You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : अमेरिकाला 1945 नंतर सर्व युद्धमोहिमा अपूर्ण सोडाव्या लागल्यात, कारण...
- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी हिंदी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
अफगाणिस्तानातून अमेरिकेने माघार घेतली आहे. या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाचं उत्तर सगळे शोधण्याचा प्रयत्न करताहेत ते म्हणजे जगातला सर्वात शक्तीशाली देश, ज्या देशाकडे जगातलं सगळ्यात आधुनिक सैन्य आहे, तंत्रज्ञान आहे, आधुनिक वायुसेना आहे असा देश तालिबानला हरवू का शकला नाही?
अमेरिकेतले बुद्धिजीवी एका गोष्टीचा विचार करकरून थकलेत की अमेरिका आधुनिक युद्धात का जिंकू शकत नाही?
31 ऑगस्टला अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानातून परतलं आणि त्या देशातल्या अमेरिकेच्या भागीदारीचा शेवट झाला. अशातच चीन आणि रशियाने मात्र तालिबानशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात पुढाकार घेतला आहे.
अमेरिकेची बाजू मांडताना काही लोक असंही म्हणतात की अमेरिकेला इराक आणि अफगाणिस्तानात यश मिळालं आहे.
शिकागो विद्यापीठाचे प्रा टॉम कॅसिडी म्हणतात की, "अमेरिकन सैन्याने ओसामा बिन लादेनला शोधून काढलं, अल-कायदाला संपवलं, त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांना एकतर मारून टाकलं किंवा अटक केली. अफगाणिस्तानात प्राथमिक सुविधांचा विकास झाला. महिलांना शिक्षण देण्यासाठी शाळा उघडल्या गेल्या, एक सुशिक्षित वर्ग उदयाला आला. इराकमध्ये तथाकथित इस्लामिक स्टेटसारख्या धोकादायत दहशतवाद्यांना संपवलं, सद्दाम हुसेन आणि लीबियात कर्नल गद्दफीसारख्या हुकुमशाहांचा अंत झाला. हे यश नाही तर काय?
1945 नंतरची अमेरिकेची पाच प्रमुख युद्धं
अमेरिकेत एका गोष्टीवर सगळ्यांचं एकमत आहे की अफगाणिस्तान, सीरिया, इराक आणि येमेनमध्ये अमेरिका दहशतवादाला मुळापासून उपटून फेकण्यात अयशस्वी ठरली आहे. तालिबानचा अफगाणिस्तानात विजय आणि त्यांचं सत्तेत परतणं अमेरिकाच्या पराजयाचं ठसठशीत उदाहरण आहे.
इतिहासात डोकावून पाहिलं तर 1945 पर्यंत अमेरिकेने जवळपास सगळी मोठी युद्धं जिंकली, पण 1945 नंतर मात्र अमेरिकेने फार कमी युद्धांमध्ये निर्णायक विजय मिळवला आहे.
1945 नंतर अमेरिकेने पाच प्रमुख युद्धं केली. यात कोरिया, व्हिएतनाम, आखाती युद्ध, इराक आणि अफगाणिस्तान यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त काही लहान-लहान युद्धं केली ज्यात सोमालिया, येमेन आणि लीबियाचा समावेश होतो.
1991च्या आखाती युद्धात झालेला विजय सोडून इतर सगळ्या युद्धांमध्ये अमेरिकेला माघार घ्यावी लागली आहे.
कार्टर मॅलकॅसियन यांनी अनेक वर्षं अमेरिकेसाठी अफगाणिस्तानात काम केलं आहे. या अनुभवांवर आधारित त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, 'द अमेरिकन वॉर इन अफगाणिस्तान - अ हिस्ट्री'. हे पुस्तक जुलै महिन्यात प्रसिद्ध झालं.
अमेरिका युद्धात का हरते?
कार्टर आपल्या पुस्तकात काही नव्या गोष्टींवर प्रकाश टाकतात. ते म्हणतात की 1945 च्या आधी जी युद्धं झाली होती ती राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये झाली होती आणि अशी युद्ध कायम अमेरिकेने जिंकली.
"त्यांना नव्या युगातल्या अशा सगळ्या युद्धांमध्ये हार मानवी लागतेय जिथले लढवय्ये स्थानिक बंडखोर आहेत. त्यांच्या सैन्याची ताकद कमी असेल पण तिथलं लष्कर जास्त निश्चयी आणि कटिबद्ध आहे."
हार मानणं तर वेगळी गोष्ट पण बेनगाजी, सोमालिया, सॅगॉन आणि आता काबुलमधून ज्या हतबलतेने अमेरिकन सैन्याला माघार घ्यावी लागते ती हतबलता अमेरिकेसाठी लाजिरवाणी आहे.
अमेरिका अशा युद्धांमध्ये का हरते याची अनेक कारणं आहेत असं तज्ज्ञांना वाटतं. त्यातलंच एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्थानिक संस्कृती समजून न घेणं.
अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणांचे तज्ज्ञ आणि स्वार्थमोर कॉलेजचे प्राध्यापक डॉमिनिक टियरनी यांनी बीबीसीला दिलेल्या इमेल इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की, "अफगाणिस्तान, इराक, सीरिया आणि लीबियासारख्या लढाया म्हणजे मोठी गृहयुद्ध आहेत. या युद्धांमध्ये ताकद किंवा शस्त्रसज्जता तुमच्या विजयाची खात्री देत नाहीत, विशेषतः जेव्हा अमेरिकेला स्थानिक संस्कृतीविषयी काहीही माहिती नसतं आणि ते अशा शत्रुशी लढत असतात ज्यांना त्या भागाची जास्त माहिती असते आणि ते जास्त कटिबद्ध असतात."
युद्धाच्या मैदानात अमेरिकेची स्थिती
डॉमिनिक टियरनी आपलं पुस्तक 'द राईट टू लूज ए वॉर, अमेरिका इन एज ऑफ अनविनेबल कॉन्फ्लिक्ट्स' या पुस्तकात मान्य करतात की अमेरिका गेल्या काही काळात झालेली युद्धं हरली आहे.
या नव्या युगातल्या लपून छपून अचानक हल्ला करण्याच्या युद्धपद्धतींशी जुळवून घेताना अमेरिकेला कसा संघर्ष करावा लागला हे या पुस्तकात डॉमिनिक टियरनींनी सांगितलं आहे.
या गोरिला पद्धतीचं युद्ध न जमल्यामुळे अनेक लढायांमध्ये अमेरिकेला माघार घ्यावी लागली आहे. युद्धाच्या मैदानात कधीही संकट आलं तर अमेरिका त्या दलदलीतून बाहेर पडू शकत नाही. याचे वाईट परिणाम आमचे सैनिक आणि सहकाऱ्यांवर होतात, असं डॉमिनिक आपल्या पुस्तकात लिहितात.
माजी राष्ट्राध्यक्ष बुश यांची भाषणं लिहिणारे डेव्हिड फ्रुम यांनी इराक युद्धाचं आधी समर्थन केलं होतं पण त्यांचं मत आता बदललं आहे.
एका लेखात ते लिहितात, "आम्हाला वाटलं होतं की आम्ही इराकमध्ये चांगले बदल घडवून आणण्यासाठी तयार आहोत, पण तसं नव्हतं. आम्ही अज्ञानी होतो आणि अहंकारीही. आम्ही लोकांच्या त्रासाला कारणीभूत ठरलो. हे कोणासाठीच चांगलं नव्हतं... ना अमेरिकेसाठी, ना इराकसाठी ना त्या भागासाठी."
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पश्चिम आशिया या विषयातले तज्ज्ञ प्रा आफताब कमाल पाशा यांच्यामते स्थानिक संस्कृतीची पक्की माहिती नसणं हेही अमेरिकेच्या परायजयाचं एक प्रमुख कारण आहे.
बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "अमेरिकनांना दुसऱ्या देशांची संस्कृती समजत नाही आणि ते समजून घ्यायला इच्छुकही नसतात. डिक चेनी (अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष) आणि डोनाल्ड रम्सफेल्ड (अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री) जाहीरपणे म्हणाले होते की जेव्हा अमेरिकन सैन्य बगदादमध्ये दाखल होईल तेव्हा इराकचा शिया समुदाय सद्दाम हुसेन यांच्या विरोधात बंड करेल आणि अमेरिकन सैन्याचं हारतुऱ्यांनी, वाजतगाजत स्वागत करेल. झालं का खरंच असं? झाला का बंड? हा इराकचा अंतर्गत प्रश्न होता आणि अमेरिकेला त्या समाजाबद्दल खूप मोठा गैरसमज होता."
प्रा पाशा अफगाणिस्तानात अमेरिकेच्या पराभवाचं आणखी एक उदाहरण देताना म्हणतात,
"अफगाणिस्तानात त्यांचा सामना दुर्गम भागांशी झाला होता. तिथल्या डोंगर-दऱ्या, गुहांचा भाग तालिबानला चांगलाच परिचित होता पण अमेरिकन सैनिकांना त्याबदद्ल विशेष माहिती नव्हती. जेव्हा अमेरिकन सैन्याला कोणताही धोका दिसला त्यांनी सर्वशक्तिनिशी त्या भागावर दारूगोळ्याने हल्ला केला. अशाने पूर्ण भाग उद्ध्वस्त व्हायचा."
राष्ट्रवाद, विचारधारा आणि धर्मयुद्ध
व्हिएतनाम युद्धात उत्तर व्हिएतनाम सरकारने व्हिएत-कोंग नावाने एका कम्युनिस्ट बंडखोर दलाची स्थापना केली होती. या दलाची साम्यवादी विचारसरणी आणि राष्ट्रवाद अमेरिकन सैन्यावर भारी पडली. कारण अमेरिकन सैन्य कायम विचार करायचं की आपल्या देशापासून इतक्या लांब ते कोणसाठी आणि का युद्ध लढताहेत? बंडखोर मात्र लढाईला कटिबद्ध होते.
त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती. प्राण पणाला लावून लढणारे हे बंडखोर अमेरिकन सैन्याला पळवून लावायला यशस्वी ठरले.
तालिबानच्या बाबतीत असंच काहीसं झालंय. अनेक तज्ज्ञांच्या मते तालिबान या युद्धाला फक्त देशाचं युद्ध नाही तर धर्मयुद्ध बनवण्यात यशस्वी ठरलं.
प्रा डॉमिनिक टियरनी म्हणतात की, "तालिबानकडे एक उद्देश होता, धार्मिक, जातीय आणि राष्ट्रवादी भावनांचं मिश्रण होतं. याउलट अफगाण सरकार मात्र लोकशाही किंवा मानवी हक्क किंवा एका राष्ट्रवादाच्या भावनेवर आधारित सकारात्मक संदेश देणारी रूपरेखा तयार करण्यात कमी पडलं."
कार्टर मॅलकॅसियन म्हणतात की, "तालिबानच्या मागे धर्माची प्रेरणा होती. या प्रखर प्रेरणेनेच त्यांना युद्धात शक्तीशाली बनवलं. त्यांनी स्वतःला इस्लामचे प्रतिनिधी म्हणून दर्शवलं तर परदेशी आक्रमणाचा विरोध करा असं आवाहन केलं. या विचारांनी सर्वसामान्य अफगाण लोक भारावून गेले.
सर्वसामान्य अफगाण लोक कट्टरवादी नाहीयेत पण आपल्या मुसलमान असण्याचा त्यांना अभिमान आहे. सरकारी सैनिकांना लढताना अशी कोणतीही प्रेरणा नव्हती. ते कोणत्याही हेतूसाठी, उदिष्टासाठी लढत नव्हते."
जिहादासाठी कटिबद्ध
कार्टर मॅलकॅसियन यांच्या मते तालिबानसाठी मरण्या-मारण्यासाठी तयार असणाऱ्या अफगाण लोकांची संख्या खूप जास्त होती. याचा फायदा तालिबानला झाला. कार्टर यांनी खूप वेळ अफगाणिस्तानात घालवला आहे आणि या काळात ते तालिबानचे सदस्य आणि त्यांच्या समर्थकांनाही भेटले.
त्यांनी आपल्या पुस्तकात एका तालिबान नेत्याचं वक्तव्य लिहिलं आहे. त्या नेत्याने म्हटलं होतं, "मी दररोज अशा घटनांविषयी ऐकतो ज्यात पोलीस किंवा सैन्याचे जवान मारले जातात. मला माहिती नाही ते तालिबानविरोधात लढण्यासाठी कटिबद्ध आहेत की नाही.
अनेक पोलीस आणि जवान फक्त पैशांसाठी लढतात. त्यांना पगार चांगला मिळतो पण त्यांच्यात सरकारचा बचाव करण्याची कोणतीही आंतरिक प्रेरणा नसते, पण तालिबान जिहादसाठी कटिबद्ध आहे."
पाशा यांच्यामते तालिबान जेव्हा लढायला येतात तेव्हा जीवावर उदार होऊन लढायला येतात. पण अमेरिकन आणि अफगाण सैन्याची प्राथमिकता जीव वाचवणं ही असायची.
"अमेरिकेचे सैनिक एका अशा देशासाठी लढत होते जो त्यांचा नव्हताच. तालिबानसारखा त्यांचा दृढनिश्चय, कटिबद्धता नव्हती. तालिबान मात्र स्वतःच्या देशासाठी लढत होते आणि त्यांनी याला धर्मयुद्धाचं स्वरूप दिलं होतं. यामुळे सर्वसामान्य अफगाण लोकांमध्ये तालिबानविषयी सहानुभूती होती."
या पराभावातून अमेरिका काही शिकली का?
अमेरिकेच्या नेतृत्वाने सॅगॉन, व्हिएतनाममध्ये झालेल्या पराभवानंतर कोणताच धडा घेतला नाही. 1993 साली सोमालियातल्या लहानशा कारवाईनंतरही अमेरिका जुन्या चुका परत करतेय असा आरोप झाला.
सोमालियाची राजधानी मोगादिशुच्या रस्त्यांवर मृत अमेरिकन सैनिकांना फरफटत नेतानाची दृश्यं पाहून जगभरात प्रतिक्रिया उमटली. अमेरिकन लोक हे दृश्यं पाहून भावनिक आणि नाराज झाले. आफ्रिकेत अमेरिकेसाठी हा महत्त्वाचा धडा होता.
ऑक्टोबर 1993 मध्ये अमेरिकन सैन्याने सोमाली राजधानी मोगादिशुमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. त्यांचा उद्देश शक्तिशाली सोमाली टोळीप्रमुख जनरल मोहम्मद फराह एडीड आणि त्याचे प्रमुख सहकारी पकडणं हा होता. पण अमेरिकेला ऐडीडच्या बंडखोरांच्या भयानक प्रतिहल्ल्याचा सामना करावा लागला.
दोन अमेरिकन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर पाडली गेली. 18 अमेरिकन आणि 2 संयुक्त राष्ट्रांचे सैनिक मारले गेले होते. त्या काळात अमेरिका सोमालियातलं गृहयुद्ध आणि दुष्काळ संपवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या एका मोहिमेचं नेतृत्व करत होती.
सहा महिन्याच्या आत अमेरिकेने सोमालियातून आपलं सैन्य मागे घेतलं. ही मोहीम निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने आफ्रिकन संकटांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या बाबतीत सावधगिरीचं धोरणं बाळगायला सुरुवात केली.
प्रा डोमिनिक टियरनी म्हणतात की अमेरिकेला धडा घ्यायचा असेल तर बरीच उदाहरणं आहेत. यातला सगळ्यांत मोठा धडा म्हणजे, "पहिलं युद्ध संपायच्या आत दुसरं युद्ध सुरू करू नका. नैतिकता आणि धर्माच्या आवेशात युद्ध करू नका. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे चर्चा करायची संधी असेल तर नाही म्हणू नका. अशी उदिष्ट ठेवा जी साध्य करू शकाल. लक्षात ठेवा युद्ध सुरू करणं सोपं असतं पण संपवण अवघड."
'माघार तर घेतली पण रस संपणार नाही'
प्रा. पाशा इशाराही देतात की अमेरिकेला अफगाणिस्तानात पराभवाचा सामना करावा लागला आहे हे खरं पण तालिबानचं सत्तेत येणं आणि रशिया तसंच चीनशी मैत्री करणं यामुळे अमेरिकेचा या भागातला रस संपणार नाही.
ते म्हणतात, "अफगाणिस्तान आणि इराकमध्ये देशनिर्मिती, लोकशाही, मानवाधिकारांचं संरक्षण आणि महिलांचं शिक्षण हे सगळं वरवर दाखवायला होतं. खरा खेळ तर चीन आणि रशियाला लांब ठेवणं आणि मध्य आशियात रशियाचा प्रभाव कमी करणं हा होता."
"पण आता त्यांनाच अफगाणिस्तानात पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे अमेरिकेची ही रणनिती निष्फळ ठरलीये. आता अमेरिकेसमोर एकच उदिष्ट असेल की काहीही करून चीन आणि रशियाला या भागापासून लांब ठेवायचं. कदाचित आता अमेरिकेला पुन्हा पाकिस्तानच्या मदतीची गरज पडेल. पाकिस्तानचा तालिबानवर बऱ्यापैकी प्रभाव आहे."
काही लोक असंही म्हणताहेत की अमेरिकेने आता सरळ तालिबानशी संवाद साधावा, त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करावेत. काबूल विमानतळाच्या बाहेर झालेल्या स्फोटांनंतर याची झलक पाहायला मिळाली आहे.
रशिया आणि चीन एकत्र आलेत यामुळे अमेरिका वैतागली आहे. पण अमेरिकेला ही चिंता सतावतेय की तालिबानचं अफगाणिस्तान पुन्हा कट्टरवादी संघटनांचं माहेरघर तर बनणार नाही ना? या कट्टरवादी संघटना अमेरिकेत किंवा जगभरात इतर ठिकाणी त्यांच्या दुतावासांवर किंवा सैनिकी तळांवर हल्ला तर करणार नाहीत ना?
अमेरिका अफगाणिस्तानात पुन्हा आपलं सैन्य पाठवेल का?
पाशा यांच्यामते अमेरिका आता पुन्हा सरळ हस्तक्षेप करणार नाही.
ते म्हणतात, "गेल्या काही वर्षांत अमेरिका पाकिस्तानपासून लांब गेलीये. अमेरिका पाकिस्तानवर खूश नाहीये. अर्थात तालिबानशी करार करताना अमेरिकेने पाकिस्तानचीच मदत घेतली. त्यांचं सैन्य परत जात असताना तालिबान हल्ला करणार नाही याची हमीही पाकिस्तानककडून घेतली.
आता अफगाणिस्तानात अमेरिकेची रणनिती निष्फळ ठरलीये तर त्यांना पाकिस्तानची गरज पडणार. अमेरिकेला आता माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्करप्रमुख परवजे मुशर्रफ सारख्या नेत्याची आवश्यकता भासेल ज्यांनी 2001 साली अफगाणिस्तानवर हल्ला करण्यात अमेरिकेला साथ दिली होती."
पाशा म्हणतात, "पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढेल. आता हे पाहावं लागेल की ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकतात की नाही."
डोमिनिक टियरनी म्हणतात, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन अफगाणिस्तानात आणखी एक मोठं युद्ध करण्याच्या पूर्णपणे विरोधात आहेत. पण काही शक्यता आहेत जेव्हा असं घडू शकतं - एकतर मानवीय संकट आलं तर, दुसरं तिथे अतिरेकी संघटनांचा उदय झाला तर किंवा चीनसोबत संबध बिघडून तणाव वाढला तर अफगाणिस्तान मोठ्या देशांच्या युद्धाचं स्थान बनू शकतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)