You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इथले गँगस्टर बैठकीत गांजा पित मारतात उंदरांवर ताव
इटलीच्या दक्षिण बाजूस असलेल्या रेगियो कॅलब्रिया परिसरात एका गांजाच्या शेतावर पोलिसांनी धाड टाकली. पण याठिकाणी गांजासोबतच अशा काही गोष्टी आढळून आल्या ते चक्रावून सोडणारं आहे.
या धाडीत पोलिसांना गोठवलेल्या अवस्थेतील सुमारे 235 दुर्मिळ उंदरांचा साठा सापडला. हे उंदीर याठिकाणी माफिया लोकांच्या पाहुणचारासाठी वापरले जातात, अशी माहिती समोर आली आहे.
याठिकाणी सापडलेले उंदीर हे डॉर्माऊस नावाने ओळखले जातात. उंदरांची ही प्रजात अतिशय दुर्मिळ असून ती आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडात काही भागात आढळून येते.
या उंदरांचा आकार अतिशय लहान असतो. हा 6 सेंटीमीटर ते 19 सेंटीमीटर इतक्या आकाराचा असतो. वजन 15 ते 180 ग्रॅमच्या आसपास असतं. यांना इटलीमध्ये संरक्षित जीव म्हणून संबोधलं जातं.
या परिसरात गांजाची शेती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले. तिथं त्यांना 700 च्या वर गांजाची झाडे आढळून आले.
या भागातील आजूबाजूच्या घरांमध्ये पोलिसांनी तपास केला असता तिथलं दृश्य आश्चर्यचकित करणारं होतं.
याठिकाणी शेकडोंच्या संख्येने उंदरांसाठीचे पिंजरे होते. तसंच फ्रिजरमध्ये अनेक उंदीर गोठवलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले होते.
याप्रकरणात पोलिसांनी 3 जणांना घटनास्थळावरून अटक केली आहे.
लिपू या वन्यजीव संरक्षण समूहाने येथील उंदरांबाबत अधिक माहिती दिली. त्यांच्या मते, हे उंदीर वरीष्ठ गँगस्टर्सच्या पाहुणचारासाठी वापरली जातात. येथील कॅलेब्रियन एनड्रॅनघेटा माफिया गँगच्या उच्चपदावरील गँगस्टर्सची ही आवडती डिश आहे.
इटलीतील अॅस्प्रोमाँट हिल्स भागात या उंदरांना पकडण्यासाठी बेकायदेशीररित्या सापळे लावण्यात आलेले आहेत.
उंदीर पकडणाऱ्या व्यक्ती तिथून हे उंदीर आणून येथील गँगस्टर तसंच काही रेस्टॉरंट्सनाही विकतात, असं लिपू संघटनेने सांगितलं.
एनड्रॅनघेटा माफिया गँगमधील उच्चपदस्थ गँगस्टर डॉर्माऊस उंदरांचं नियमितपणे सेवन करतात. विशेषतः महत्त्वांच्या बैठकांदरम्यान गांजा पित या उंदरांचा आस्वाद गँगस्टर घेतात, अशी बातमी येथील कोरेरे डेला सेरा या स्थानिक वृत्तपत्राने दिली आहे.
इटलीशिवाय क्रोएशिया आणि स्लोव्हेनिया या देशांमध्येही डॉर्माऊस उंदीर चवीने खाल्ले जातात.
एनड्रॅनघेटा माफिया गँग ही जगातील सर्वाधिक श्रीमंत गुन्हेगारी गँग्सपैकी एक मानली जाते. इटलीच्या दक्षिण भागात कॅलेब्रिया शहरातून या गँगचं काम प्रामुख्याने चालवलं जातं.
या गँगनेच लॅटीन अमेरिकेतून कोकेन आणि उत्तर आफ्रिकेतून गांजा युरोपात आणला, असं म्हटलं जातं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)