लॉर्ड्स: टीम इंडियाच्या शिलेदारांनी अशी जिंकली क्रिकेटची पंढरी

लॉर्ड्स, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, GLYN KIRK

फोटो कॅप्शन, विराट कोहली संघासह
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

लॉर्ड्स कसोटीत दिमाखदार सांघिक प्रदर्शनासह भारतीय संघाने संस्मरणीय विजय मिळवला. प्रत्येक खेळाडूने दिलेलं योगदान हे या विजयाचं वैशिष्ट्य होतं.

इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या 64 सामन्यात भारताचा हा आठवा विजय आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पावसाने भारताच्या जिंकण्यावर पाणी फेरलं होतं. मात्र या कसोटीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन करत बाजी मारली.

पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मॅचचं पारडं इंग्लंडच्या बाजूने होतं. भारतीय संघाने 181/6 वरून पुढे खेळायला सुरुवात केली.

तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध ऋषभ पंत अर्ध्या तासात माघारी परतल्यानंतर भारताचा दुसरा डाव झटपट गुंडाळला जाणार अशी चिन्हं होती.

मात्र मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद 89 धावांची भागीदारी करत इंग्लंडला पिछाडीवर टाकलं. शमीने कारकीर्दीतील दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. शमीने 56 तर बुमराहने 34 धावांची खेळी केली.

लॉर्ड्स, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा

रोहित शर्मा- ढगाळ आणि काळोखं वातावरण, चेंडूला मिळणारा स्विंग अशा अतिशय कठीण वातावरणात रोहित शर्माने इंग्लंडच्या जेम्स अँडरसन, मार्क वूड, ओली रॉबिन्सन, सॅम करन यांचा मारा खेळून काढत पहिल्या डावात 83 धावांची शानदार खेळी केली.

रोहितने आक्रमक पवित्र्यासह खेळ केल्याने राहुलला खेळपट्टीवर स्थिरावायला पुरेसा वेळ मिळाला. दुसऱ्या डावात रोहितने 21धावा केल्या.

लॉर्ड्स, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोकेश राहुल

लोकेश राहुल- मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणाऱ्या राहुलने अतिशय संथ सुरुवात केली. ढगाळ वातावरण बाजूला झाल्यावर राहुलने भात्यातल्या फटक्यांची पोतडी उघडली.

राहुलच्या शतकामुळेच भारतीय संघाला 364 धावांची मजल मारता आली. राहुलच्या शतकाने भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला.

लॉर्ड्स, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा- संथ गतीने धावा करणे आणि मोठी खेळी करण्यात अपयश यामुळे पुजारावर प्रचंड टीका होत होती. पहिल्या डावात नऊ धावा करू शकणाऱ्या पुजाराने दुसऱ्या डावात 206 चेंडूत 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

पुजारा-रहाणेने केलेल्या भागीदारीमुळे भारतीय संघ इंग्लंडला मोठं लक्ष्य देऊ शकला.

लॉर्ड्स, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे

अजिंक्य रहाणे- उपकर्णधार असूनही अजिंक्यच्या डोक्यावर वगळलं जाण्याची टांगती तलवार होती. पहिल्या धावात अपयशी ठरलेल्या अजिंक्यने दुसऱ्या डावात मात्र 61 धावांची संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळी केली.

अजिंक्यच्या खेळीमुळेच भारतीय संघाने दुसऱ्या डावात सन्मानजनक धावसंख्या गाठली.

विराट कोहली- बॅटिंगपेक्षाही कोहलीचं नेतृत्व या सामन्यात अधोरेखित करणारं ठरलं.

इंग्लंडला 60 षटकात 272 धावांचं लक्ष्य देण्याचा निर्णय, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेले बदल, प्रतिस्पर्ध्यांच्या बोलंदाजीला दिलेलं उत्तर यामुळे कॅप्टन कोहलीने पैकीच्या पैकी गुण कमावले. कोहलीने दोन्ही डावात मिळून 62 धावा केल्या.

ऋषभ पंत- अपारंपारिक पद्धतीच्या शैलीमुळे ऋषभ पंतच्या बॅटिंगला बॉक्सऑफिस असं म्हटलं जातं. पहिल्या डावात ऋषभने 37 तर दुसऱ्या डावात 22 धावांचं योगदान दिलं.

ऋषभच्या आक्रमणामुळे गोलंदाज गांगरुन जातात. दुसऱ्या डावात तीन महत्त्वपूर्ण झेल आणि रिव्ह्यू घेण्याच्या प्रक्रियेतही कर्णधाराला साथ दिली.

रवींद्र जडेजा- अष्टपैलू म्हणून छाप उमटवण्यात यशस्वी. पहिल्या डावात 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. इंग्लंडच्या पहिल्या डावात मार्क वूडला रनआऊट करण्यात योगदान. क्षेत्ररक्षणात नेहमीप्रमाणे ठोस योगदान दिलं.

मोहम्मद शमी- भारतीय संघाच्या दुसऱ्य़ा डावाचं आकर्षण म्हणजे शमीने झळकावलेलं अर्धशतक.

ऋषभ पंत बाद झाल्यानंतर भारताचा डाव झटपट गुंडाळण्याची संधी इंग्लंकडे होती. शमीने तडाखेबंद खेळी करत इंग्लंडला नामोहरम केलं आणि भारताच्या विजयाचा पाया रचला. शमी-बुमराह जोडीची भागीदारी कौतुकाचा विषय ठरली. शमीने तीन विकेट्सही घेतल्या.

लॉर्ड्स, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Stu Forster

फोटो कॅप्शन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह- चाळिशीत पोहोचलेल्या जेम्स अँडरसनला टाकलेला बाऊन्सर, इंग्लंडच्या खेळाडूंविरुद्ध झालेली बाचाबाची, 34 धावांची निर्णायक खेळी, शमीबरोबरची भागीदारी, दुसऱ्या डावात घेतलेल्या तीन विकेट्स यामुळे बुमराहसाठी ही कसोटी संस्मरणीय ठरली.

ओली रॉबिन्सनला टाकलेला स्लोअरवन चर्चेत राहील.

इशांत शर्मा- अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवत इशांत शर्माने उपयुक्तता सिद्ध केली. इशांतने दोन्ही डावात मिळून पाच विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करण्याची हातोटी इशांतने पुन्हा एकदा दाखवून दिली. इशांतने दुसऱ्या डावात 16 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.

लॉर्ड्स, भारत, इंग्लंड

फोटो स्रोत, Mike Hewitt

फोटो कॅप्शन, मोहम्मद सिराज

मोहम्मद सिराज- कर्णधार कोहलीने चेंडू सोपवला की हमखास विकेट पटकावणारा भिडू असा विश्वास सिराजने कमावला आहे. सिराजने दोन्ही डावात मिळून 8 विकेट्स घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं.

जोस बटलरला टाकलेला चेंडू खास म्हणता येईल.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)