तालिबानसोबत अफगाण महिलांसाठी काम करण्याची इच्छा असलेली महिला

अफगाण

फोटो स्रोत, Reuters

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये तालिबानचा प्रवेश आणि राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्यापासून गोंधळ उडालेला दिसत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील हजारो नागरिक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. मेहबुबा सिराज या मात्र पळून जाणाऱ्यांपैकी नाहीत.

मेहबुबा सिराज या महिला आणि मुलांच्या अधिकारांसाठी दीर्घ काळापासून काम करणाऱ्या 'वुमन स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर' नावाच्या संघटनेच्या प्रमुख आहेत. त्यांची संघटना महिला आणि मुलींची साक्षरता आणि कौटुंबीक हिंसाचार अशा मुद्द्यांवर जनजागरण करून त्यांच्या सबलीकरणासाठी काम करते.

दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत सिराज अमेरिकेत होत्या. पण आता त्यांनी अफगाणिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

"माझ्यावर जबाबदारी असलेल्या सर्व महिला, मुली आणि इतर लोकांसाठी मला याठिकाणी राहायचं आहे. त्या सर्वांना एकटं सोडून मी देशाबाहेर जाऊ शकत नाही," असं त्या बीबीसीबरोबर बोलताना म्हणाल्या.

मेहबुबा सिराज यांना तालिबानबरोबर त्यांच्या म्हणजेच तालिबानच्या महिलांबरोबरच्या वर्तनासंदर्भात काम करण्याची इच्छा आहे.

"आपण कमीत कमी त्यांच्याशी बोलू तरी शकतो अशी मला आशा आहे. जर आपण त्यांच्यासमोर बसून चर्चा करू शकलो, आणि कदाचित ते समजदार असतील तर अफगाणिस्तानच्या महिला काय करू शकतात, हे त्यांच्या लक्षात येऊ शकेल," असं त्या म्हणतात.

'आमची स्वप्न उध्वस्त झाली आहेत'

तालिबाननं 1996 मध्ये सर्वप्रथम अफगाणिस्तानची सत्ता मिळवली होती. पण 2001 मध्ये अमेरिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तालिबानला सत्तेतून बाजुला केलं.

तालिबानच्या यापूर्वीच्या कार्यकाळात (1996-2001) महिला आणि मुलींना कठोर कायद्यांचा अवलंब करत जीवन जगायला भाग पाडल जात होतं.

महिलांना शिक्षण आणि काम करण्याची परवानगी नव्हती. पुरुष सोबत असल्याशिवाय त्यांना घराबाहेर निघता येत नव्हतं. त्यांना चेहरा पूर्ण झाकावा लागत होता. नियम मोडले तर मैदानांमध्ये सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके मारले जात होते. तसंच मृत्यूची शिक्षाही दिली जात होती. तर व्याभिचाराची शिक्षा संगसार (दगडांनी ठेचून मारण्याची) होती.

त्यामुळे यापूर्वीचा अनुभव पाहता महिला यावेळीही घाबरलेल्या आहेत, हे स्पष्ट आहे.

तालिबान सरकारनं पुन्हा ताबा मिळवल्याने काबूलमध्ये लोक घाबरलेले असल्याचं, अफगाणिस्तानच्या खासदार फरझाना कोचाई म्हणाल्या आहेत.

अफगाणिस्तान

"प्रत्येकाच्या मनात किती भीती आहे? याचा अंदाज कसा लावायचा हेच मला कळत नाही. ते सध्या एका अशा स्थितीचा सामना करत आहेत की, हे खरंच घडतंय यावर त्यांना विश्वास बसत नाही. आपण कुठं जावं काय करावं हे त्यांना कळत नाही," असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.

तालिबान परतल्यामुळे महिलांचं जीवन पूर्णपणे उध्वस्त होईल, असं एक लेखिका म्हणाल्या आहेत. त्यांनी नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.

"आम्हाला हवं ते काम किंवा जे काही मला करायचं आहे, ते करायला मिळेल की नाही हेच मला माहिती नाही. माझ्यासारख्या अनेक तरुणी आहेत. आमची स्वप्नं उध्वस्त झाली आहेत. तसंच उज्ज्वल भविष्याच्या आशाही आता वेगानं मावळत आहेत."

'घाबरण्याची वेळ नाही'

मात्र सिराज यांच्या मते महिला आणि मुलींसाठी चांगली स्थिती निर्माण व्हावी यासाठी या यंत्रणेबरोबर काम करणं शक्य आहे.

"यापूर्वी (तालिबानच्या आधी) जगानं किंवा आपल्या देशानंही अफगाण महिलांची शक्ती अनुभवलेली नाही."

"आपल्या क्षमतेचा वापर ज्या पद्धतीनं करायला हवा होता, तसा त्यांनी कधीही केला नाही. ज्या पद्धतीनं आपल्याला मुख्य प्रवाहात सहभागी करून घ्यायला हवं होतं, तसं करण्यात आलं नाही. पण कदाचित ते (तालिबान) यावेळी तसं करतील,'' असं सिराज म्हणाल्या.

"त्यांनी तसं केलं तर आपण सुरक्षित असू. जर त्यांनी तसं केलं नाही तर जोपर्यंत सुरक्षितता असेल, माझ्या मुली ठिक असतील आणि इतर सर्व ठिक असेल, तर मलाही काही अडचण नाही."

सिराज

सिराज यांच्या मते, त्या तालिबानला घाबरत नाही. मात्र आता त्या भीतीपोटी पराभव पत्करून बसूही शकत नाहीत.

"ही घाबरण्याची किंवा पश्चात्ताप करण्याची वेळ नाही. आता नाटक करायला वेळच नाही," असं त्या म्हणतात.

पण त्या अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर राग व्यक्त करत त्यांच्यावर टीकाही करतात. कारण अफगाणिस्तानच्या नागरिकांना तालिबानच्या दयेच्या भरवशावर सोडून देण्यात आलं आहे, असं त्यांचं मत आहे.

"यावर माझ्या मनात किती राग आहे, ते मी तुम्हाला सांगूही शकत नाही. आंतरराष्ट्रीय प्रयत्न आणि अखेरच्या क्षणांमध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला एकटं पाडण्यात आलं, त्यामुळं मी निराश झाले आहे," असं सिराज म्हणाल्या.

तालिबान

फोटो स्रोत, Reuters

आंतरराष्ट्रीय देणगी देणाऱ्यांबरोबर काम केल्यामुळे आणि 20 वर्षं हस्तक्षेप करणाऱ्या विदेशींचं प्रतिनिधित्व केल्याबद्दल, तालिबान शिक्षा देईल याची भीती वाटते का? असा प्रश्नही आम्ही त्यांना केला. त्यावर त्यांनी "असं काहीही नाही" हे उत्तर दिलं.

"मी खरंतर अफगाणिस्तानचं प्रतिनिधित्व करते. मी कायम हेच केलं आहे. मला वाटतं की, त्यांच्यापैकी (तालिबान) किमान काही जणांना तरी याबाबत माहिती आहे."

काही लोक सिराज यांचं हे पाऊल धाडसी असल्याचं म्हणू शकतात. पण सिराज यांना स्वतःला तसं वाटत नाही.

"मी काही शहीद वगैरे नाही. किंवा मी खूप धाडसी महिलाही नाही. पण मला जबाबदारीची जाणीव आहे आणि माझ्या काही लोकांची जबाबदारी माझ्यावर आहे.

"मी एक अफगाण महिला आहे आणि मला माझ्या देशात आणि याठिकाणी त्यांच्याबरोबर राहायचं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)