - 'जरा जपून बोला'

फोटो स्रोत, GREG BAKER/AFP VIA GETTY IMAGE
तैवानच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा सूट देण्याचा विषयच नसल्याचं चीननं म्हटलं आहे.
चीननं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून हे वक्तव्य केलं आहे. चीननं तैवानवर हल्ला केला तर त्याचं रक्षण करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचं बायडन यांनी म्हटलं होतं.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी दैनंदिन ब्रिफिंगमध्ये तैवान हा चीनचाच भाग असल्याच्या त्यांच्या दाव्याचा पुनरुच्चार केला.
"चीनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकता यांसारख्या हितांच्या मुद्द्यांचा विषय असेल तर, तडजोड किंवा सूट देण्याचा प्रश्नच येत नाही," असं ते म्हणाले.
सार्वभौमत्व आणि एकता यांचं रक्षण करण्यासाठी आमची कटिबद्धता आणि क्षमता यांना कमी लेखता कामा नये, असंही वांग वेनबिन म्हणाले.
गेल्या काही आठवड्यांमधये चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढला आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत अतिक्रमण केलं होतं.
"तैवान हा चीनचा अविभाज्य भाग आहे. तैवान मुद्दा हा पूर्णपणे चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यात विदेशी हस्तक्षेपाला आम्ही परवानगी देत नाही," असं वांग वेनबिन यांनी ब्रिफिंगदरम्यान म्हटलं.
तैवानबद्दल बोलत असताना अमेरिकेनं शब्दांचा वापर जपून, काळजीपूर्वक करायला हवा. चीन आणि अमेरिकेतील संबंधांना हानी पोहोचू नये आणि तैवानमध्ये शांतता आणि स्थैर्य काम राहावं यासाठी, अमेरिकनं तैवानच्या स्वातंत्र्यासंदर्भात फुटीरतावादी शक्तींना वेगळा संदेश देता कामा नये, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले होते बायडन?
चीननं तैवानवर हल्ला केला तर अमेरिका तैवानचं रक्षण करेल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं होतं. तैवान बाबत अमेरिकेच्या यापूर्वीच्या भूमिकेच्या वेगळी भूमिका घेत, बायडन यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अमेरिका तैवानचं संरक्षण करेल का? असा प्रश्न अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विचारण्यात आला होता. त्यावर ''हो, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,'' असं बायडन म्हणाले होते.
अमेरिकेतील सीएनएन या वृत्तवाहिनीच्या टाऊनहॉल कार्यक्रमात चीननं नुकत्याच केलेल्या हायपरसोनिक क्षेपणास्त्र चाचणीचा उल्लेख करत बायडन यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. चीनच्या लष्कराचा सामना करण्यासाठी काय कराल? असंही बायडन यांना विचारण्यात आलं होतं.
''हो. पण त्यांची शक्ती वाढत असली तरी, त्यामुळं निराश व्हायची गरज नाही. कारण आमचं लष्कर सर्वात शक्तीशाली असल्याचं चीन, रशिया आणि उर्वरित जगालाही माहिती आहे,'' असं बायडन यांनी या प्रश्नांचं उत्तरं देताना म्हटलं.

फोटो स्रोत, JOE BIDEN/FACEBOOK
त्यावर सीएनएनचे अँकर अँडर्सन कूपर यांनी बायडन यांना आणखी एक प्रश्न विचारला. चीननं तैवानवर हल्ला केला तर अमेरिका मदतीसाठी पुढं येईल का? त्यावर बायडन यांनी, ''हो, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,'' असं उत्तर दिलं.
मात्र, बायडन यांच्या वक्तव्यावर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं. अमेरिकेनं त्यांच्या मूळ धोरणात काहीही बदल केलेला नाही, असं त्यांनी म्हटलं.
मात्र, असं घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही बायडन यांनी एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये तैवानबाबत असंच वक्तव्य केलं होतं. त्यावेळीही व्हाइट हाऊसनं स्पष्टीकरण देत, अमेरिकेनं धोरण बदललं नसल्याचं म्हटलं होतं.
तैवाननं काय म्हटलं?
आम्ही दबावानं लगेचच झुकणार नाही, किंवा पाठिंबा मिळतोय म्हणून घाईत आम्ही कोणतं पाऊलही उचलणार नाही, असं तैवानच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं म्हटलं.
तैवान अत्यंत ताकदीनं स्वतःचं संरक्षण करेल, असं तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते झेवियर चेंग यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या बायडन प्रशासनानं वारंवार तैवानला पाठिंबा दिला आहे, हेही चेंग यांनी मान्य केलं.
दरम्यान, बायडन यांच्या वक्तव्यापूर्वी गुरुवारी संयुक्त राष्ट्रांत चीनचे राजदूत चांग जुन यांनी तैवानबाबत अमेरिकेची भूमिका धोकादायक असल्याचं म्हटलं होतं.
चीन-तैवानचं नातं
- चीन आणि तैवान यांच्यातील संघर्षाला मोठा इतिहास आहे. 1940 च्या दशकात गृह युद्धादरम्यान चीन आणि तैवान यांचं विभाजन झालं होतं. त्यानंतर तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणतो, तर चीन त्यांना स्वायत्त प्रांत म्हणतो. गरज पडल्यास सामर्थ्याच्या जोरावर त्याचा चीनमध्ये समावेश करण्याचं वक्तव्यही चीन करतो.
- तैवानचं स्वतंत्र संविधान, लोकशाही पद्धतीनं निवडलेले नेते आणि सुमारे तीन लाखांचं सक्रिय लष्कर आहे.
- तैवानला काही देशांनीच मान्यता दिली आहे. बहुतांश देश चीनला तैवानचाच भाग मानतात. अमेरिकेचेही तैवानबरोबर अधिकृत द्विपक्षीय संबंध नाहीत. मात्र, अमेरिका तैवान रिलेशन्स अॅक्ट अंतर्गत त्यांना शस्त्र विक्री करतो. तैवानला स्वसंरक्षणासाठी आवश्यक असलेली मदत पुरवण्याचा उल्लेख, त्या कायद्यात आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























