NEET पेपरफुटीमुळे आणखी दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या; 'मोदी सरकारची ही यंत्रणा आणखी किती बळी घेणार?' गेहलोत यांचा सवाल

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे NEET परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता ती 21 जून रोजी होणार आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत राजस्थानमधील NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
अलीकडेच सिकरमध्ये 'नीट' (NEET) परीक्षेच्या एका उमेदवाराने आत्महत्या केली होती आणि आता अलवर येथील रहिवासी असलेल्या रेणू मीना हिने दिल्लीत आत्महत्या केली आहे.
प्रश्नपत्रिका फुटीच्या (पेपर लीक) घटनेनंतर, देशभरात नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणाबाबत निवेदन देताना राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, "नीट (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी केंद्र सरकारच्या अपयशामुळे आणखी एका मुलीचा बळी गेला आहे. दिल्लीत परीक्षेची तयारी करणाऱ्या, अलवरमधील भानोखर गावच्या रेणू मीना हिची आत्महत्या अत्यंत दुःखद आहे."
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्ही तणाव किंवा मानसिक अस्वस्थतेचा सामना करत असाल, तर भारत सरकारच्या 'जीवनसाथी' हेल्पलाइनशी 1800-233-3330 या क्रमांकावर संपर्क साधून मदत घेऊ शकता. तसेच, तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशीही बोलू शकता.)
अशोक गेहलोत पुढे म्हणाले, "माध्यमांतील वृत्तांनुसार, 'नीट' (NEET) परीक्षा रद्द झाल्यामुळे ती अत्यंत अस्वस्थ होती. मोदी सरकारच्या ही विफल यंत्रणा आणखी किती बळी जाणार आहेत? अगदी कालच उमेश माळीच्या आत्महत्येची बातमी समोर आली, तर त्याआधी प्रदीप मेघवालनेही आपली जीवनयात्रा संपवली होती."
ते पुढे म्हणाले, "जे विद्यार्थी पुढे जाऊन डॉक्टर बनले असते आणि रुग्णांचे प्राण वाचवले असते, तेच आज आत्महत्या करत आहेत. यापेक्षा अधिक निराशाजनक बाब दुसरी कोणती असू शकते? तरीही, मोदी सरकार याबाबत उदासीन आहे."
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
NEET च्या पार्श्वभूमीवर 'टेलिग्राम'वर बंदी
केंद्र सरकारने भारतात टेलिग्रामच्या वापरावर येत्या 22 जूनपर्यंत बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
'लाइव्ह लॉ'ने दिलेल्या वृत्तानुसार, ही याचिका न्यायमूर्ती तेजस करिया यांच्या न्यायालयात सादर करण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणाची आजच (17 जून) तातडीने सुनावणी घेण्यास परवानगी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तत्पूर्वी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'वर 22 जूनपर्यंत बंदी घातली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दिलेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी होणारी नीट (यूजी) 2026 परीक्षा लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे.
नीट (यूजी) 2026 परीक्षा 3 मे रोजी झाली होती. परंतु, पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.
सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली असून, अशा प्रकारची बंदी घालून पेपरफुटी थांबवता येणार नाही, असं टीकाकरांनी म्हटलं आहे.
'हा तर सरकारचा मास्टरस्ट्रोक'
काँग्रेसचे नेते कार्ती चिदंबरम यांनी सरकारच्या या निर्णयावर निशाणा साधत म्हटलं की, "पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी घालणं म्हणजे खरोखरच सरकारचा हा एक मोठा मास्टरस्ट्रोक आहे."

फोटो स्रोत, Getty Images
याला प्रत्युत्तर देताना टेलिग्राम मेसेंजरने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटलं की, "तुम्ही आता सर्व शॉपिंग मॉल्सही बंद केले पाहिजेत, कारण त्यापैकी एखाद्या मॉलमध्ये चोरी होऊ शकते. तसेच रस्तेही बंद केले पाहिजेत, कारण मी ऐकलंय की कोणीतरी भरधाव गाडी चालवत होतं."
"टेलिग्रामचा वापर केवळ चुकीच्या कामांसाठीच केला जात नाही", असं कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) म्हटलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचा विरोध
नीट यूजी 2026 परीक्षेपूर्वी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला कॉक्रोच जनता पार्टीने विरोध केला आहे.
'कॉक्रोच जनता पार्टी- बिहार'ने एक्सवर लिहिलं की, "पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने टेलिग्रामवर बंदी घातली आहे. परंतु, टेलिग्रामचा वापर केवळ चुकीच्या कामांसाठीच होत नाही, याचा विचार अधिकाऱ्यांनी केला आहे का?"

फोटो स्रोत, Getty Images
सीजेपीने पुढे म्हटलं की, "हजारो विद्यार्थी नोट्स, अभ्यासाचे साहित्य आणि अभ्यासाशी संबंधित रोजच्या माहितीसाठी टेलिग्रामवर अवलंबून असतात. आता या विद्यार्थ्यांनी काय करावं?"
"टेलिग्रामवर बंदी घालणं हाच एकमेव उपाय आहे का? पेपरफुटीत सहभागी असलेले लोक सहजपणे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात, कारण सर्वच प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आलेली नाही."
सीजेपीचं म्हणणं आहे की, "संपूर्ण प्लॅटफॉर्म बंद करण्यापेक्षा दोषींवर कडक कारवाई करणं, हाच खरा उपाय आहे, हे त्यांना कधी समजणार?"
दरम्यान, 'टेलिग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22 जूनपर्यंत बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचं नीट परीक्षा घेणाऱ्या 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने स्वागत केलं आहे.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























