अमेरिकेत झालेल्या हिंदुत्वविरोधी परिषदेवरून इतका गदारोळ का होतोय?

    • Author, दिलनवाझ पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

अमेरिकेत आयोजित करण्यात आलेली हिंदुत्वविरोधी ऑनलाइन परिषद अनेक वादविवादांच्या गदारोळात समाप्त झाली.

'डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व' या नावाने झालेल्या या व्हर्चुअल परिषदेला समाजमाध्यमांवरून बराच विरोध झाला आणि त्याच वेळी परिषदेचं समर्थनही करण्यात आलं. हिंदुत्वाची विचारधारा द्वेषावर आधारलेली आहे, असं प्रतिपादन या परिषदेमध्ये करण्यात आलं.

परिषदेला विरोध करणाऱ्यांनी आपला आवाज दडपायचा प्रयत्न केला आणि विविध परिसंवादांमध्ये सहभागी होणाऱ्या विविध अकादमिक लोकांना घाबरवायचा प्रयत्न केला, असं परिषदेच्या आयोजकांचं म्हणणं आहे.

तर, विरोधकांच्या म्हणण्यानुसार, ही परिषद मुळातच राजकीय हेतूने आयोजित करण्यात आली होती. जागतिक पातळीवर भारत व हिंदू धर्म यांची प्रतिमा मलीन करण्याचा या परिषदेचा उद्देश होता.

'डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व' परिषद म्हणजे काय होतं?

10 ते 12 सप्टेंबर या दरम्यान ऑनलाइन पार पडलेल्या या परिषदेला अमेरिका, ब्रिटन व युरोप इथल्या 53 विद्यापीठांमधील 70 हून अधिक केंद्र, संस्था, व अकादमिक विभागांचं सहकार्य लाभलं होतं.

अमेरिकेतील हार्वर्ड, स्टॅनफर्ड, प्रिन्स्टन, कोलंबिया, बर्कले, शिकागो, पेन्सिल्वानिया व रटजर्स, यांसारख्या प्रसिद्ध विद्यापीठांनी या परिषदेला सहकार्य केलं.

या परिषदेत सहभागी होण्यासाठी दहा हजारांहून अधिक लोकांनी नोंदणी केली, तर साडेसात हजारांहून अधिक लोक परिषदेशी जोडले गेले, असं आयोजकांनी म्हटलं आहे.

संमेलनाच्या आयोजकांपैकी एक, प्रिन्स्टन विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक ज्ञान प्रकाश बीबीसीला म्हणाले, "हिंदुत्व आणि भारतातील विविधतेवर झालेला त्याचा परिणाम, यांचं विश्लेषण करणं, हा या परिषदेचा उद्देश होता. भारतात वेगवेगळे धर्म आहेत, अल्पसंख्याक समुदाय आहेत, दलित आहेत, स्त्रिया आहेत, या सर्वांवर हिंदुत्वाचा कोणता परिणाम होतो आहे, याबद्दल प्रस्तुत परिषदेमध्ये चर्चा झाली."

ज्ञान प्रकाश सांगतात, "आज हिंदुत्वाची विचारसरणी जागतिक पातळीवर प्रसाराचा प्रयत्न करते आहे, अशा वेळी आम्ही जागतिक पातळीवरील त्याचे परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न या परिषदेद्वारे केला."

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील व इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या सहकार्याने हिंदुत्वाच्या विषयावर अमेरिकेत झालेली ही पहिलीच परिषद होती. यामध्ये मोठ्या संख्येने अॅकेडमिक संशोधक व अभ्यासक सहभागी झाले. तीन दिवस चाललेल्या या परिषदेमध्ये एकूण नऊ सत्रं होती, त्यात तीसहून अधिक वक्त्यांनी आपापले विचार मांडले.

जागतिक हिंदुत्व म्हणजे काय, हिंदुत्वाची राजकीय अर्थनीती, जातिव्यवस्था व हिंदुत्व, हिंदुत्वाचं लिंगभावात्मक व लैंगिक राजकारण, हिंदुत्वाचं प्रचारतंत्र व डिजिटल परिसंस्था, आदी विषयांवर या वेळी चर्चा झाली.

प्राध्यापक ज्ञान प्रकाश सांगतात, "हिंदुत्वाची विचारसरणी 1995नंतर जागतिक पातळीवर का विस्तारत आहे, याचं विश्लेषण प्राध्यापक क्रिस्तोफ जॅफरो यांच्या निबंधात करण्यात आलं होतं. हिंदुत्वाची विचारसरणी व विज्ञानाविरोधातील कार्यक्रम कसा राबवला जात आहे, याबद्दलही आम्ही चर्चा केली."

या परिषदेला विरोध का झाला?

समाजमाध्यमांवरून या परिषदेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. परिषदेविरोधात चालवण्यात आलेल्या ऑनलाइन मोहिमांमुळे या परिषदेत सहभागी झालेल्या विद्यापीठांचे सर्व्हर ठप्प झाले, असा दावा आयोजकांनी केला आहे.

या परिषदेत सहभागी झालेली विद्यापीठं, संस्थाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांना परिषदेविरोधातील सुमारे दहा लाख ई-मेल आले, असा दावा बीबीसीला पाठवलेल्या निवेदनात आयोजकांनी केला आहे.

ड्र्यू विद्यापीठाच्या सर्व्हरवर काही मिनिटांच्या फरकाने तीस हजार ई-मेल पाठवण्यात आल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. या ऑनलाइन हल्ल्यामुळे विद्यापीठांना परिषदेच्या नावाशी संबंधित सर्व ई-मेल ब्लॉक करणं भाग पडलं.

परिषदेविरोधात मोठी आघाडी उघडण्यात येऊनसुद्धा कोणत्याही विद्यापीठाने यातून माघार घेतली नाही. परिषदेचं संकेतस्थळ दोन दिवस बंद पडलं आणि परिषदेचं फेसबुक-पानही बंद करण्यात आलं, असं आयोजकांनी म्हटलं आहे.

संमेलनाविरोधातील व्यापक मोहीम

भारतातील हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते यांच्याव्यतिरिक्त अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांनीसुद्धा या परिषदेचा जोरदार विरोध केला. हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (एचएएफ) या परिषदेविरोधात व्यापक मोहीम चालवली.

आपल्या विरोधाचं कारण सांगताना एचएएफच्या संस्थापक सुहाग शुक्ला म्हणाल्या, "आम्ही हिंदूंच्या प्रतिमेबाबत चिंताग्रस्त नाही आहोत. हे कार्यकर्ते कित्येक दशकं हिंदूंविरोधातील द्वेषमूलक कार्यक्रम चालवत आहेत."

"पण प्राध्यापक अॅकेडमिक स्वातंत्र्याच्या नावाखाली विभाजनवादी व द्वेषपूर्ण भाषणं देत असतील आणि हे सगळं राजकीय कारवायांशी जोडलं जाणार असेल, तर त्याचा उदारमतवादी शिक्षणव्यवस्थेवर परिणाम होतो, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे."

सुहाग बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "विद्यार्थ्यांनी विविध विचार समजून घ्यावेत आणि विभिन्न मतप्रवाह तर्कशुद्धतेने व आदरपूर्वक समजून घ्यावेत, हा शिक्षणाचा हेतू असतो. पण हिंदूंचा सार्वजनिकरित्या अपमान केला जाणार असेल आणि त्यांना क्रूर संबोधलं जाणार असेल, तर त्याचा हिंदू विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर कोणता परिणाम होईल, याची आम्हाला चिंता वाटते."

'अनेक लोकांना धमक्या देण्यात आल्या'

या परिषदेला विरोध होईल, याचा आपल्याला अंदाज होता, पण विरोधाचं प्रमाण इतकं मोठं असेल असं वाटलं नव्हतं, असं परिषदेचे आयोजक सांगतात.

ज्ञान प्रकाश म्हणतात, "या परिषदेला काही ना काही विरोध होईल, याचा आम्हाला अंदाज होता. पण एखाद्या अकेडमिक परिषदेला लोक इतकं घाबरतील, असं आम्हाला वाटलं नव्हतं. आमच्या परिसंवादांमध्ये सहभागी झालेल्या अनेक लोकांना धमक्या देणारे संदेश पाठवण्यात आले."

"ट्विटर, फोन व ई-मेलवरून त्यांना धमकावण्यात आलं. त्यांना घाणेरड्या भाषेत संदेश पाठवण्यात आले. विशेषतः महिलांना खूप घाणेरड्या स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या. परिषेदत सहभागी होणाऱ्या काही अभ्यासकांनी या धमक्यांमुळे माघार घेतली. हे लोक भारतात राहतात आणि त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण व्हावा असं आम्हाला वाटत नाही."

विरोधी विचारांच्या अभ्यासकांना परिषदेत सहभागी करून घेण्यात आलं नव्हतं, या आरोपाबाबत बोलताना ज्ञान प्रकाश म्हणाले, "आम्ही हिंदुत्वावर चर्चा करून आणि त्याबद्दल लोकांना जागरूक करू, असा आमच्या परिषदेचा स्पष्ट उद्देश होता. आम्ही हिंदुत्वाचा विरोध करतो. ही काही वादविवादाची स्पर्धा नव्हती, त्यामुळे सर्व बाजूच्या लोकांचा सहभाग गरजेचा नव्हता. हिंदुत्वाबद्दलची ही एक अकेडमिक चर्चा होती. त्यामुळे आम्ही दुसऱ्या बाजूच्या लोकांना सहभागी करून घेतलं नाही. त्यांचा अजेंडा आम्हाला आधीपासूनच माहीत आहे."

या परिषदेत हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, असं विरोधकांचं म्हणणं आहे.

प्राध्यापक ज्ञान प्रकाश या टीकेकडे दुर्लक्ष करत म्हणतात, "आम्ही हिंदुत्व आणि हिंदू धर्म ही एकच गोष्ट आहे असं मानत नाही. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्व ही एक राजकीय चळवळ आहे, तर हिंदू धर्म याहून पूर्णतः भिन्न आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म, असं दाखवायचा हिंदुत्व समर्थकांचा प्रयत्न कायम सुरू असतो. परंतु, वास्तवात या दोन भिन्न गोष्टी आहेत.

हिंदुत्वाचा धोका दुर्लक्षून चालणार नाही, असं आम्ही मानतो. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये, किंबहुना त्याही आधीपासून भारतात हिंसाचार होत आला आहे. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म, असं मांडायचा प्रयत्न ही मंडळी जागतिक पातळीवरही करत असतात."

प्राध्यापक ज्ञान प्रकाश यांचा युक्तिवाद खोडत विजय पटेल म्हणतात, "मुस्लिमांविरोधात झालेल्या काही गुन्ह्यांमुळे हे लोक सगळ्या हिंदू समाजाला एकाच रंगात पाहू इच्छितात. पण अशा तऱ्हेचे गुन्हे हिंदूंविरोधातसुद्धा झाले आहेत. काही असंघटित गुन्हेगारांमुळे संपूर्ण हिंदू समाजाची बदनामी करता येणार नाही. भारत हे एक सहिष्णू राष्ट्र आहे. त्यामुळे विपरित कार्यक्रम राबवणाऱ्या या परिषदेमुळे भारताची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न झाला आहे."

हिंदुत्वाबद्दल आयोजकांचं काय मत आहे?

प्राध्यापक ज्ञान प्रकाश म्हणतात, "हिंदुत्ववादी भारतातील मुस्लिमांविरोधात आहे, दलितांविरोधात आहे, आणि भारतातील महिलांविरोधात आहे. आम्ही हिंदुत्वावर टीका करतो, हिंदुस्तानवर टीका करत नाही. अनेक लोकांना हिंदुत्वाबद्दल माहिती नाही."

"बुद्धिवीज मंडळींना याबद्दल माहिती आहे, पण सर्वसामान्यांना माहीत नाही. सर्वसामान्यांनासुद्धा या विचारसरणीबद्दल कळावं, असा आमचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाची विचारसरणी आता युरोप व अमेरिकेतही पसरते आहे. तसा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो आहे. अशा वेळी इथेही लोकांना त्याबद्दल जागरूक करणं गरजेचं आहे."

प्रचंड विरोध होऊनसुद्धा ही परिषद पार पडली आणि त्यात हिंदुत्वाच्या विचारसरणीवर टीका करण्यात आली. परंतु, इतका विरोध असतानासुद्धआ ही परिषद आयोजित करणं कितपत गरजेचं होतं, असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

यावर ज्ञान प्रकाश म्हणतात, "आम्ही ही परिषद थांबवली असती, तर ते लोक विजयी झाले असते. आम्ही हिंदुत्वाचा स्वीकार करावा, असं त्यांना वाटतं. त्यांचा युक्तिवाद स्वीकारावा आणि हिंदुत्वावर टीका होऊ नये, असं त्यांना वाटत असतं. म्हणूनच त्यांनी परिषद बंद पाडायचा बराच प्रयत्न केला, आमच्या परिसंवादांमध्ये सहभागी झालेल्या कितीतरी लोकांना धमक्याही देण्यात आला. अशा वेळी आम्ही परिषद रद्द केली असती, तर ते अकादमिक स्वातंत्र्याला छेद देणारं ठरलं असतं. आम्ही त्यांना घाबरून बोलायचंही बंद करू का?"

ज्ञान प्रकाश म्हणतात, "आमच्या विद्यापीठांमध्येसुद्धा हे लोक हातपाय पसरायचा प्रयत्न करत आहेत. भारत म्हणजे हिंदू आणि हिंदू म्हणजे हिंदुत्व, असा या लोकांचा युक्तिवाद असतो. आमच्या मते, हिंदुत्व हा धर्म नसून राजकीय विचारसरणी आहे, त्याची काही वैशिष्ट्यं आहेत.

उदाहरणार्थ, ही विचारसरणी जातीयवादावर आधारलेली आहे, त्यात ब्राह्मणांना सर्वश्रेष्ठ मानलं जातं."

"हे लोक गांधींना आणि आंबेडकरांनाही स्वतःच्या सोयीने अपहृत करायचा प्रयत्न करतात. वास्तविक हे दोघेही जातीयवादाविरोधात होते. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना गांधी आणि आंबेडकरांबद्दल शिकवतो. गांधी व आंबेडकर हिंदुत्वाच्या विचारसरणीशी संबंधित होते, असा आमच्या विद्यार्थ्यांचा समज व्हावा, असं आम्हाला वाटत नाही."

ही परिषद रद्द करण्यासाठी आपण मोहीम चालवली नाही, असं सुहाग शुक्ला म्हणतात.

त्या बीबीसीला म्हणाल्या, "ही परिषद रद्द करावी अशी मागणी आम्ही कधीही केलेली नाही. त्यामुळे ही परिषद होणार याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नव्हती. परिषद रद्द करण्याचे प्रयत्न होत असल्याचा अपप्रचार आयोजकांनी जाणीवपूर्वक केला. या परिषदेशी संबंधित विद्यापीठांनी त्यापासून अंतर राखावं, एवढंच आमचं म्हणणं होतं. हा स्पष्टपणे विभाजनवादी आणि राजकीय हेतू राखणारा कार्यक्रम होता, हिंदूंविरोधात द्वेष पसरवणं हा त्यामागचा उद्देश होता, त्यामुळे विद्यापीठांनी त्यापासून दूर राहणं आम्हाला आवश्यक वाटत होतं."

सुहाग म्हणतात, "हिंदूंची तुलना गोऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांशी केली जाते आहे. वास्तविक आम्हीच गोऱ्या वर्णवर्चस्ववादाने पीडित झालेले आहोत. अमेरिकेत हिंदू सर्वांत अल्पसंख्य आहेत. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येमध्ये हिंदूंचा वाटा केवळ १.३ टक्के आहे. या परिषदेचे आयोजक आणि त्यात सहभागी झालेली मंडळी एकतर काही समजून घेण्यापलीकडे गेलेले आहेत किंवा त्यांना आमची फिकीर नसावी."

'या संस्थांनी हिंदूंची माफी मागावी'

या परिषदेला अमेरिका, युरोप व ब्रिटनमधील विख्यात विद्यापीठांनी पाठबळ पुरवलं. त्यामुळे या संस्थांनी हिंदूंची माफी मागावी, असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

सुहाग म्हणतात, "ही परिषद आता पार पडली आहे, त्याबाबत आम्हाला वाटणारी भीती खरी ठरली आहे. या परिषदेचे बहुतांश आयोजक आपलेच कर्मचारी किंवा अध्यापक असल्यामुळे विविध विद्यापीठांनी त्यांना परिषदेबद्दल मोकळीक दिली असेल. पण आता परिषदेत काय बोललं गेलं ते सार्वजनिक स्तरावर उपलब्ध झालं आहे. विद्यापीठांनी हे पाहावं आणि आपण ज्या परिषदेला

अधिकृतरित्या समर्थन दिलं त्यात हिंदूंबद्दल किती द्वेषपूर्ण विधानं झाली हे समजून घ्यावं, अशी आम्हाला आशा आहे."

"या परिषदेशी संबंधित संस्थांनी आपापल्या हिंदू विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संपर्क करावा आणि त्यांनी व्यक्त केलेली भीती गांभीर्याने समजून घ्यावी, त्यांची माफी मागावी. या परिषदेमुळे ज्या विद्यार्थ्यांना भीती, हिंसेचा धोका सहन करावा लागतो आहे, त्यांना विद्यापीठांने सहकार्य करावं."

ही सर्व टीका फेटाळून लावत ज्ञान प्रकाश म्हणतात, "तुम्ही परिषदेतील चर्चा ऐकली तर हा सर्व कार्यक्रम अकादमिक चर्चेचा असल्याचं तुमच्या लक्षात येईल. आपल्याबाबत कोणतीही चर्चा होऊ नये असं हिंदुत्ववादी लोकांना वाटतं. भारत आणि हिंदुत्व ही एकच गोष्ट नाही. भारतामध्ये संस्कृतींचं वैविध्य आहे. हिंदुत्व ही एक कट्टरतावादी राजकीय विचारसरणी आहे. आता आम्ही ठरवलंय की, केवळ एकाच परिषदेवर न थांबता असे उपक्रम सातत्याने केले जायला हवेत."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)