कोरोना : अहमदनगरच्या 61 गावांमध्ये पुन्हा लॉकडाऊन का लागला?

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी याबाबतचे आदेश काढले.
या आदेशानुसार ज्या 61 गावांमध्ये 10 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, त्या गावांमध्ये 13 ऑक्टोबर पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद राहणार आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 3 ऑक्टोबरला अहमदनगरच्या ग्रामीण भागामध्ये 424 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या साधारण 5173 झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दररोज 500 ते 800 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.
लॉकडाऊन लावण्यात आलेल्या गावांमध्ये किंवा गावाबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. या 61 गावांमध्ये संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर या तालुक्यांमधील गावांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
अहमदनगरमधून कोरोनाची तिसरी लाट?
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 21 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्याच्या दौरा केला होता. त्यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी अहमदनगरमधील कोरोनाची परिस्थिती पाहता तिसरी लाट अहमदनगरमधून सुरु होईल की काय अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
"सरकार उपाययोजना करेल. पण लोकांचं सहकार्य देखील आवश्यक आहे. कान्हूर पठार, पारनेर भागामध्ये दशक्रिया आणि तेरावंसारख्या विधींसाठी हजार-हजार लोक एकत्र जमत आहेत. तर लग्नासाठी दोन हजार लोक एकत्र येत आहेत. लग्नाच्या वराती देखील होत आहेत. जिल्ह्यातील लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं. या जिल्ह्यातून राज्यात तिसरी लाट सुरु झाली, असा कुठलाही दोष जिल्ह्यावर येऊ नये यासाठी तरी सर्वांनी काळजी घ्यावी," असं आवाहन देखील गमे यांनी त्यावेळी केलं होतं
खबरदारी घेतली गेली नाही?
"ज्या गावांमध्ये 10 लोक पॉझिटिव्ह आढळत आहे तिथला भाग कन्टेन्मेंट झोन करा, असं विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले होतं. परंतु तशी कारवाई गेले पंधरा दिवस झालेली नाही. त्यामुळे रविवारी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी त्या 61 गावांमध्ये लॉकडाऊन सुरू केला," अशी माहिती अहमदनगरमधले लोकमतचे पत्रकार सुदाम देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE
देशमुख म्हणाले, "संगमनेर आणि पारनेरमध्ये रुग्णसंख्या अधिक होती. संगमनेरमध्ये लस घेण्यापूर्वी कोरोना टेस्ट करणं बंधणकारक केलं होतं, त्यामुळे तिथे टेस्टिंगही वाढलं आणि त्यामुळे पॉझिटिव्ह येणारे रग्णही वाढले."
"पारनेरमध्ये तहसीलदारांनी सरसकट चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. या दोन्ही तालुक्यांचा कल्याण आणि मुंबई या दोन शहरांशी मोठा संपर्क आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ अधिक आहे."
"पारनेरच्या निलेश लंकेंच्या कोव्हिड सेंटरमध्ये नियमांचं पालन होत नव्हतं. अनेक कार्यकर्ते तिथं भेटी देत होते. आषाढी वारीनिमित्त कोव्हीड सेंटरमध्ये प्रतिगात्मक दिंडी काढली होती. त्यामुळे देखील रुग्णसंख्या वाढली असण्याची शक्यता आहे," असं देखील देशमुख म्हणतात.
"अनलॉकमुळे लोकांचे व्यवहार वाढले आहेत. लग्न समारंभ, आठवडी बाजारांमध्ये मोठी गर्दी होत आहे. कोरोनाचे नियम पाळले जात नाहीयेत हे सुद्धा रुग्ण वाढीचं महत्त्वाचं कारण आहे," असं अहमदनगरमधील पत्रकार केदार भोपे सांगतात.
पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला - जिल्हा आरोग्य अधिकारी
अहमदनगर मधील 61 गावांमध्ये लॉकडाऊन केला असला तरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असल्याचं जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी संदिप सांगळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
सांगळे म्हणतात, "गेल्या सात दिवसांपासून पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. केसेस देखील कमी झाल्या आहेत. 16 ते 17 हजार चाचण्या रोज केल्या जात आहेत. संगमनेर आणि पारनेरमध्ये देखील रुग्णसंख्या कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात दहा लाख लोकांचं लसीकरण देखील केलं आहे. आत्तापर्यंत 28 लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. ज्या गावांमध्ये अधिक केसेस आहेत तिथे अधिक रुग्ण वाढू नयेत म्हणून लॉकडाऊन करण्यात आला आहे. अनलॉकमुळे लोकांचा संपर्क वाढला आहे. त्याचबरोबर नागरिकांकडून मास्क वापरण्याबाबत देखील उदासिनता दिसत आहे."
आकडे काय सांगतात?
अहमदनगरच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 28 सप्टेंबरला जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3.35 टक्के होता. त्यानंतर त्यात घट होण्यास सुरुवात झाली. 29 सप्टेंबरला 3.84 टक्के, 30 सप्टेंबरला 3.32 टक्के, 1 ऑक्टोबरला 2.61 टक्के, 2 सप्टेंबरला 3.14 तर 3 ऑक्टोबरला 2.41 टक्के पॉझिटिव्हीटी रेट होता.
जिल्ह्यात आत्तापर्यंत 28 लाख 29 हजार 851 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. त्यापैकी 21 लाख 764 नागरिकांचा पहिला डोस झाला आहे तर 7 लाख 29 हजार 87 नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
61 गावांममध्ये कसा असेल लॉकडाऊन?
अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 10 पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण असलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा, मेडिकल, टेस्टिंग सेंटर आदी वगळता इतर सर्व आस्थापनं, दुकानं, वस्तू विक्री सेवा 4 ऑक्टोबरपासून 13 ऑक्टोंबर पर्यंत बंद असणार आहेत.
या गावांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कृषी माल आणि आवश्यक वस्तू वाहतूक वगळता इतर वाहनांना या गावांमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
या काळामध्ये या भागांमधील किराणा मालाची दुकानं सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. किराणा दुकानातील कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले असल्याचं बंधनकारक असणार आहे.
दूध संकलन केंद्रांवर कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. या गावांमध्ये लग्न समारंभास मनाई करण्यात आली आहे. तसंच अंत्यविधीसाठी, दशक्रियाविधीसाठी 20 व्यक्तींनाच परवानगी असेल. तसंच याबाबतची पूर्वकल्पना तहसिलदारांना द्यावी लागणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























