तालिबानचा अफगाणिस्तानच्या चार प्रांतांच्या राजधानीवर कब्जा

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, EPA

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

निमरोजची राजधानी जरांजवर शुक्रवारी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबानने आणखी दोन प्रांतांच्या राजधानीवर कब्जा केल्याचा दावा केला.

सुरुवातीला ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या तालिबानने आता शहरांच्या दिशेने मोर्चा वळवला आहे.

ज्या वेगाने तालिबानने चार प्रांतांच्या राजधान्यांवर कब्जा केला आहे त्याने अफगाणिस्तान लष्कर चक्रावून गेलं आहे.

दरम्यान अमेरिकेच्या बॉम्बवर्षाव करणाऱ्या विमानांनी तालिबानच्या शबरघान या ठिकाणी हल्ला केला.

मिलिशया कमांडर अब्दुल रशीद दोस्तमचा हा बालेकिल्ला मानला जातो. दोस्तमचं लष्कर आणि सरकारी सैन्य केंद्रीय भाग सोडून विमानतळाच्या दिशेने गेलं आहे.

दोस्तमने मिलिशियाचं साम्राज्य उभं केलं होतं. 1990 मध्ये त्यांनी तालिबानच्या विरोधात संघर्ष केला होता.

विविध प्रांतांच्या राजधान्या तालिबानने ताब्यात घेतल्या असल्या तरी या शहरांवर पुन्हा नियंत्रण मिळवलं जाईल असं सरकारने म्हटलं आहे.

रविवारी सकाळी काही तासांच्या अंतराने उतरकडचं कुंदूज आणि सर-ए-पुल तालिबानच्या नियंत्रणाखाली आलं.

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्याही केली आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्यानं माघार घेतल्यानंतर याठिकाणची परिस्थिती दिवसें-दिवस चिघळत चालली आहे. तालिबान जास्तीत जास्त भागावर ताबा मिळवत आहे.

पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेल्या सरकारला शहराच्या संरक्षणासाठी लष्कर पाठवता आलं नाही. त्यामुळं इथं तालिबाननं ताबा मिळवल्याचं ते म्हणाले.

तालिबाननं हा प्रांत पूर्णपणे मुक्त केला असल्याचा दावा तालिबानच्या एका प्रवक्त्यांनी ट्विटरवर केला आहे, तसंच गव्हर्नर निवास, पोलिस मुख्यालय आणि इतर सरकारी इमारतींवर तालिबानचा ताबा असल्याचंही ते म्हणाले.

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

आतापर्यंत एकाही प्रांताच्या राजधानीवर ताबा मिळवण्यात तालिबानला यश आलं नव्हतं. पण गुरुवारी (5 ऑगस्ट) जरांजवर तालिबाननं अखेर ताबा मिळवला.

त्याचबरोबर पश्चिमेला असलेल्या हेरात आणि दक्षिणेत लष्कर गाहमध्येही मोठा संघर्ष सुरू आहे.

इराणच्या सीमेला लागून असलेलं जरांज हे मोठं व्यापारी केंद्र आहे. त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचे योद्धे शहराला ताब्यात घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते.

शहरावर पूर्णपणे ताबा मिळवला असल्याचं दोन अधिकृत सुत्रांनी बीबीसीला सांगितलं आहे, तर दुसऱ्या एका सुत्राच्या मते, अद्याप सिक्युरिटी ऑफिसच्या नॅशनल डायरेक्टर कार्यालयाजवळ संघर्ष अजूनही सुरू आहे.

सरकारनं पुरेशी मदत पोहोचवली नाही, त्यामुळं तालिबानच्या सैनिकांना शहर ताब्यात घेण्यात यश आल्याचं, निमरोज पोलिस विभागाच्या एका प्रवक्त्यांनी रॉयटर्स या वृत्त संस्थेला सांगितलं.

शुक्रवारी (6 ऑगस्ट) सायंकाळी अफगाणिस्ताच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी हवाई हल्ल्यात निमरोजमध्ये तालिबानचा प्रमुख कमांडर आणि त्यांचे चौदा सहकारी मारले गेल्याचा, दावा केला आहे.

जनरल सामी सादात यांनी केलेल्या या दाव्याला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. जनरल सामी अफगाणिस्तानच्या लष्कराच्या 215 मायवांड अफगाण आर्मीचे कोर कमांडर आहेत.

तालिबानचे पाऊल सत्तेच्या दिशेने

अमेरिकेच्या लष्करानं 20 वर्षांपूर्वी तालिबानला पायउतार केलं होतं. आता अमेरिकेनं माघार घेतल्यानंतर तालिबाननं पुन्हा अफगाणिस्तानात इस्लामी सरकार लागू करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत देशातील मोठ्या भागावर त्यांनी ताबा मिळवला आहे.

जरांज ही त्यांच्या ताब्यात येणारी पहिली प्रांतीय राजधानी आहे.

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

तालिबाननं अफगाणिस्तानला शेजारी देशांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या सीमा आणि चौक्यांवरही ताबा मिळवला आहे. पश्चिमेत हेरात आणि दक्षिणेत कंदहारसारखी मोठी शहरं ताब्यात घेण्यासाठीही त्यांनी वेग वाढवला आहे.

दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांतील अफगाणिस्तानसाठीचे विशेष दूत डेबोरा ल्योंस यांनी तालिबानच्या राजकीय तोडग्याबाबत दिलेल्या वचनाबाबत प्रश्न उपस्थित केला. तसंच युद्ध धोकादायक आणि विनाशकारी स्थितीत पोहोचल्याचं त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांतील सिरिया किंवा काही दशकांपूर्वीच्या सारायेव्होच्या आठवणी यामुळं ताज्या होत आहे, असंही ते म्हणाले.

तसंच संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे राजदूत वासिली नेबेनझिया यांनीही अफगाणिस्तान युद्धात घेरल्या जाण्याचा धोका, खरा वाटू लागल्याचं म्हटलं आहे.

तर तालिबानी जरांजरवर मिळवलेल्या विजयाचा जल्लोष साजरा करत असून त्यामुळे तालिबानच्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढला असल्याचं, तालिबानशी संबंधित सुत्रांनी म्हटलं आहे.

जरांज इराणच्या सीमेला लागून आहे आणि त्याला राजकीय महत्त्वदेखील आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची हत्या

काबूलमध्ये तालिबाननं सरकारच्या माध्यम आणि माहिती विभागाचे प्रमुख दवा खान मेनापाल यांची हत्या केली आहे. तालिबान लोकशाही पद्धतीनं निवडलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांच्या सरकारची शक्ती कमी करण्यासाठी राजकीय हत्यादेखील करत आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकेचे राजदूत रॉस विल्सन यांनी मेनापाल यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केलं आहे. मेनापाल अफगाणिस्तानच्या सर्व नागरिकांना खरी माहिती पुरवायचे असं, त्यांनी म्हटलं आहे.

'या हत्या अफगाणिस्तानात मानवाधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे,' असं ते ट्विटरवर म्हणाले.

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

तालिबानची अशी कृत्यं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देऊ शकणार नाहीत, असं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे. तालिबानला जागतिक स्तरावर राजकीय मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

''त्यांना हा मार्ग सोडावा लागेल. त्यांना लष्करी मोहिमेऐवजी शांतता प्रक्रियेसाठी प्रयत्न करावे लागतील,'' असं व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जेन साकी यांनीही वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

गेल्या काही दिवसांत तालिबाननं अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, अधिकारी, न्यायाधीश आणि नेत्यांची हत्या केली आहे. हे सगळे अफगाणिस्तानातील उदारमतवादी मुस्लीम सरकार वाचवण्यासाठी संघर्ष करत होते. तालिबानला त्यांच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज बंद करायचा आहे, असं म्हटलं जात आहे.

तालिबाननं जुमे की नमाज (शुक्रवारचं नमाज पठण) दरम्यान मेनापाल यांची हत्या केली, असं अफगाणिस्तान सरकारच्या गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

''मेनापाल हे शत्रूच्या प्रचाराच्या विरोधात एखाद्या डोंगरासारखे ठाम उभे असलेले तरुण होते. अफगाणिस्तान सरकारचे ते प्रमुख समर्थक होते,'' असं गृह मंत्रालयाते प्रवक्ते मीरवाइज स्तानिकझाई म्हणाले.

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, तालिबाननं सीमाभागामध्ये पकड अधिक घट्ट करण्यासाठी सरकारी सैनिक आणि सरकारच्या समर्थकांवर हल्ले वाढवले आहेत.

जोवझान प्रांतात अब्दुल रशीद दोस्तम मिलिशिया आणि सरकारी लष्कराचे किमान दहा जवान तालिबानच्या हल्ल्यात मारले गेले.

जोवझानचे डेप्युटी गव्हर्नर कादीर मालिया यांच्या मते, तालिबाननं या आठवड्यात प्रांताच्या राजधानीच्या बाह्य भागांवर हल्ले केले आहेत.

विजय किती मोठा?

तालिबाननं ट्विटरवर एक पोस्ट करत विजय मिळवल्याची घोषणा केली आहे.

"ही तर फक्त सुरुवात आहे. लवकरच आम्हाला किती प्रांत मिळतील ते पाहा,'' असं एका ग्रुप कमांडरनं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.

दरम्यान, अधिकाऱ्यांना कुटुंबीयांसह इराणला जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते, अशाही बातम्या येत आहेत.

तालिबान, अफगाणिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

सरकारनं मात्र अद्याप जरांजवरील ताबा गमावल्याचं जाहीर केलेलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सामान्य नागरिक सरकारी कार्यालयांमध्ये लुटालूट करत असल्याचं दिसत आहे.

जरांजवर ताबा मिळाल्यानं तालिबानच्या मोहिमेला अधिक गती मिळू शकते. अमेरिकेचं लष्कर परतण्याची बातमी आल्यापासूनच तालिबाननं मोहिमेचा वेग वाढवला होता.

तसंच शुक्रवारी तालिबानच्या सैनिकांनी काबूलमध्ये नमाजच्या दरम्यान सरकारच्या माध्यम प्रमुखांची हत्या केली आहे.

दवा खान मेनिपाल यांना "त्यांच्या कर्माचं फळ" मिळालं असं तालिबाननं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)