म्युरियल गार्डनर : ज्यूंना वाचवण्यासाठी असंख्य बनावट पासपोर्ट तयार करणारी गर्भश्रीमंत महिला

म्युरियल गार्डनर

फोटो स्रोत, CONNIE HARVEY/FREUD MUSEUM LONDON

    • Author, टीम स्टोक्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

म्युरियल गार्डनर यांना महान मानसोपचार तज्ज्ञ सिगमंड फ्रॉईड यांच्या कामात इतका रस होता की त्या 1920 च्या दशकात वैद्यकीय शिक्षण घ्यायला ऑस्ट्रियाला गेल्या होत्या.

इथेच अमेरिकेतल्या अत्यंत श्रीमंत कुटुंबाच्या वारस असणाऱ्या म्युरियल फॅसिस्ट विचारसरणीच्या विरोधात लढल्या जाणाऱ्या भूमिगत लढाईचा भाग बनल्या आणि त्यांनी लाखो लोकांचा जीव वाचवला.

त्यांच्या शौर्यावर एक चित्रपटही बनला ज्याच्यासाठी अभिनेत्री वेनेसा रेडग्रेव्ह यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकला.

अशा कोणत्या विलक्षण घटनांनी त्यांचं आयुष्य भरलं होतं?

हिटलरच्या नाझी सैन्याने ऑस्ट्रिया ताब्यात घेतलं होतं. नोव्हेंबर महिन्यातल्या एका सकाळी म्युरियल यांच्या हॉटेल रूमचं दार कोणीतरी वाजवलं.

बाहेर गेस्टापो (नाझी गुप्त पोलीस) चा एक अधिकारी उभा होता. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की म्युरियल तिथे काय करत आहेत.

त्यांचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. त्यांनी स्वतःला सावरलं आणि त्या म्हणाल्या की त्या एक पर्यटक आहेत आणि लिंज शहर फिरायला आल्या आहेत. अनेक प्रश्न विचारल्यानंतर तो अधिकारी तिथून निघून गेला.

त्याने अजून तपासणी केली असती तर त्याला कळलं असतं की म्युरियल जे सांगत आहेत ते खरं नाहीये.

टायटॅनिक जहाज बुडल्याचा परिणाम

गार्डनर यांचा जन्म 1901 साली शिकागोत मॉरिस कुटुंबात झाला. या कुटुंबाने मांसाच्या व्यवसायातून प्रचंड संपत्ती गोळा केली होती.

लंडनच्या फ्रॉईड म्युझियमची स्थापना गार्डनर यांनीच केली होती.

म्युरियल गार्डनर

फोटो स्रोत, CONNIE HARVEY/FREUD MUSEUM LONDON

या म्युझियमच्या संचालक कॅरोल सीगल म्हणतात, "त्यांना फार कमी वयातच हे जाणवलं होतं की त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि काही लोकांकडे काहीच नाहीये. त्यांना हे चुकीचं वाटायचं."

"त्या राजकारणातही रस घ्यायला लागल्या होत्या. त्यांनी लहान वयातच महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून रॅली काढली होती."

विसाव्या शतकातल्या मोठ्या घटनांपैकी एक - टायटॅनिक जहाज बुडण्याच्या घटनेचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला होता.

आयुष्यात नंतर त्यांनी आपला नातू हॉल हार्वी यांना एकदा सांगितलं होतं की, या घटनेत ठार झालेल्या मोठमोठ्या माणसांची नावं तर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली पण सर्वसामान्य माणसांबद्दल कोणी काही विचारलं नाही. बातम्यांमध्ये त्यांना 'स्टीरेज' म्हटलं गेलं म्हणजे ज्यांनी स्वस्तातली तिकीटं काढली होती असे लोक.

"त्या आपल्या आईकडे गेल्या आणि त्यांनी विचारलं की स्टीरेजचा अर्थ काय असतो. त्यांच्या आईने म्हटलं सर्वसामान्य लोक. हे ऐकून त्यांना राग आला. वयाच्या 11 वर्षीच त्या कुटुंबातली सगळ्यांत उदारवादी महिला बनल्या होत्या," हार्वी म्हणतात.

त्यांनी प्रतिष्ठित वेल्सली कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात गेल्या. 1926 मध्ये त्या ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात गेल्या. इंग्लंडमध्ये त्यांचं लग्न झालं, त्यांना एक मुलगीही झाली पण हे लग्न टिकलं नाही.

फ्रॉईडमध्ये रस

त्या ऑस्ट्रियाला गेल्या कारण त्यांना खात्री होती की प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ सिगमंड फ्रॉईड त्यांना भेटतील.

पण फ्रॉईड यांच्याकडे आधीच अनेक रूग्णांची नोंदणी झाली असल्यामुळे म्युरियल यांना मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं.

पण यामुळे ना त्यांची सायको अॅनालिसिसमधली रूची कमी झाली ना त्या शहराविषयीचं प्रेम आटलं ज्या शहराचं नियंत्रण तेव्हा समाजवादी सरकारच्या हातात होतं.

म्युरियल गार्डनर

फोटो स्रोत, CONNIE HARVEY/FREUD MUSEUM LONDON

सीगल म्हणतात, "जेव्हा त्या व्हिएन्नाला पोहोचल्या तेव्हा हे शहर लाल रंगात रंगलं होतं आणि इथे अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणा होत होत्या. म्युरियल यांना या शहरात राहणं आवडलं, इथेच त्यांचीही मनोचिकित्सा झाली आणि त्यांनी ठरवलं की त्याही एक सायकोअॅनालिस्ट बनतील."

त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी व्हिएन्ना विद्यापीठात प्रवेश घेतला पण काही काळातच तिथल्या समाजवादी सरकारला नाझी सैन्याने हटवलं आणि समाजवाद्यांचं धरपकड सत्र सुरू झालं.

अशा परिस्थितीत देश न सोडता म्युरियल यांनी आपल्या आयुष्यात अजून एक ध्येय ठरवलं. नाझी सैन्याच्या विरोधात चाललेल्या भूमिगत आंदोलनाचा भाग बनणं.

हार्वी म्हणतात, "हा निर्णय घेणं त्यांना अवघड गेलं नाही कारण त्यांना माहिती होतं काय योग्य आणि काय अयोग्य आहे."

दुहेरी आयुष्य

म्युरियल क्रांतिकारी लोकांमध्ये 'मेरी' या नावाने ओळखल्या जायच्या. त्यांची तीन घरं होती ज्यातलं एक व्हिएन्ना वुड्समध्ये होतं. हे एक लहानसं टुमदार घर होतं. इथे त्या बैठका घ्यायच्या आणि आंदोलकांना लपण्यासाठी जागा द्यायच्या.

क्रांतिकारी समाजवादी नेते जोसेफ बटिंगर यांनाही त्यांनी इथेच राहायला जागा दिली होती. 1930 च्या दशकात म्युरियल यांनी बटिंगर यांच्याशी लग्न केलं.

सीगल म्हणतात, "त्या दुहेरी आयुष्य जगत होत्या. त्या एक काळजी घेणारी आई होत्या, वैद्यकीय शिक्षण घेणारी एक विद्यार्थीनी होत्या आणि दुसरीकडे त्या क्रांतिकाऱ्यांना मदत करत होत्या."

म्युरियल यांनी खोटे पासपोर्ट ऑस्ट्रेलियात पोहचवले ज्यामुळे बंडखोरांना देश सोडून जाण्यात मदत झाली.

त्या आपली संपत्ती आणि आपला प्रभाव यांचा वापर करून लोकांना देश सोडण्यासाठी मदत करायच्या. त्यांनी अनेकांना ब्रिटनमध्ये नोकऱ्या लावून दिल्या ज्यामुळे त्यांना देश सोडता आला.

हिटलर व्हिएन्नात प्रवेश करताना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिटलर व्हिएन्नात प्रवेश करताना

एकदा एक व्यक्ती एका दुर्गम स्थळी लपली होती. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी म्युरियल यांनी रेल्वेने प्रवास केला, मग तीन तास डोंगराची चढाई केली आणि मग त्यांना पासपोर्ट दिले. हे सगळं त्यांनी एका थंडीच्या रात्रीत केलं.

सीगल म्हणतात, "त्यांच्यासमोर अनेक धोके होते. त्या अनेकदा अशा गोष्टी करायच्या की जर त्या पकडल्या गेल्या असत्या तर त्यांना देशाबाहेर हाकललं असतं किंवा तुरुंगात पाठवलं असतं."

व्हिएन्नातल्या आपल्या सामाजिक जीवनामुळे त्या अनेक लोकांच्या संपर्कात आल्या.

1934 साली इंग्रज कवी स्टीफन स्पेंडर यांच्यासोबत त्यांचं अफेयर सुरू झालं. भविष्यात लेबर चँसलर बनणारे हग गेट्सकलही तेव्हा व्हिएन्नात राहत होते.

व्हिएन्नात त्यांचं जीवन असं होतं की त्या अनेक प्रकारच्या लोकांच्या संपर्कात आल्या.

सीगल म्हणतात की त्या ब्रिटनच्या सगळ्यात कुख्यात देशद्रोह्यांनाही भेटल्या.

"एकदा त्यांना भेटायला एक तरुण आला. त्यांना या तरुणावर संशय होता. या व्यक्तीने त्यांना डाव्या विचारसरणीची पुस्तकं, साहित्य वाटायला सांगितलं. या मुलाकडून त्यांना अशी अपेक्षा नव्हती. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा त्यांनी या व्यक्तीचे फोटो वर्तमानपत्रात पाहिले. तो मुलगा म्हणजे ब्रिटनचे डबल एजंट किम फिलबी होते."

1938 साली नाझी जर्मनीने ऑस्ट्रिया ताब्यात घेतलं. म्युरियल यांचे पती आणि मुलीने देश सोडला, पण त्या आपलं काम पुढे चालू ठेवण्यासाठी तसंच आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी व्हिएन्नातच थांबल्या. पण नंतर त्यांनीही ऑस्ट्रिया सोडलं आणि त्या अमेरिकेत गेल्या."

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्युरियल आणि त्यांच्या पतीने ज्यू लोकांना व्हिसा देण्याची मोहीम चालवली. जे निर्वासित अमेरिकेत पोहोचत होते त्यांना नोकऱ्या आणि राहायला जागा दिली.

अगणित लोकांना वाचवलं

हे सांगणं तर मुश्कील आहे की त्यांनी किती लोकांचे जीव वाचवले किंवा किती लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला.

हार्वी म्हणतात की त्यांनी ऐकलंय म्युरियल यांनी शेकडो लोकांचा जीव वाचवला. ते म्हणतात, "पण मला नाही वाटत की त्यांनाही आपण नक्की किती लोकांचा जीव वाचवला हे माहिती असेल."

म्युरियल यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी 1987 साली बनलेल्या एका डॉक्युमेंट्रीत अनेक लोकांनी म्हटलं होतं की त्या नसत्या तर ते जिवंत राहिले नसते.

म्युरियल यांचं कॉटेज

फोटो स्रोत, CONNIE HARVEY/FREUD MUSEUM LONDON

फोटो कॅप्शन, म्युरियल यांचं कॉटेज

युद्धाच्या अनेक वर्षांनी त्यांनी विद्यापीठात शिकवलं. अनेक पुस्तकं लिहिली ज्यात त्यांनी आपल्या भूमिगत कार्याबद्दल लिहिलं आहे. तोवर या कार्याबदद्ल फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती होतं. त्यांनी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून दीर्घकाळ प्रॅक्टीस केली.

हार्वीच्या आठवणीतल्या म्युरियल अगदी साधी महिला होत्या. ते म्हणतात, "नक्की काय घडलं त्याबदद्ल त्या कधी सांगायच्या नाही. खूप खोदून खोदून विचारलं तरच काही सांगायच्या."

1973 साली एक पुस्तक प्रकाशित झालं ज्याचं नाव होतं 'पेंटीमेंटो'. हे पुस्तक अमेरिकन लेखिका लिलियन हॅलमेन यांनी लिहिलं होतं. या पुस्तकात लिलियन यांची ज्युली नामक एका महिलेशी असणाऱ्या मैत्रीबद्दल लिहिलं होतं ज्या नाझी काळाआधी व्हिएन्नात राहायच्या.

याच दशकात वेनसा रेडग्रव्ह आणि जेन फोंडा यांचा एक चित्रपट आला ज्यासाठी रेडग्रेव्ह यांना सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

पुस्तक आणि वाद

सीगल म्हणतात, "जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा म्युरियल यांना अनेक लोकांनी फोन केला आणि विचारलं की त्यांनी लिलियन हॅलमेन यांचं पुस्तक वाचलं आहे का? तुम्हीच ज्युली आहात का? त्यांच्या पुस्तकात जी कथा सांगितली आहे ती तुमचीच आहे का?"

म्युरियल गार्डनर

फोटो स्रोत, CONNIE HARVEY/FREUD MUSEUM LONDON

फोटो कॅप्शन, म्युरियल गार्डनर

"या गोष्टीवर वाद घालण्यासारखा म्युरियल गार्डनर यांचा स्वभाव नव्हता पण त्यांनी लिलियन हॅलमन यांना पत्र लिहून विचारलं की तुला हे सगळं माहितेय या गोष्टीचं आश्चर्य आहे. तुला हे सगळं मी सांगितलं होतं का? यावर लिलियन यांनी काही उत्तर दिलं नाही."

नंतर दोघींच्या मध्ये असलेला दुवा कोण ते समजलं. दोघींचे वकील एकच होते - वुल्फ श्वाबाचर. पण पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधी ते मृत्यू पावलेले असल्यामुळे ते हे सांगू शकले नाहीत की लिलियन यांना ज्युलीची कहाणी त्यांनीच सांगितली होती की नाही.

पण ऑस्ट्रियातल्या समाजवादी चळवळीतल्या माजी सदस्यांनी ठामपणे सांगितलं की ऑस्ट्रियात 1930 च्या दशकात एकच अमेरिकेन महिला राहायची आणि लोक तिला मेरी म्हणून ओळखायचे.

या वादाचा परिणाम असा झाला की म्युरियल यांनी आपल्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव 'कोड नेम मेरी' असं होतं. पण या पुस्तकाची आवृत्ती अनेक दशकांपूर्वी संपली आणि त्यानंतर नवी आवृत्ती आली नाही. आता फ्रॉईड म्युझियमच्या प्रदर्शनासाठी हे पुस्तक परत छापलं गेलं आहे.

फ्रॉईड म्युझियम लंडनच्या हॅम्प्स्टेडमध्ये त्याच घरात आहे जिथे व्हिएन्ना सोडल्यानंतर सिगमंड फ्रॉईड यांनी आपले अखेरचे दिवस व्यतीत केले होते. म्युरियल गार्डनर यांनी हे घर विकत घेतलं आणि फ्रॉईड यांच्या आठवणीत इथे संग्रहालय उभारलं.

सीगल यांनी यासाठीच इथे प्रदर्शन आयोजित केलं आहे.

"आम्ही म्युरियल गार्डनर यांचे आभारी आहोत कारण त्या आणि अॅना फ्रॉईड या संग्रहालयाच्या संस्थापक आहेत. त्यांनी दीर्घ काळ या संस्थेची मदत केली आहे आणि हे प्रदर्शन म्हणजे त्यांचे आभार मानण्याचा एक प्रयत्न आहे."

या प्रदर्शनात वेनेसा रेडग्रव्हही सहभागी झाल्यात. त्यांनी एक नाटकही लिहिलं होतं जे अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञ म्युरियल गार्डनर यांच्यावर आधारित होतं.

तर हार्वी म्हणतात की त्यांच्या आजी कायम प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. आता लोकांना त्यांच्याविषयी कुतुहल वाटतंय, त्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे हे ऐकून खूप छान वाटतंय.

म्युरियल यांच्या आयुष्यावरील चित्रपटातील एक दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, म्युरियल यांच्या आयुष्यावरील चित्रपटातील एक दृश्य

"त्यांना आपल्या संपत्तीपैकी 99 टक्के संपत्ती दान करायची होती आणि त्यांनी असंच केलं. त्या मदर तेरेसा तर नव्हत्या. त्यांना खायला चांगलं लागायचं आणि आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये त्या व्होडका प्यायच्या."

"सुदैवाने त्यांच्याकडे पैसा होता आणि आपल्या भयावर मात करण्याची क्षमताही. त्यांच्या अंगी काही मुल्यं होती. या सगळ्यांमुळे एक अशी महिला घडली जिची समाजाला नितांत गरज होती."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)