Tokyo Paralympic: दोन्ही हात नसलेल्या जलतरणपटूनं मिळवली 4 सुवर्णपदकं

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

चीनचा पॅरा-स्विमर (जलतरणपटू) झेंग ताओ सध्या सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होतोय.

दोनही हात नसलेल्या झेंग ताओने टोकियो पॅरालिम्पिकच्या जलतरण स्पर्धेत एक-दोन नव्हे, तर तब्बल चार सुवर्ण पदकांची कमाई केलीय.

जलतरण स्पर्धेतील फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक आणि बटरफ्लाय या तीनही प्रकारत झेंग ताओनी 'सुवर्ण' कामगिरी केलीय.

टोकियो पॅरालिम्पिकमधील झेंग ताओची ही कामगिरी केवळ पॅरालिम्पिकमधील विक्रम नाहीय, तर विश्वविक्रम आहे.

त्याचसोबत आणखी एका अनोख्या विक्रमाशीही झेंग ताओ जोडला गेला. बुधवारी (1 सप्टेंबर) झालेल्या 50 मीटर फ्रीस्टाईलच्या अंतिम फेरीत झेंग ताओनी विजय मिळवला आणि पॅरालिम्पिकमध्ये चीनच्या 500 व्या सुवर्णपदकाचीही नोंद केली.

1984 साली चीननं न्यूयॉर्कमध्ये आयोजित पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला होता. झेंग ताओच्या सुवर्णमुळे चीनच्या खात्यात 500 सुवर्णपदकांची नोंद झाली.

स्पर्धा जिंकल्यानंतर झेंगनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, "टोकियो पॅरालिम्पिक माझी शेवटची स्पर्धा असल्यानं कुठल्याही खेदाविना इथून जातोय. ही स्पर्धा माझ्या सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक आहे."

सोमवारी (30 ऑगस्ट) झालेल्या 50 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारातील जलतरण स्पर्धेत तर झेंग ताओने 31.42 सेकंदात शर्यत पूर्ण करत विश्वविक्रमाची नोंद केली.

एका स्पर्धेनंतर झेंग ताओ त्यांच्या मुलीशी व्हीडिओद्वारे बोलताना म्हणाले, "माझ्याकडे पाहा, दोन्ही हात नसतानाही मी पोहू शकतो."

झेंगचा मुलीसोबतच बोलतानाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्यात त्याचं कौतुकही केलं जातंय. कुणी झेंगला प्रेरणादायी मानतंय, तर कुणी अभिमान मानतंय. सोशल मीडियावरून अशाप्रकारे कौतुकाचा वर्षाव होतोय.

लहान असतानाच झेंगचे दोन्ही दोन्ही विजेच्या धक्का लागल्यामुळे गेले होते.

टोकिया पॅरालिम्पिकसाठी झेंग ताओनी दररोज 10 किलोमीटर पोहण्याचा सराव केला होता, असं विविध वृत्तांमध्ये प्रसिद्ध झालंय.

वयाच्या 13 व्या वर्षांपासून झेंग पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत आलाय.

झेंगनं पॅरालिम्पिकमधलं त्याचं पहिलं सुवर्णपदक लंडन 2012 मध्ये 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात मिळवलं होतं.

आतापर्यंत झेंगच्या खात्यात एकूण 9 पदकं जमा आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)