INDvsENG: हेडिंग्लेत लोटांगण; इंग्लंडचा एक डाव आणि 76 धावांनी विजय

विराट कोहली, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Gareth Copley

फोटो कॅप्शन, विराट कोहली बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

निरभ्र निळंशार आकाश, लख्ख सूर्यप्रकाश अशी फलंदाजीसाठी अनुकूल वातावरण असतानाही इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल गुडघे टेकले. इंग्लंडने हेडिंग्ले कसोटी एक डाव आणि 76 धावांनी जिंकत मालिकेत 1-1 बरोबरी केली.

लॉर्ड्स टेस्ट जिंकत भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र इंग्लंडने हेडिंग्ले टेस्ट जिंकत जशास तसे प्रत्युत्तर दिले.

215/2 वरून पुढे खेळणाऱ्या भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि 278 धावात आटोपला. भारतीय संघाने 63 धावात 8 विकेट्स गमावल्या.

तिसऱ्या दिवशी नाबाद 91 धावांवर असलेला चेतेश्वर पुजारा रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. चेंडू सोडण्याचा प्रयत्न पुजाराच्या अंगलट आला. तो एकाही धावसंख्येची भर घालू शकला नाही.

जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर पंचांनी कोहलीला बाद ठरवलं. अजिंक्य रहाणेने रिव्ह्यू घेण्याचा सल्ला दिला. रिप्लेत चेंडू पॅडला लागल्याचं स्पष्ट झालं आणि कोहलीला जीवदान मिळालं. कोहलीने याचा फायदा उठवत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर रूटच्या हाती झेल देत तो माघारी परतला. त्याने 55 धावांची खेळी केली.

विराट कोहली, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, LINDSEY PARNABY

फोटो कॅप्शन, ओली रॉबिन्सन

अँडरसनने रहाणेला बाद करत भारताच्या डावाला खिंडारच पाडलं. रहाणेने 10 धावा केल्या. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा ऋषभ पंतचा प्रयत्न स्लिपमध्ये क्रेग ओव्हर्टनच्या हातात जाऊन विसावला. त्याने एका धावेचं योगदान दिलं.

मोईन अलीने मोहम्मद शमीला त्रिफळाचीत केलं. रॉबिन्सनने इशांत शर्माला बाद करत डावात पाचव्या विकेटची नोंद केली.

रवींद्र जडेजाने फटकेबाजी करत पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. ओव्हर्टनने त्याची खेळी संपुष्टात आणली. त्याने 30 धावा केल्या. सिराजला ओव्हर्टनने त्रिफळाचीत केलं आणि भारताचा डाव 278 धावात आटोपला.

रॉबिन्सनने 5 तर क्रेग ओव्हर्टनने 3 विकेट्स घेतल्या.

तिसऱ्या दिवशी रोहित, पुजाराने खिंड लढवली

रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी चिवटपणे खेळ करत तिसऱ्या दिवशी पडझड होऊ दिली नाही. रोहित शर्माने 156 चेंडूत 59 धावांची खेळी करत डाव सावरला.

पुजारा-रोहित शर्मा जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर कोहली-पुजारा जोडीने तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत संयमाने खेळ करत पराभव दूर नेला.

रूटची शतकी खेळी; इंग्लंडचा धावांचा डोंगर

कर्णधार जो रूटच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने 432 धावांचा डोंगर उभारला.

इशांत शर्माच्या गोलंदाजीवर चौकार खेचत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने कारकीर्दीतील 23व्या शतकाची नोंद केली. यंदाच्या कॅलेंडर वर्षातलं रूटचे हे सहावं शतक आहे.

या मालिकेतील रूटचं हे सलग तिसरं शतक होतं. नॉटिंगहम, लॉर्ड्सपाठोपाठ हेडिंग्लेतही रूटने भारतीय संघाला शतकी तडाखा दिला. रूटचं भारताविरुद्धचं हे आठवं शतक आहे.

विराट कोहली, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, GARETH COPLEY

फोटो कॅप्शन, जो रूट

रॉरी बर्न्स (61) आणि हसीब हमीद (68) या सलामीवीरांनी 135 धावांची सलामी दिली.

बर्न्सला मोहम्मद शमीने तर हसीबला जडेजाने बाद केलं. डॉम सिबलेच्या जागी संधी मिळालेल्या डेव्हिड मलानने 70 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. क्रेग ओव्हर्टनने 32 धावांची उपयुक्त खेळी केल्याने इंग्लंडने चारशेचा टप्पा ओलांडला.

भारतातर्फे मोहम्मद शमीने 4 तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडने 354 धावांची भक्कम आघाडी घेतली.

78 धावांत खुर्दा

लॉर्ड्स टेस्ट जिंकत दमदार आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला हेडिंग्ले टेस्टमध्ये नामुष्कीला सामोरं जावं लागलं. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी 40.4 ओव्हर्समध्ये 78 धावांतच गुडघे टेकले.

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर भारतीय फलंदाज निरुत्तर ठरले.

भारताने लॉर्ड्स टेस्टचा संघच कायम ठेवला तर इंग्लंडने डॉम सिबले आणि मार्क वूड यांच्याऐवजी डेव्हिड मलान आणि क्रेग ओव्हर्टन यांना संघात समाविष्ट केलं.

जेम्स अँडरसनने पहिल्याच ओव्हरमध्ये लोकेश राहुलला बाद केलं. राहुल भोपळाही फोडू शकला नाही. भरवशाचा चेतेश्वर पुजारा अँडरसनच्या आक्रमणासमोर नामोहरम ठरला. त्याला केवळ एका धावेचं योगदान देता आलं.

गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मसाठी झगडणारा कर्णधार विराट कोहली अँडरसनचाच शिकार ठरला. टेस्ट क्रिकेटमध्ये कोहलीला सर्वाधिक वेळा (7) वेळा ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयन आणि जेम्स अँडरसनने बाद केलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मोह कोहलीच्या अंगलट आला. कोहलीने 7 धावा केल्या.

विराट कोहली, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Gareth Copley

फोटो कॅप्शन, जेम्स अँडरसन

अँडरसनचा पहिला स्पेल 8-5-6-3 असं होतं. रोहित शर्माने एका बाजूने खिंड लढवत प्रतिकार केला. रोहित शर्माने अजिंक्य रहाणेच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 92 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली. ओली रॉबिन्सनने रहाणेचा प्रतिकार संपुष्टात आणला. त्याने 18 धावा केल्या. रॉबिन्सननेच ऋषभ पंतला चकवत बाद केलं.

रोहित रवींद्र जडेजाच्या साथीने डाव सावरणार असं वाटत होतं. मात्र ओव्हर्टनच्या गोलंदाजीवर विचित्र पद्धतीने पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न रॉबिन्सनच्या हातात जाऊन विसावला.

आक्रमक पवित्र्याला मुरड घालून संयमाने खेळणाऱ्या रोहितची एकाग्रता भंग पावली. त्याने 105 चेंडूत 19 धावांची खेळी केली.

लॉर्ड्स कसोटीत अर्धशतकी खेळी करणारा मोहम्मद शमी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सॅम करनने रवींद्र जडेजाला पायचीत केलं. त्याने 4 धावा केल्या. जसप्रीत बुमराहही भोपळाही फोडू शकला नाही. सिराजला ओव्हर्टनने बाद केलं. इंग्लंडचा विकेटकीपर जोस बटलरने पाच झेल टिपले.

अँडरसन आणि ओव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. भारतीय फलंदाजांना 50 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. भारतीय संघाची इंग्लंडमधली ही तिसऱ्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या आहे. भारतीय संघासाठी ही एकूण नववी नीचांकी धावसंख्या आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)