ऑलिंपिकपटूला पॉर्न पाहण्याची सवय 12 व्या वर्षीच लागली, 'अशी' झाली या विळख्यातून सुटका

फ्रेडी वुडवर्ड
फोटो कॅप्शन, फ्रेडी वुडवर्ड
    • Author, माइया डेव्हिस, स्मिता मुंडासाद आणि अ‍ॅना क्रॉसले
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

ग्रेट ब्रिटन (GB) डायव्हर्स टीमचा माजी सदस्य आणि ऑलिंपिकपटू फ्रेडी वुडवर्डचा संघर्ष हा वेगळा होता. फ्रेडी किशोरावस्थेत असताना त्याच्या लक्षात आलं की त्याला पॉर्न पाहण्याची गंभीर समस्या आहे.

'जेव्हा मी स्वस्थ बसलो तर तेव्हा मला एकच गोष्ट वाटायची ती म्हणजे कधी एकदा मी त्या साइट्स ओपन करेन,' तो सांगतो.

वयाच्या 12 व्या वर्षापासूनच तो या 'हार्डकोअर' साईट्स पाहत असे. एका बाजूला त्याची क्रीडा क्षेत्रातील कारकीर्द बहरू लागली होती आणि त्याला ऑलिंपिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्याची देखील संधी मिळाली. तर दुसऱ्या बाजूला तो दिवसभरातून अनेक वेळा पॉर्न साईट्स पाहू लागला होता.

आता वयाच्या तिशीत असलेल्या या ऑलिंपिकपटूने सांगितले आहे की, त्याने त्याची या सवयीतून सुटका करून घेतली आहे. मनाचा दृष्टिकोन बदलून आपण हे केल्याचं तो सांगतो.

"तुम्ही अशी व्यक्ती असू शकत नाही जी पॉर्न सोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्हाला अशी व्यक्ती व्हावं लागेल जी पॉर्न पाहत नाही आणि या गोष्टीसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते," असं तो सांगतो.

पण आपण हे केव्हा म्हणू शकतो की पॉर्न पाहण्याची तुमची सवय ही आता तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक नाहीये आणि ही सवय कशी सोडता येऊ शकते?

सध्या आपल्या ऐकण्यात बऱ्याच वेळा 'पॉर्न अ‍ॅडिक्शन' म्हणजेच 'पॉर्नचे व्यसन' असा शब्द येतो. परंतु अद्याप या गोष्टीचा व्यसनाच्या वर्गीकरणात अधिकृतरीत्या समावेश करण्यात आलेला नाही.

'आम्हाला पॉर्नशी निगडीत गंभीर समस्या असलेले लोक माहिती आहेत,' असं सिल्वा निव्ह्स सांगतात.

सिल्वा निव्ह्स हे सेक्स आणि रिलेशनशिप थेरपिस्ट आहेत. यासंबंधीच्या अनेक केसेस आपल्या प्रायव्हेट क्लिनिकमध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पण पॉर्नची समस्या हे खरंच व्यसन आहे का? यावर अजून तज्ज्ञांचे एकमत नाहीये. जसं की ड्रग्सच्या वापराबाबत निश्चितपणे कळतं आणि त्यातून संबंधित व्यक्तीला कसं सोडवायचं हे लक्षात येऊ शकतं तसं यात नाहीये.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधक कॅम्पबेल इन्से सांगतात, "बहुतांश वैद्यकतज्ज्ञांची यावर सहमती आहे की पॉर्नच्या गंभीर वापराची समस्या लोकांना जाणवत आहे. पण याची कारणे आणि उपाय यासंबंधित अनेक बाबींचा उलगडा होण्याचे अद्याप बाकी आहे."

याचाच अर्थ असा आहे की, लक्षणांची एक निश्चित यादी अद्याप नाहीये. तसेच ज्या लोकांना असं वाटतं की, आपण या समस्येनी ग्रासलेलो आहोत त्यांच्यासाठी उपचाराची निश्चित पद्धती उपलब्ध नाहीये.

काही वैद्यकतज्ज्ञांच्या मते ही गोष्ट 'कंपलसिव्ह सेक्शुअल बिव्हेअर डिसऑर्डर' या वर्गवारीत येते. ही एक अवस्था आहे अशी दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे.

"ही एक लैंगिक वर्तणूक आहे, जी नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि त्यामुळे गंभीररीत्या परिणाम होऊन त्रास होतोय. हे वर्तन नियंत्रणात आणण्याचे वारंवार प्रयत्न करून देखील त्यावर त्यांना नियंत्रण मिळवता येत नाहीये," असं सायकोथेरपिस्ट डॉ. पॉला हिल सांगतात. त्या लॉरेल सेंटर या ठिकाणी प्रॅक्टिस करतात.

सेक्स आणि पॉर्नची समस्या सोडवण्यासाठी आलेल्या लोकांना लॉरेल सेंटर या नॉन प्रॉफिट सेंटरमध्ये सहकार्य केलं जातं.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) नुसार, कोणत्याही गोष्टीचं व्यसन होऊ शकतं. त्यामध्ये सेक्सचा देखील समावेश आहे.

आरोग्याला अपायकारक ठरू शकेल या प्रमाणात पॉर्न पाहण्याची सवय लागली आहे की नाही हे कसं ओळखता येईल?

निव्ह्स सांगतात, "तुम्ही किती वेळा आणि किती काळासाठी पॉर्न पाहता यावर ते अवलंबून नाही, तर त्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर कसा परिणाम होतोय यावर ते अवलंबून आहे."

निव्ह्स पुढे सांगतात, उदाहरणार्थ रात्रभर जागून पॉर्न पाहिल्यामुळे तुम्ही ऑफिसात उशिरा येत आहात. आपल्या आप्त स्वकीयांसोबत वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही पॉर्न पाहायला प्राधान्य देत आहात किंवा ऑफिसमध्ये पॉर्न पाहत आहात.

तर कॅम्पबेल इन्से सुचवतात, स्वतःला विचारण्यासारखा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा तुम्ही पॉर्न पाहणं सोडू शकता का आणि त्याचा तुम्हाला काही अपाय तर होत नाहीये ना. तसेच, आता त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद कमी कमी होतोय, पण तरी देखील तुम्ही पाहतच आहात, हे प्रश्न स्वतःला विचारावेत.

इन्से यांचे संशोधन पॉर्नचा गंभीर वापर यावर केंद्रित आहे.

लॉकडाऊनमध्ये लागली सवय

क्रेगला स्वतःला 'या सवयीतून सावरण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती' असं संबोधतो. कोव्हिड-19 च्या काळात जेव्हा तो त्याच्या तिशीच्या मध्यात होता तेव्हा त्याला जाणवलं की त्याचं पॉर्न पाहण्याच्या कृतीवर नियंत्रणच नाहीये.

या गोष्टीने त्याला विचार करण्यास भाग पाडल्याचं तो सांगतो.

लॉकडाऊन लागेपर्यंत ही काही मोठी समस्या असल्याचा मी कधीच विचार केला नाही, पण त्या काळात अतिरिक्त तणाव, अतिरिक्त एकटेपणा यामुळे या समस्येत गंभीररीत्या वाढ झाली, असं तो सांगतो.

'मलाच कळत नव्हतं की या विळख्यातून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची.'

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

"काही लोकांना पॉर्न पाहिल्यावर सामाजिक, नैतिक आणि धार्मिक कारणांमुळे अवघडल्यासारखे वाटू शकते. त्याचा त्रास जाणवू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुमची सवय नियंत्रणाबाहेर गेली आहे," असं इन्से सांगतात.

"काही जण आठवड्यातून 3 वेळा 5 मिनिटांसाठी पॉर्न पाहत असतील, पण त्यांना त्या गोष्टीची इतकी लाज वाटत असेल, की ते स्वतःबाबत असा विचार करत असतील की आपण पॉर्न अ‍ॅडिक्ट आहोत," असं निव्ह्स यांनाही वाटतं.

"त्याचवेळी काही लोक असेही असतील की जे रोज पाहताय पण त्यांना वाटतं की हे ठीक आहे."

हॉल त्यांच्याकडे येणाऱ्या क्लाएंटसला असा विचार सोडून द्यायला सांगतात की 'मी एकतर पॉर्न अ‍ॅडिक्ट आहे किंवा नाही.'

त्या सुचवतात, या गोष्टीत अडकून न पडता तुम्ही यावर लक्ष केंद्रित करा की यामुळे तुमच्या रोजच्या कामात काय व्यत्यय येतोय, तुमच्या अभ्यासावर त्याचा परिणाम जाणवतोय का, तुमचे नातेसंबंध त्यामुळे प्रभावित होत आहेत का?

'अद्याप या विषयावर सखोल संशोधन नाहीये'

गेल्या वर्षी ओरे ओडुबा या टीव्ही प्रेझेंटरनी आपल्या सवयीबद्दल जाहीररीत्या सांगितले होते. ओरेंना गेल्या 30 वर्षांपासून पॉर्न पाहण्याची सवय होती.

वयाच्या 9 व्या वर्षी ही सवय लागल्याचे ते सांगतात आणि या सवयीमुळे माझं आयुष्य आतून उद्ध्वस्त होत होतं असं, ते म्हणतात.

'अनेक मानसिक धक्क्यांना प्रतिसाद म्हणून मी कोवळ्या वयातच याच्या आहारी गेलो,' या सवयीतून सुटका होण्याआधी ओरेंनी याबाबत 'वुई नीड टू टॉक' या पॉडकास्टमध्ये चर्चा केली होती.

हे स्पष्ट नाहीये की, अशी वर्तणूक होण्याचे नेमके कारण काय आहे. अद्याप खूप संशोधन होणे बाकी आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.

याबाबत वैज्ञानिक संशोधन वेगाने होत आहे, पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय, असं इन्से यांना वाटतं.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

"कदाचित याची सुरुवात अशी होत असेल की तुमच्या रोजच्या तणावपूर्ण आयुष्यातून तुम्हाला थोडी उसंत यामुळे मिळत असेल. जसं की तणावपूर्ण करिअर किंवा रिलेशनशिपमधील दुरावा यातून सावरण्यासाठी पॉर्नचा वापर सुरुवातीला केला जात असेल," असं हॉल यांना वाटतं.

काही असे घटक देखील असू शकतात, जसं की मानसिक धक्का, बालपणीच्या काळातील काही समस्या, स्वतःबद्दलचा नकारात्मक भाव, या गोष्टींमुळे ही सवय नियंत्रणात आणणे कठीण जात असेल.

क्रेग आता 40 वर्षांचा आहे आणि तो सांगतो, "पॉर्न हे आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारावर वापरण्याचे साधन झाले आहे."

या सवयीतून सुटका होण्याआधी क्रेग विचार करत होता, "आता आपण उद्ध्वस्त झालो आहोत आणि यातून आपली सुटका नाहीये." पण उपचारानंतर त्याची विचार करण्याची पद्धत बदलली.

या गोष्टीकडे लक्ष वेधत हॉल सांगतात, "आताच्या काळातील तंत्रयुगाचे वातावरण आणि असा अल्गोरिदम जो तुम्हाला त्या डिजाईनची खूप सवय लावेल यामुळे देखील परिणाम होत आहे."

AI च्या आगमनानंतर तर ही समस्या अजूनच गंभीर होत चालली आहे. कारण तुमच्या नेमक्या आवडी, निवडीनुसार तुम्हाला पॉर्न उपलब्ध करून दिलं जातं, असं हॉल आणि निव्ह्स यांना वाटतं.

'अगदी हुबेहूब, तुम्हाला हवंय आणि गरज आहे (असं काँटेट) ते उपलब्ध करून दिलं जातं,' असं निव्ह्स सांगतात.

'तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या'

"जर तुम्हाला पॉर्नच्या वापराबाबत चिंता सतावत असेल तर तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे," असा सल्ला इन्से देतात.

नोंदणीकृत मानसशास्त्रज्ञ अशा केसेसमध्ये महत्त्वपूर्ण ठरू शकतात. कारण ते तुमच्या एकूणच मानसिक आरोग्याचा व्यापकपणे विचार करू शकतात.

इन्से पुढे सांगतात, "आम्ही आमच्या अनुभवावरून सांगू शकतो की, मानसिक आरोग्यात एकाच वेळी येणाऱ्या दोन किंवा अधिक समस्या या अपवाद नसतात तर नियमच असतात."

क्रेगसोबत देखील असंच झालं होतं. जोपर्यंत तो मानसिक आरोग्याशी संबंधित थेरपी घेण्यासाठी गेला नव्हता, त्याच्या हे लक्षातच आलं नाही की आपली अति पॉर्न पाहण्याची सवय ही अपायकारक आहे.

पॉर्न पाहण्याच्या सवयीमुळे यात आणखी भर पडत होती, असं त्याच्या लक्षात आलं.

त्याच्या थेरपिस्टने त्याला 'सेक्स अ‍ॅडिक्शन'साठी असलेला 12 स्टेप प्रोग्रॅम जॉईन करण्यास सांगितले. ही पद्धत देखील अल्कोहोलिक अनॉनिमसने तयार केलेल्या प्रारूपाच्या धरतीवर आहे. यामुळेच आपले 'व्यसन सुटले', असे तो सांगतो.

"यामुळे माझ्या व्यसनासाठी सोपं आणि सुलभ उत्तर मला मिळालं असं नाही. पण आता मी सुरक्षितस्थळी असल्याची जाणीव मला होतीये. त्याच बरोबर हे देखील समजणं महत्त्वाचं आहे की, एका वेळी एक पाऊल उचलणे आणि प्रत्येक दिवस लढून जिंकणे हे आपले ध्येय असायला हवे," असं तो सांगतो.

सध्या पॉर्नच्या सवयीशी झुंजणाऱ्या लोकांसाठी राष्ट्रीय आरोग्य सेवेची (एनएचएस) वेगळी सेवा उपलब्ध नाहीये. असं असलं तरी काही स्थानिक सेवा तुम्हाला याबाबत मदत पुरवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी याबाबत बोलू शकता.

म्हणजेच सरकारी यंत्रणेहून अधिक सुलभरीत्या खासगी प्रॅक्टिशनर, सपोर्ट ग्रुप आणि ऑनलाइन सपोर्ट ग्रुपकडून तुम्हाला मदत मिळू शकेल.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

"संशोधनाअंती तुम्हाला काय लागू होईल याचा विचार करा," असं इन्से सुचवतात. ऑनलाईन मोघम आणि सरसकट सल्ले दिले जातात. त्याबाबत काळजी बाळगा, असंही त्या सुचवतात.

काही प्रॅक्टिशनर पॉर्नची सवय एकदम तोडायला लावतील, तर काही असं सांगतील की, तुम्ही ते पाहू शकता, फक्त त्याने तुमचे दैनंदिन आयुष्य प्रभावित होणार नाही आणि तुम्ही तुमचे काम नीटपणे पार पाडू शकाल याची काळजी घ्या, असं इन्से सांगतात.

'पॉर्न ब्लॉक सॉफ्टवेअरचा वापर'

'उपचार काय असावेत हे समजून घेण्यासाठी पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे ,' अशी भूमिका हॉल मांडतात.

काही पावलं तुम्ही तुमच्या पातळीवर उचलू शकतात. 'जसं की पॉर्न ब्लॉक करणारे सॉफ्टवेअर डिव्हाइसमध्ये इंस्टॉल करणे,' असं त्या सुचवतात.

त्या असं पण सांगतात, "आपण पॉर्न केव्हा पाहू याविषयी आपल्या सवयींची नोंद ठेवणे. जसं की आपण एकटे आहोत किंवा तणावाखाली आहोत अशा वेळी ते पाहू शकतो - तर अशा वेळी आपण पॉर्न पाहण्याव्यतिरिक्त आणखी काय करणार आहोत त्याचे आधीच नियोजन करून ठेवले पाहिजे."

पण त्यांना असं वाटतं की, राष्ट्रीय आरोग्य प्रणालीने यासंदर्भात पावले उचलायला हवी आणि जास्तीत जास्त सहकार्य करायला हवे. "मुख्यत्वे, जेव्हा ही सवय समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याचा ताबा घेईल त्याआधीच त्यांनी हस्तक्षेप करायला हवा."

आरोग्य आणि समाज कल्याण विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, "तरुण वयातच पॉर्नोग्राफीच्या व्यसनाने ग्रासलेल्या अनेकांची कैफियत जेव्हा आम्ही ऐकली तेव्हा आम्हाला अस्वस्थ वाटलं."

"मुलांना हानिकारक काँटेट पाहण्यापासून रोखण्यासाठी सरकारने लागू केलेले ऑनलाईन सुरक्षा कायदे, याचे महत्त्व देखील अधोरेखित होते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)