लॉर्ड्स भारत विरुद्ध इंग्लड: भारताची इंग्लंडवर 151 धावांनी मात

फोटो स्रोत, Gareth Copley
आक्रमक आणि दिमाखदार खेळाच्या बळावर भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर 151 धावांनी विजय शानदार मिळवला.
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवरचा भारताचा हा तिसरा विजय आहे. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
इंग्लंडच्या भूमीवर झालेल्या 64 सामन्यात भारताचा हा आठवा विजय आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत पावसाने भारताच्या जिंकण्यावर पाणी फेरलं होतं. मात्र या कसोटीत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी जिगरबाज खेळाचं प्रदर्शन करत बाजी मारली.
पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा मॅचचं पारडं इंग्लंडच्या बाजूने होतं. भारतीय संघाने 181/6 वरून पुढे खेळायला सुरुवात केली.
तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध ऋषभ पंत अर्ध्या तासात माघारी परतल्यानंतर भारताचा दुसरा डाव झटपट गुंडाळला जाणार अशी चिन्हं होती.
मात्र मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद 89 धावांची भागीदारी करत इंग्लंडला पिछाडीवर टाकलं. शमीने कारकीर्दीतील दुसऱ्या अर्धशतकाची नोंद केली. शमीने 56 तर बुमराहने 34 धावांची खेळी केली.

फोटो स्रोत, Stu Forster
उपाहारानंतर थोडा वेळ बॅटिंग करून भारताने इंग्लंडसमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक आणि अचूक माऱ्यासमोर इंग्लंडची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळत गेली. इंग्लंडची अवस्था 2/1 अशी झाली.
हसीब हमीद आणि जो रूट यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हमीदला इशांत शर्माने पायचीत केलं. त्यानेच जॉनी बेअरस्टोलाही माघारी धाडलं.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटला बाद करत जसप्रीत बुमराहने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. रूटने 33 धावांची खेळी केली. अर्ध्या तासाच्या प्रतिकारानंतर मोईन अली तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याची खेळी संपुष्टात आणली.
पुढच्याच चेंडूवर सॅम करनला बाद करत त्याने इंग्लंडला अडचणीत टाकलं. जोस बटलर आणि ओली रॉबिन्सन यांनी 76 धावात 30 धावांची खेळी करत सामना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
जसप्रीत बुमराहच्या स्लोअरवनवर रॉबिन्सन पायचीत झाला. मोहम्मद सिराजने बटलरला बाद करत इंग्लंडच्या सामना अनिर्णित करण्याच्या आशा संपुष्टात आणल्या.

फोटो स्रोत, Mike Hewitt
जेम्स अँडरसनला त्रिफळाचीत करत सिराजने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडचा डाव 120 धावात आटोपला. मोहम्मद सिराजने 4 तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. इशांत शर्माने 2 तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.
सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला साधारण 60 षटकात 272 धावा करायच्या होत्या. मात्र भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजीसमोर इंग्लंडने शरणागती पत्करली.
पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
राहुलचं शतक;भारत 364
लोकेश राहुलच्या शानदार शतकाच्या बळावर भारतीय संघाने 364 धावांचा पल्ला गाठला.

फोटो स्रोत, Gareth Copley
रोहित शर्माने 83 धावा केल्या. राहुलने 12 चौकार आणि एका षटकारासह 129 धावांची खेळी केली. जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.
रूटची दीडशतकी खेळी, इंग्लंड 391
कर्णधार जो रूटच्या 180 धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने 391 धावांची मजल मारत अल्प आघाडी घेतली. रूटने 18 चौकारांच्या साथीने ही खेळी सजवली. भारतातर्फे मोहम्मद सिराजने 4 तर इशांत शर्माने 3 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या डावात पडझड आणि नंतर मॅरेथॉन भागीदारी
दुसऱ्या डावात भारताची अवस्था 55/3 अशी होती. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीने चौथ्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी केली. मात्र चौथ्या दिवसअखेर हे दोघेही बाद झाल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली. रहाणेने 61 तर पुजाराने 45 धावांची खेळी केली.
पाचव्या दिवशी ऋषभने चांगली सुरुवात केली. मात्र रॉबिन्सनने त्याला बाद केलं. रवींद्र जडेजाही पाठोपाठ बाद झाला. इशांत शर्माने 16 धावांचं योगदान दिलं. यानंतर शमी-बुमराह जोडीने चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांचा सुरेख मिलाफ साधत इंग्लंडला नामोहरम केलं.
या भागीदरम्यान बुमराह आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये वादावादी झाली. बुमराहच्या हेल्मेटवर बॉल आदळल्याने दोनदा फिजिओंना यावं लागलं. या जोडीने इंग्लंडच्या आवाक्यातला विजय दूर नेला.
शमीने कारकीर्दीतील दुसरं अर्धशतक साकारलं. भारतीय खेळाडूंनी उपाहारावेळी जल्लोषात या जोडीचं पॅव्हेलियनमध्ये स्वागत केलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























