You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गेल ऑम्वेट यांचं निधन
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, लेखिका, स्त्री आणि श्रमिकांच्या हक्कांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या.
सांगली जिल्ह्यातल्या कासेगावात त्या व त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर राहात होत्या. तिथंच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
गेल ऑम्वेट यांचं नाव जागतिक पातळीवर भारतीय समाजशास्त्रवरील अधिकार असणाऱ्या अभ्यासक म्हणून घेतलं जातं.
विशेषत: भारतीय जातसंस्था, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरप्रणित चळवळी, स्त्रियांचे आणि श्रमिकांचे प्रश्न आणि लढे हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते.
त्यासंदर्भात त्यांनी विपुल लिखाण केलं. त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह भारत आणि परदेशातील अनेक विद्यापीठांत त्यांनी शिकवलंही.
गेल ऑम्वेट या मूळच्या अमेरिकेच्या, पण भारतीय चळवळींच्या अभ्यासासाठी त्या इथे आल्या आणि भारताच्याच बनून गेल्या.
महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि चळवळीचा संदर्भ घेत वसाहतवादी भारतातील सामाजिक-सांस्कृतिक बंडाचा अभ्यास त्यांनी केल्या. तोच त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंधही होता.
गेल ऑम्वेट यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचाही सखोल अभ्यास केला आणि त्यावर लिखाणही केलं.
या निमित्तानं भारतीय जातिसंस्थेचा त्यांचा अभ्यास, महाराष्ट्रातल्या संतपरंपरेचा अभ्यास यावरही त्या लिहित-बोलत राहिल्या. मराठीवर त्यांचं प्रभुत्व होतं.
गेल ऑम्वेट यांच्या अभ्यासामुळे आणि संशोधनामुळे कायमच्या महाराष्ट्राच्याच झाल्या. त्यांनी भारतीय नागरिकत्वही घेतलं आणि डॉ. भारत पाटणकरांशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर सांगली जिल्ह्यातलं कासेगांव हे त्यांचं घर झालं.
'श्रमिक मुक्ती दला'च्या विविध आंदोलनांमध्येही त्यांनी भाग घेतला. परित्यक्तांच्या प्रश्नांशीही त्या कायम जोडलेल्या राहिल्या.
अभ्यास, प्रवास, लेखन आणि चळवळ यांत केलेल्या कामानं गेल ऑम्वेट या भारतात आणि भारताबाहेरही विदुषी म्हणून गणल्या गेल्या. त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरवलं गेलं.
सत्यशोधक ब्राम्हणेतर चळवळीला जागतिक संदर्भ दिला- सदानंद मोरे
"गेल यांनी महाराष्ट्रतल्या सत्यशोधक ब्राम्हणेतर चळवळीचा अभ्यास केला आणि त्याचं पुनरुज्जीवन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मुख्य म्हणजे त्या चळवळीला त्यांनी जागतिक संदर्भ देत त्या पातळीवर त्यांनी नेलं. त्या महाराष्ट्रात आल्या आणि लाल निशाण पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अगोदर अभ्यास सुरू केला. त्यांचा दृष्टिकोन मार्क्सवादी होता. पण शेवटच्या टप्प्यावर अपरिहार्यपणे तुकोबांपाशी आल्या.
तुकोबांच्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. हा वैयक्तिक आनंद की त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या समाजशास्त्र विभागात असतांनाही आम्ही एकत्र काम केलं." असं ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी सांगितलं.
एक प्रतिभावान व्यक्ती आपण गमावली- जयंत पाटील
पुरोगामी लेखिका, समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्वेट यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. गेल ऑम्वेट यांच्या निधनाने आपण एक अत्यंत प्रतिभावान व्यक्ती गमावली आहे. जरी त्यांचे अभ्यासाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असला तरी आयुष्यभर त्यांचा वावर प्रामुख्याने सांगली, सातारा भागात राहिला.
अमेरिकेतून आलेल्या एक मुलीने भारतीय नागरिकत्व स्वीकारून, आयुष्यभर भारतात राहून भारत आणि भारतीय समाज व्यवस्था समजून घेऊन त्याची नव्याने मांडणी केली असं मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
"भारतीय समाज, आदिवासी जीवनपद्धती, लोकजीवन, भारतीय मौखिक परंपरा, संत साहित्य यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत, समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत", अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)