तालिबान: अफगाण नागरिकांना बाहेर काढणारं C-17 विमान कसं आहे?

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर 15 ऑगस्टला ताबा मिळवला. त्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाच्या एका विमानाने 183 मुलांसह 823 अफगाण नागरिकांना देशातून सुखरुप बाहेर काढलं.
बोईंग C-17 ग्लोबमास्टर 3 साठी हा एक विक्रम होता. या विमानाने काबूलच्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं.
चार इंजिन असलेल्या या वाहतूक विमानाची सध्या जोरदार चर्चा आहे.
हे विमान 80 च्या दशकात बनले आणि 90 च्या दशकात या विमानाची उड्डाणं सुरू झाली.
या विमानाचा वापर अनेक देश, सैन्य, मालवाहू तर जगभरात धोक्यात असलेल्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी केला जातो.
रविवारी (22 ऑगस्ट) एका अफगाण महिलेने C-17 मध्ये एका बाळाला जन्म दिला. विमान जर्मनीतील रेमस्टाईन हवाई तळावर जात असताना या गर्भवती महिलेला वेदना सुरू झाल्या. काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने विमानातील कार्गोमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला.
भारताकडूनही वापर
अमेरिका आणि ब्रिटन व्यतिरिक्त भारताकडूनही C-17 चा वापर केला जातो. आता सुद्धा अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्यासाठी भारताने हेच विमान वापरले.
रविवारी (22 ऑगस्ट) काबूल विमानतळावरून 168 जण दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर उतरले. यात 24 अफगाण हिंदू आणि शीखांचा समावेश होता.

फोटो स्रोत, US Air Mobility Command
बोईंगच्या वेबसाईटनुसार, भारतीय हवाई दलात ग्लोबमास्टर 3 C-17 ची संख्या सध्या 11 आहे. भारतीय हवाई दल अनेकदा मदत कार्यासाठी या विमानाचा वापर करताना दिसते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होती. त्यावेळी टँकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी याच विमानाचा आधार घेण्यात आला होता.
अमेरिकेच्या हवाई दलाच्या फॅक्ट शीटनुसार हे विमान 77 हजार 519 किलोग्रॅमपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता असेल यादृष्टीने रचना करण्यात आली आहे.
सशस्त्र वाहने, ट्रक आणि अगदी एम 1 अब्रामच्या लढाऊ टाक्यादेखील या विमानात नेल्या जाऊ शकतात.

फोटो स्रोत, EPA
तीन जणांच्या क्रूमध्ये दोन वैमानिक आणि एक लोडमास्टर असतात जे मागील बाजूने विमानात माल चढवतात.
आखाती देशांनी अमेरिकेसह अनेक देशांना विस्थापित लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई तळ उपलब्ध करून दिले आहेत.
कतारच्या राजधानीत उभारलेल्या केंद्रांत लोकांची संख्या वाढल्याने अमेरिकेने शुक्रवारी (20 ऑगस्ट) आपली उड्डाणं स्थगित केली.

ब्रिटनने 20 हजार अफगाण निर्वासितांना दीर्घ काळासाठी प्रवेश देणार असल्याची घोषणा केली आहे. कॅनडाने सुद्धा याबाबत घोषणा केली. अमेरिका आणि जर्मनीने मात्र किती निर्वासित घेणार आहेत हे स्पष्ट केलेले नाही.
अधिकारी आता लोकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने रविवारी एक निवेदन जारी केले की, लोकांना देशातून बाहेर काढण्यासाठी 18 व्यावसायिक विमानांची मदत घेतली जाईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























