You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
LGBTQA : नवीन सुपरमॅन असेल बायसेक्शुअल, डीसी कॉमिक्सचा क्रांतिकारी निर्णय
लाखो किशोरवयीन मुला-मुलींच्या भावविश्वाचा भाग असलेल्या डीसी कॉमिक्सने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
नव्या कॉमिक्स सीरिजमध्ये सुपरमॅन जॉन केंट हा बायसेक्शुअल असणार आहे.
बायसेक्शुअल म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला पुरुष आणि स्त्री या दोन्ही लिंगांच्या व्यक्तींचे शारीरिक आकर्षण असते.
पहिल्यांदाच कॉमिक्सच्या दुनियेतील एखादा मोठा सुपरहिरो बायसेक्शुअल दाखवण्यात येणार असल्याचं डीसी कॉमिक्सने जाहीर केलं आहे.
नोव्हेंबरमध्ये प्रकाशन होणार असलेल्या नव्या कॉमिक्समध्ये, सुपरमॅनचं हे नवं रूप चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
सुपररमॅन आणि त्याचा मित्र जय नाकामुरा यांच्यात 'रोमॅंटिक रिलेशनशिप' पाहायला मिळणार आहे.
सुपरमॅन क्लार्क केंट ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा आहे. क्लार्क केंट आणि त्याची प्रेयसी लुईस लेन यांचा मुलगा जॉन केंट हा नवा सुपरमॅन बनला आहे. वडील क्लार्क केंट यांच्याकडून जॉन सुपरमॅनची सूत्रं हाती घेतो.
'सुपरमॅन- सन ऑफ काल एल' या सीरिजचा हा भाग आहे.
'नॅशनल कमिंग आऊट डे' (11 ऑक्टोबर) या दिवशी डीसी कॉमिक्सने सुपरमॅनच्या या बदलत्या व्यक्तिमत्वासंदर्भात घोषणा केली. अमेरिकेत एलजीबीटीक्यू जागरुकतेसंदर्भात हा दिवस पाळला जातो.
सुपरमॅन आणि जय यांचं नातं
जुलैमध्ये प्रकाशित झालेल्या सीरिजमध्ये, जॉन याने हवामान बदलामुळे लागलेल्या वणव्यांविरोधात लढा दिला होता.
शाळेत झालेल्या गोळीबारीविरुद्ध आवाज उठवला होता तसंच स्थलांतरितांना परत पाठवण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली होती.
त्याआधीच्या अंकात जॉनची जय नावाच्या चष्माधारी गुलाबी रंगाचे केस असलेल्या मुलाशी मैत्री झाली होती. आगामी अंकांमध्ये दोघांमधले प्रेमसंबंध बहरतील असं डीसी कॉमिक्सने म्हटलं आहे.
प्रत्येकाला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुपरमॅनची शारीरिक आणि मानसिक शक्ती खर्च झाली आहे. त्यानंतर जॉन आणि जय हे जवळ येतात असे कथानक आहे.
कथानकाचे बाकी तपशील समोर आलेले नाहीत मात्र सुपरमॅन आणि जय हे किस करत असल्याचं चित्र डीसी कॉमिक्सने प्रसिद्ध केलं आहे.
'नवीन बदलाला सामोरं जाणं'
या सीरिजचे लेखक टॉम टेलर यांनी बीबीसीला सांगितलं की, "जेव्हा मला सुपरमॅन लिहिण्यासाठी विचारणा झाली तेव्हा आजच्या काळातला सुपरमॅन कसा असेल हा विचार डोक्यात आला."
"जर नवा सुपरमॅन हा जुन्या सुपरमॅनसारखाच स्ट्रेट दाखवण्यात आला असता तर त्यात काहीच नाविन्य नसतं," असं टेलर यांना वाटतं
सुपरमॅन बायसेक्श्युल आहे असं दाखवायचं का या विचारात टेलर असताना डीसी कॉमिक्सने त्यांना सुखद धक्का दिला. यावेळी आपण सुपरमॅन बायसेक्शुअल आहे असं दाखवण्याच्याच विचारात आहोत असं डीसी कॉमिक्सनेच टेलर यांना सांगितलं.
"गेल्या काही वर्षात हा बदल झाला आहे. पाच ते दहा वर्षांपूर्वी असा विचार कदाचित झाला नसता. पण झालेला बदल स्वागतार्ह आहे," असं टेलर यांनी सांगितलं.
काही प्रमाणात ट्रोलिंग तर काही ठिकाणी निर्णयाचं स्वागत
सोशल मीडियावर सुपरमॅनच्या या रूपाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं असलं तरी बाकी चाहत्यांचा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे असं टेलर म्हणाले.
ही बातमी वाचल्यावर अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आम्ही स्वत:ला सुपरमॅनमध्ये पाहू शकतो अशा भावना काहींनी व्यक्त केल्या.
सगळ्यांत शक्तिशाली सुपरहिरो हा आमच्यासारखा असेल असं काहींनी लिहिलं आहे.
तुम्हाला अशी काही माणसं भेटलीत जी सांगतील की कॉमिक्स सीरिजमध्ये राजकारण आणू नका. प्रत्येक कॉमिक सीरिजचं पुस्तकं हे एकप्रकारे राजकीयच असतं.
एक्स मेन ही मार्व्हल कॉमिक सीरिज आणि त्यातली पात्रं मानवाधिकार चळवळीसंदर्भातली दाखवण्यात आलं होतं.
"आम्ही समाजातल्या एका वर्गाला आमच्याबरोबर जोडू पाहत आहोत. असाही सुपरमॅन लोक पाहतील अशी आम्हाला आशा आहे. हा सुपरमॅन माझ्यासारखा आहे. मला ज्या गोष्टींविषयी कणव वाटते त्यासाठी संघर्ष करणारा असा हा सुपरमॅन आहे असं लोकांनी म्हणावं," असं टेलर यांना वाटतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)