अफगाण तालिबान :'आत्मघातकी हल्लेखोर अफगाणिस्तानचे हिरो'

    • Author, सारा अतीक
    • Role, बीबीसी उर्दू
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

तालिबाननं 2011 मध्ये काबूलमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हल्ला केला होता. नऊ वर्षांनी तालिबानच्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना त्याच पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांना पैसे आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं.

हक्कानी नेटवर्कचे प्रमुख आणि अफगाणिस्तानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी हेदेखील सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी आत्मघातकी हल्लेखोरांचं कौतुक केलं. "ते देशाचे आणि आमचे हिरो आहेत," असं ते म्हणाले.

तालिबाननं आत्मघातकी हल्लेखोरांच्या कुटुंबीयांना 10 हजार अफगाण रुपयांसह एक प्लॉट देण्याचं आश्वासनही दिलं होतं.

युद्धासाठी आत्मघातकी हल्लेखोरांचा वापर करणारा अफगाण तालिबान हा एकमेव गट नाही. जपानसह जगभरातील सैन्यानं आणि कट्टरतावादी गटांनी जगातील शत्रूंच्या विरोधात लढताना, आत्मघातकी हल्लेखोरांची, मदत घेतली आहे.

मात्र तालिबाननं अशाप्रकारे आत्मघातकी हल्लेखोरांना उघडपणे प्रोत्साहन दिलेलं पाहून, अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. तर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

या नाराजीचं कारण म्हणजे, आत्मघातकी हल्ल्यांमध्ये मारले गेलेले बहुतांश सर्वसामान्य अफगाण नागरिक होते. शिवाय ज्या हॉटेलमध्ये या हल्लेखोरांना देशाचे हिरो ठरवण्यात आलं, त्या हॉटेलवर तालिबाननं एक नव्हे तर दोन वेळा हल्ला केला होता आणि त्यात अनेक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता, हादेखील योगायोग नव्हे.

तालिबाननं जेव्हा या सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला, त्यावर अनेक अफगाण नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये विदेशी सैनिकांबरोबरच मोठ्या प्रमाणावर सामान्य अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं या हल्लेखोरांचं कौतुक होणं, दुर्दैवी आहे, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.

तालिबाननं सत्तेत आल्यानंतर हल्लेखोरांचं कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान नेते अनस हक्कानी यांनी एक आत्मघातकी हल्लेखोराच्या कबरीवर 'फातिहा' पठण (श्रद्धांजली) करत त्याचेही फोटो पोस्ट केले होते.

शिवाय तालिबाननं हल्लेखोरांचं कौतुक करणारा एक व्हीडिओदेखील प्रसिद्ध केला आहे. त्यात तालिबानसाठी आत्मघातकी हल्ले करणाऱ्यांचे फोटो आणि नाव होते. त्याशिवाय तालिबानशी संलग्न सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हीडिओदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात असे हल्लेखोर वापरत असलेले आत्मघातकी जॅकेट्सदेखील दाखवण्यात आले आहेत.

'आत्मघातकी हल्लेखोर आमचे हिरो'

एकिकडं अफगाण तालिबानचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नजरेत त्यांची कट्टरतावादी प्रतिमा बदलून त्यांना जबाबदार राष्ट्र म्हणून मान्यता मिळावी यासाठी आहे. त्याचवेळी दुसरीकडं कट्टरतावादाची ओळख सांगणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यांचं कौतुक करणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं?

आंतरराष्ट्रीय सैन्याच्या विरोधात युद्धादरम्यान मारल्या गेलेल्या लोकांमुळंच हे यश मिळालं असल्याचं, तालिबानच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते कारी सईद खोस्ती यांनी म्हटलंय.

"हे आत्मघातकी हल्लेखोर आमचे हिरो आहेत. आमच्या हिरोंचं कौतुक करणं आमचं कर्तव्य आहे. तसंच हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. आमच्या अंतर्गत मुद्द्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाही नाही."

कारी सईद यांनी यावर टीका करणाऱ्यांचे दावे फेटाळले आहेत. या हल्ल्यांमध्ये अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला नाही, असं ते म्हणाले.

मात्र, प्रत्यक्षात, केवळ 2011 मध्ये काबूलच्या इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्येच, 11 अफगाण नागरिक मारले गेले होते. तसंच 20 वर्षे चाललेल्या या संघर्षादरम्यान अशा शेकडो हल्ल्यांत लाखो अफगाण नागरिकांचा जीव गेला आहे.

तालिबान सरकारनं अमेरिका आणि नाटोच्या दलांच्या विरोधात हल्ले करणारे आत्मघातकी हल्लेखोर इस्लाम आणि आमच्या देशाचे हिरो आहेत, असं ट्वीट केलं. मात्र, या फोटोमध्ये गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचा चेहरा लपवण्यात आला आहे.

सार्वजनिकरित्या कौतुक करण्याचा उद्देश काय?

"तालिबानमध्ये आत्मघातकी हल्लेखोरांना महत्त्वाचं स्थान आहे. हे हल्लेखोर अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात तालिबानच्या यशामागची खरी शस्त्रं आहेत," असं मत दहशतवाद विरोधी तज्ज्ञ अब्दुल सईद यांनी व्यक्त केलं.

"त्यामुळं तालिबानकडून त्यांच्या सदस्यांसाठी हा एक संदेश होता. ते जीवंत नसले तरी, तालिबानच्या नेतृत्वात त्यांचं महत्त्वं आणि आदर असल्याचं, त्यांनी यातून दाखवून दिलं."

मृत हल्लेखोरांच्या कुटुबीयांना देशात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी त्यांना विशेष ओळखपत्र दिलं जाणार असल्याचंही हक्कानी म्हणाले.

तालिबानच्या या पावलानं त्यांच्या सरकारला मान्यता मिळण्याच्या दृष्टीनं नुकसान झालं असल्याचं, अब्दुल सईद यांचं म्हणणं आहे.

अंतर्गत विचार करता तालिबान समर्थक आणि सदस्य या सोहळ्यासाठी सिराजुद्दीन हक्कानी यांचं कौतुक करत आहेत. मात्र बाह्य जगात तालिबानवर यामुळं प्रचंड टीका झाली आहे. त्यामुळं त्यांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता अब्दुल सईद यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय समुदायानं भेदभाव न करता त्यांच्याबरोबर वर्तन करावं अशी तालिबानची इच्छा आहे. मात्र त्यासाठी तालिबाननं हिंसक भूतकाळातून बाहेर यावं अशी आंतरराष्ट्रीय समुदायाची इच्छा आहे. मात्र, आत्मघातकी हल्लेखोरांशी संबंध संपवणं तालिबानला शक्य नाही, त्यामुळं तालिबान त्यांचं कौतुक करतं, असंही ते म्हणाले.

या पावलामुळं तालिबानला त्यांच्या हिंसक भूतकाळाचा विचार करता एक जबाबदार राष्ट्र म्हणून स्वीकारलं जाऊ शकतं का? असे प्रश्न पाश्चिमात्य माध्यमांद्वारे उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे.

सरकार नव्हे कट्टरतावादी

तालिबानमध्येही तीन प्रकारचे गट असल्याची माहिती अफगाणिस्तानात राहणारे राजकीय विश्लेषक अजिज अमीन यांनी दिली.

त्यांच्या मते, एक गट हा उदारमतवादी आहे. ते दोह्यामध्ये राजकीय चर्चा आणि संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरा गट कट्टरतावाद्यांचा आहे. त्यात हक्कानी नेटवर्कचाही समावेश आहे. त्यांना त्यांच्या युद्धाच्या रणनितीमुळं यश मिळालं असल्याचं त्यांचं मत आहे. त्यामुळं तालिबाबनं कट्टर भूमिका सोडू नये, असंही त्यांचं मत आहे.

तिसरा गट हा वेळप्रसंगी कोणच्या बाजुनं जायचं याचा निर्णय घेता यावा, यासाठी अत्यंत काळजीपूर्वकपणे या दोन्ही गटांचं निरीक्षण करत आहे.

अजिज अमीन यांच्या मते, "एकिकडं एक गट मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून जगासमोर उदार आणि शांतिप्रिय गट असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी दुसरा गट हा विचारसरणीच्या विरोधात पावलं उचलत आहे. त्यामुळं तालिबान एका धोरणावर सहमत नसल्याचे संकेत मिळतात."

अंतर्गत किंवा बाह्य विश्वसनीयतेला धक्का पोहोचत असला तरी, तालिबानचं हे पाऊल केवळ त्यांच्या सदस्यांना खूश करण्याचा प्रयत्न असल्याचंही अमीन म्हणतात.

"तालिबानचं वर्तन सरकारसारखं नाही, तर कट्टरतावाद्यांसारखं आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांना यामुळं काय वेदना होतात यानं त्यांना फरक पडत नाही. कारण या हल्ल्यांमध्ये मारले गेलेले बहुतांश सामान्य अफगाणी नागरिक होते," असंही त्यांनी सांगितलं.

कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळेल

या सोहळ्याचं आयोजन हक्कानी नेटवर्कचे प्रमुख असलेल्या सिराजुद्दीन हक्कानी यांनी केलं. हक्कानी नेटवर्कला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी संघटना जाहीर केलं आहे. तसंच अफगाणिस्तानात 20 वर्षं चाललेल्या युद्धात नाटो आणि अमेरिकेच्या लष्करावर सर्वाधिक विनाशकारी हल्ले हक्कानी नेटवर्कनेच केले होते.

त्याशिवाय जगभरात आत्मघातकी हल्लेखोर आणि अशा संघटनांच्या सदस्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांचा वापर करणं यासाठीही या संघटनेला ओळखलं जातं. अगदी ओसामा बिन लादेन आणि अब्दुल्ला यूसुफ अझ्झाम यांनाही हक्कानी नेटवर्कनं भरती करून प्रशिक्षण दिलं आहे.

तालिबानकडून आत्मघातकी हल्लेखोरांचं असं उघडपणे कौतुक केल्यानंतर या परिसरात कट्टरतावादाला प्रोत्सासहन मिळेल, असं अब्दुल सईद म्हणाले. अशा प्रकारचे प्रयत्न दहशतवादी संघटनांच्या दृष्टीनं, त्यांची शक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सदस्यांचा विश्वास मिळवण्यासाठी अत्यंत उपयोगी असल्याचं मत, अब्दुल सईद यांचं आहे.

"ज्या आदरानं या मृत आत्मघातकी हल्लेखोरांचा उल्लेख जिहादींचे हिरो म्हणून करण्यात आला, त्यामुळं निश्चितपणे इतर तरुणांना त्यांच्या समाज किंवा मित्रांच्या गोटात अशा प्रकारचा सन्मान मिळवण्याचं आकर्षण निर्माण होईल. विशेषतः जीवनात अनेक प्रकारच्या नैराश्याचा सामना करणारे, अशा प्रकारच्या संघटनांमध्ये सहभागी होतात," असंही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)