भाजपत गेलेल्या नेत्याला गोमुत्राने धुवून काढता की काय - अजित पवार #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज छापून आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. भाजपत गेलेल्या नेत्याला गोमुत्राने धुवून काढता की काय? अजित पवारांची टीका
"त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. त्याचावर गोमूत्र शिंपडून त्याला आंघोळ घालतात की काय माहिती? पण इतर पक्षात गेला की त्याची चौकशी सुरू होते," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
वाई शहरातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. न्यूज18 लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.
"भाजपत गेलेल्या काहींना आमदारकी मिळाली, काहींना मंत्रिपदं मिळाली आणि त्यांच्यावरच्या चौकशाही बंद झाल्या. हे राजकारण न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही, सूज्ञ आहे त्यांना या गोष्टी कळतात," असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
2. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या 5 जागाही आल्या नसत्या - चंद्रकांत पाटील
"आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला, आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या 5 जागाही आल्या नसत्या," अशा शब्दांत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Facebook / Chandrakant Patil
देगलूर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीचं वातावरण तापायला लागलं आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना देगलूरमध्ये रिंगणात उतरवलं आहे.
यावेळी झालेल्या भाजप मेळाव्यामध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली. टीव्ही 9 मराठीने याविषयीची बातमी दिली आहे.
3. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र बंद करू - नाना पटोले
"बसलेल्या शेतकऱ्यांना चिरडून मारण्याची संतापजनक घटना तालिबानी प्रवृत्ती दाखवत असून शेतकऱ्यांना चिरडणारं भाजपचं केंद्रातलं मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातलं योगी सरकार बरखास्त करा," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

फोटो स्रोत, Facebook / Nana Patole
लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी नाहीतर महाराष्ट्र बंद करू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिलाय. लखीमपूर खिरीमधल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं.
प्रियांका गांधी यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेधही यावेळी करण्यात आला. लोकमतने याविषयीची बातमी दिली आहे.
4. हे राम राज्य नव्हे किलिंग राज्य - ममता बॅनर्जी
"भाजप उत्तर प्रदेशात रामराज्याविषयी बोलते पण ते रामराज्य नाही, किलिंग राज्य आहे. लोक मारले जातात आणि सरकार 144 लागू करते. एका मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खिरीमध्ये इतक्या शेतकऱ्यांची हत्या केली. आम्ही त्याचा निषेध करतो," अशी टीका ममता बॅनर्जींनी केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
भाजपचा लोकशाहीवर विश्वास नसल्याने त्यांनी परिसरात कलम 144 लागू केल्याचंही ममता बॅनर्जींनी म्हटलंय.
लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
5. राज्यात जोरदार पावसाची शक्यता
राज्याच्या विविध भागांमध्ये पुढचे चार दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि तामिळनाडू किनारपट्टीपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत हवेत कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे 8 ऑक्टोबरपर्यंत कोकण आणि महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात गडगडाटासह तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं वृत्त सकाळने दिलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























