अफगाणिस्तान : कुंदुज प्रांतात मशिदीवर हल्ला, 50 जणांचा मृत्यू

कुंदुज हल्ला

फोटो स्रोत, REUTERS/Stringer

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अफगाणिस्तानच्या कुंदुज प्रांताच्या उत्तर पूर्वेला असलेल्या एका शिया मशिदीवर शुक्रवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 50 जणांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला असून जखमींचा आकडाही मोठा असल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं स्थानिकांच्या हवाल्यानं दिलं आहे.

तर, मृतांचा आकडा हा 140 पेक्षा अधिक असल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अफगाणिस्तानच्या सरकारचा पाठिंबा असलेल्या बख्तियार या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

असोसिएटेड प्रेस या वृत्त संस्थेनं तालिबानच्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्यानं मृतांचा आकडा किमान शंभरच्या आसपास असल्याचं म्हटलं आहे.

कुंदुज हल्ला

फोटो स्रोत, EPA/STRINGER

शुक्रवारी मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी 300 पेक्षा अधिक जण एकत्र आले होते. त्याचवेळी हल्ला झाल्याचं स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांनी टोलो न्यूजच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

अमेरिकेचे सैनिक परतल्यानंतर देशात झालेला हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

अल्पसंख्याक असलेल्या शिया समुदायाच्या सय्यद अबद मशिदीमध्ये फरशीवर प्रचंड रक्त साचल्याचं घटनास्थळी असलेल्या व्हीडिओ फुटेजमध्ये दिसत आहे.

"स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.40 वाजता मोठा स्फोट झाला. मी स्फोटाचा आवाज ऐकला त्यावेळी शुक्रवारच्या नमाजसाठी मशिदीजवळ अनेक लोक जमलेले होते," असं एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं.

"मी स्फोट झाला त्या ठिकाणाच्या जवळच होतो. मला असं वाटलं जणू जगाचा अंतच होत आहे. मी किती मृतदेह माझ्या गाडीतून इथून बाहेर आणले हे मी सांगूही शकत नाही. अल्लाहनं सर्व मुस्लिमांवर कृपा करावी."

कुंदुज हल्ला

फोटो स्रोत, EPA/STRINGER

हल्ल्यानंतर जल्मे अलोकाजी नावाचे एक स्थानिक व्यापारी गरज असलेल्यांना रक्तदान करण्यासाठी स्थानिक रुग्णालयात पोहोचले होते. रुग्णालयात सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं, असं ते सांगतात.

घटनास्थळावरून एकापाठोपाठ एक रुग्णवाहिकांमध्ये मृतदेह नेले जात होते, असं ते वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.

कोणीही घेतली नाही जबाबदारी

अद्याप कोणत्याही गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र स्थानिक इस्लामिक स्टेटसह सुन्नी मुस्लीम कट्टरततावादी गट हे शिया गटाच्या लोकांना लक्ष्य करत असतात. हे लोक शिया समुहाच्या मुस्लिमांना खरे मुस्लिम मानत नाहीत.

अफगाणिस्तानात तालिबानच्या सरकारला विरोध करणारा इस्लामिक स्टेट खुरासान हा गट इस्लामिक स्टेटला पाठिंबा असलेला एक स्थानिक गट आहे. या गटानं गेल्या काही दिवसांत देशात हिंसक घटना घडवल्या आहेत. यापैकी बहुतांश हल्ले देशाच्या पूर्व भागात करण्यात आले आहेत.

तालिबानसाठी मोठा धोका - बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांचं विश्लेषण

अद्याप कोणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी, काबूल विमानतळावर स्फोट घडवणाऱ्या इस्लामिक स्टेट खुरासाननं हा हल्ला केल्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत या गटाचे सदस्य मशिदी, शाळा, स्पोर्ट्स क्लब अशा ठिकाणी अफगाणिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या शिया समुदायाला लक्ष्य करत आहेत.

गेल्या काही दिवसांत इस्लामिक स्टेटनंही तालिबानच्या विरोधात हल्ले करण्याचं प्रमाण वाढवलं आहे.

रविवारी काबूलमध्ये एका अंत्ययात्रेवर हल्ला करण्यात आला होता. त्यात तालिबानच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. त्याशिवाय पूर्वी इस्लामिक स्टेटचा बालेकिल्ला असलेल्या नंगरहार आणि कुनारमध्येही त्यांनी लहान मोठे हल्ले घडवले आहेत.

कुंदुज हल्ला

फोटो स्रोत, EPA/STRINGER

शुक्रवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही इस्लामिक स्टेटनं घेतली तर, ही संघटना देशाच्या उत्तर भागात पाय पसरत आहे, असं म्हणणं गैर ठरणार नाही.

तालिबाननं इस्लामिक स्टेटच्या अनेक सदस्यांना अटक केल्याचा दावा केला आहे. तसंच या समुहाशी संबंध ठेवणाऱ्या अनेक लोकांना संपवल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

मात्र सार्वजनिकरित्या तालिबाननं अद्याप इस्लामिक स्टेटचा धोका फार मोठा नसल्याचं म्हटलं आहे.

तालिबान सत्तेत आल्यानं देशात कठोर शासनं राहिलं तरी शांतता प्रस्थापित होईल, असं अनेक अफगाण नागरिकांना वाटत आहे. मात्र तालिबानच्या शांतता आणि स्थैर्याच्या आश्वासनासाठी तालिबान हा मोठा धोका ठरत आहे.

याच वर्षी ऑगस्टच्या अखेरीस अफगाणिस्तानहून अमेरिकेच्या आणि नाटो लष्करानं पूर्णपणे माघार घेतली. त्याच्या काही दिवसांपूर्वी तालिबाननं देशाची सत्ता काबीज केली होती.

वीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा पुन्हा देश तालिबानच्या ताब्यात गेला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2011 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला करत, तालिबानला सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)