टोकियो ऑलिंपिक : जर्मन महिला टीमचे पूर्ण कपडे अन् नॉर्वेचा 'बिकिनी विरोध' याची चर्चा का?

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीच्या महिला जिम्नॅस्टिक्स संघातील सदस्य यावेळी फुल बॉडी सूट म्हणजे पूर्ण शरीर झाकणारे ड्रेस परिधान करून स्पर्धेत उतरल्या.

जिम्नॅस्टिकमधल्या महिलांच्या 'सेक्श्युअलायझेशन' (लैंगिकिकरण) च्या विरोधात आणि यावर बंदी आणावी यासाठी हे पाऊल उचलल्याचं या जिम्नॅस्टिकपटूंनी सांगितलं.

महिला जिम्नॅस्टना त्यांच्या आवडीनुसार आणि सुलभ ठरतील असे कपडे परिधान करण्यास प्रोत्साहन द्यायची इच्छा असल्याचं जर्मनच्या संघानं स्पष्ट केलंय.

याच उद्देशान टीममधील महिलांनी फुल बॉडी सूट परिधान केला. त्यांच्या टॉपमुळं पोट आणि हात झाकलेले होते. तर तर लेगिंगही टाचेपर्यंत होती.

जर्मन संघाच्या या कृतीचं कौतुक होतंय. ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धेत त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महिला खेळाडूंकडे लैंगिक दृष्टीकोनातून पाहण्याच्या मुद्द्यावर क्रीडा जगतात पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.

बिकिनी बॉटम न घातल्याबद्दल दंड

दुसरीकडं नॉर्वेच्या महिला बीच हँडबॉल संघावर दंड लावण्यात आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांनी स्पर्धेत बिकिनी बॉटम्स ऐवजी शॉर्ट्स घातल्या होत्या.

नॉर्वेच्या महिला संघानं युरोपियन बीच हँडबॉल चॅम्पियनशिप दरम्यान बिकिनी बॉटम परिधान करण्यास नकार दिला. त्यामुळं त्यांच्यावर 1,295 पाऊंड एवढा दंड लावण्यात आला.

या प्रकारानंतर नॉर्वेच्या संघाच्या समर्थनार्थ लोक समोर येत आहेत तसंच क्रीडा स्पर्धेत महिलांवर अंगप्रदर्शनासाठी दबाव आणण्याचा विरोध केला जात आहे.

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेत्या प्रसिद्ध गायिका पिंक यांनी देखली नॉर्वेच्या संघाला पाठिंबा दिलाय. इतकंच नाही तर या खेळाडूंना लावण्यात आलेला दंड भरण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

"मला नॉर्वेच्या महिला बीच हँडबॉल टीमचा प्रचंड अभिमान आहे. त्यांनी ड्रेसशी संबंधित लैंगिक आणि महिलाविरोधी नियमाचा विरोध केला. खरं तर युरोपियन हँडबॉल फेडरेशनवरच यासाठी दंड लावायला हवा. पण तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे. तुमचा दंड भरण्याची परवानगी मिळाल्यास मला आनंद होईल. हा विरोध सुरू ठेवा," असं ट्वीट पिंक यांनी केलं.

पिंक यांचा पाठिंबा मिळाल्यानं आणि त्यांच्या ट्वीटमुळं नॉर्वेच्या संघातील सदस्य आश्चर्यचकित आणि आनंदीही झाल्या आहेत.

युरोपियन हँडबॉल फेडरेशननं मात्र स्वतःचा बचाव केला. नॉर्वेच्या महिला टीमचा पोशाख 'अनुचित' होता, असं त्यांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावरदेखील नॉर्वेच्या संघावर दंडाचा लावण्यात आलेल्या दंडाचा प्रचंड विरोध होत आहे. तसंच टीमनंही क्रीडा स्पर्धांमध्ये अशा 'सेक्सिस्ट' नियमांना विरोध करणं सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. पुढच्या सामन्यातही बिकिनी बॉटमऐवजी शॉर्ट्स घालणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

काही वेळा महिला क्रीडापटुंना 'छोटे कपडे' परिधान केल्यामुळं टीकेला सामोरं जावं लागतं, तर काही वेळा त्यांच्यावर बिकिनी बॉटम आणि शॉर्ट स्कर्ट परिधान करण्यासाठी दबाव आणला जातो.

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झानं खेळायला सुरुवात केली तेव्हा शॉर्ट स्कर्ट परिधान केल्याच्या कारणावरून एका गटानं त्यांच्या विरोधात फतवादेखील काढला होता.

तर 2011 मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशननं खेळात 'ग्लॅमर' यावं यासाठी महिला बॅडमिंटन खेळाडूंना शॉर्ट्स ऐवजी स्कर्ट परिधान करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागं घेण्यात आला.

(बीबीसी प्रतिनिधी डॅनियल रोझ्ने आणि मनीष पांडेय यांनी दिलेल्या माहितीसह)

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)