You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया स्पुटनिक : लसीकरणाच्या खोट्या प्रमाणपत्रांसाठी लोक आग्रही कारण...
- Author, अलेक बॉल्ड्रिव्ह आणि सेनिया चुर्मानोव्हा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"मला कोरोनाची लस घ्यायची नाहीये. लस घेतल्यामुळे माझ्या आयुष्यात चांगलं काही होऊ शकतं, असं मला वाटत नाही," मॉस्को हॉस्पिटलमधील कार्डियोलॉजिस्ट व्हिक्टोरिया (बदललेलं नाव) सांगत होत्या.
रशियन लशीच्या प्रभावीपणावर त्यांचा विश्वास नाहीये. त्यामुळे मग लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पहिले 6 महिने त्यांनी लस घ्यायचं टाळलं.
पण, नुकतंच मॉस्कोच्या महापौरांनी जाहीर केलं की, "सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी लस घेणं गरजेचं आहे, यात डॉक्टरांचा समावेश होतो."
त्यानंतर मग व्हिक्टोरिया यांनी दोन दिवस विचार केला आणि लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळवण्याचं ठरवलं. खोटं प्रमाणपत्र!
मॉस्कोमध्ये डेल्टा व्हेरियन्ट वेगानं पसरत आहे आणि त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, याची कल्पना असून देखील व्हिक्टोरिया लशीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे चिंतेत आहेत.
व्हिक्टोरिया यांनी आयुष्यात कधीच लस घेतली नाही, असं अजिबात नाही. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी इतर आजारांसाठीची लस वेळोवेळी घेतली आहे.
पण, रशियाच्या या 3 लशींची नोंदणी घाईघाईत झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण, मग असं असेल तर विदेशात तयार झालेली लस घेणार का, तर याविषयीही काही निश्चित असं ठरवलं नसल्याचं त्या सांगतात.
व्हिक्टोरिया यांच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना लस घ्या म्हणून सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी आपले कॉन्टॅक्ट वापरत स्थानिक दवाखान्यांमध्ये संपर्क केला. तिथं 70 डॉलर (5200 रुपये) भरले आणि स्पुटनिकचा एक डोस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळवलं. पुढच्या 24 तासांत त्यांनी लस घेतल्याची माहिती देशाच्या लस नोंदणीच्या डिजिटल डेटाबेसमध्ये नोंदवली गेली.
तीन आठवड्यानंतर दुसरा डोस घेतल्याची नोटीसही तिथं आली. पण, प्रत्यक्षात पाहिलं तर व्हिक्टोरिया यांनी लशीचा एकही डोस घेतला नव्हता.
आपले अर्धे मित्र आणि सहकारीही लशीबद्दल संशयी आहेत, असं त्या सांगतात.
"ही माहीत नसलेल्या गोष्टीची भीती आहे," असं त्या सांगतात. आमचा सरकारबद्दलचा अविश्वासही यात भूमिका निभावत असल्याची खात्री असल्याचंही त्या सांगतात.
तर स्पुटनिक या लशीच्या तीन क्लिनिकल ट्रायल झाल्या असून ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं प्रशासन सांगत आलं आहे.
लशीची परिणामकारता 91 टक्के असल्याचा दावा सरकारनं केला आहे.
पण, अनेक रशियन नागरिक असे आहेत ज्यांचा सरकारच्या या दाव्यावर विश्वास नाहीये आणि ते खोटी प्रमाणपत्र विकत घेत आहेत.
समजा त्यांच्याकडे व्हिक्टोरियाप्रमाणे स्थानिक दवाखान्यात कॉन्टॅक्ट नसेल, तर ते यावर ऑनलाईन पद्धतीनं मार्ग काढत आहेत.
गेल्या काही आठवड्यात देशात 'लसीकरणाचं प्रमाणपत्र विकत घ्या,' हे सर्च करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.
किरील एका रेस्टॉरंटमध्ये काम करतात. आपला मालक लस घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणेल, अशी चिंता त्यांना सतावत होती. कारण त्यांना लस घ्यायची इच्छा नाहीये.
"मी आणि माझी बायको मिळून आम्ही लवकरच कुटुंबाला सुरुवात करणार आहोत. लस घेतल्यास कोणते दुष्परिणाम आम्हाला जाणवतील, हे कुणाला माहिती?" असं ते सांगतात.
सर्जे (बदललेलं नाव) हे रियल इस्टेट एजंट आहेत. "मी काही लसीकरणाच्या विरोधात नाही. पण, मला रशियाची लस घ्यायची नाहीये. रशियात पाश्चिमात्य लशींना बंदी आहे. पण, जेव्हा शक्य असेल, तेव्हा मीसुद्धा प्रमाणपत्र विकत घेणार आहे," असं ते सांगतात.
सर्जे आणि किरील हे दोघेही त्या टेलिग्रॅम ग्रूपवर आहेत, जिथं अशाप्रकारचे प्रमाणपत्र विकले जातात.
सर्जे यांचा स्वत:चा व्यवसाय आहे आणि लस घेण्यासाठी त्यांच्यावर कुणाचाही दबाव नाहीये. पण, लगेच प्रमाणपत्र मिळालं नाही, तर मात्र प्रवास करता येणार नाही, याची त्यांना चिंता आहे.
करिना (बदललेलं नाव) लवकरच स्थलांतर करण्याच्या विचारात आहेत. त्यांना स्पुटनिक लशीवर विश्वास नाहीये.
"रशियाच्या लशीबद्दल म्हणाल तर मी लसीकरणाच्या विरोधात आहे. डॉक्टरांच्या मदतीशिवाय मी स्वत:ची काळजी घेऊ शकते. तसंही मी इथून जायचा विचार करत होते आणि या परिस्थितीनं तर माझ्या निघण्याला अजूनच वेग आला आहे. माझ्यासाठी मानवाधिकार ही सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट आहे. मी स्वत: काही गोष्टी मान्य करू शकते किंवा माझा आग्रहही सोडू शकते, पण जबरदस्तीचं लसीकरण म्हणजे खूप जास्त केल्यासारखं आहे. माझ्यासाठी हे स्वीकारार्ह नाही," असं करिना सांगतात.
सिव्हिल इंजिनियर ओलेग (बदलेललं नाव) आणि त्यांची शिक्षिका अलेना (बदलेललं नाव) दोघेही लसीकरणासाठी अनिवार्य असलेल्या प्रकारात मोडतात, पण हे मानवाधिकाराचं उल्लंघन असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
ओलेग यांना स्पुटनिक लशीच्या सुरक्षेवर विश्वास नाहीये आणि शास्त्रज्ञांना जसा आदेश दिला जाईल, तसं ते सांगत असतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
तर अलेना म्हणतात की, मी काही 'प्रयोगशाळेतील उंदीर' नाहीये. अलेना यांना गेल्या वर्षी कोरोना झाला होता, पण आता सगळ्या अँटिबॉडी गमावल्याची त्यांना चिंता सतावत आहे. लसीऐवजी खोटं प्रमाणपत्र घेण्यासाठी त्या सज्ज आहेत.
या प्रमाणपत्रांवरील किंमती 39 डॉलरपासून ते 209 डॉलरपर्यंत (2,897 रुपयांपासून ते 15,526 रुपयांपर्यंत) आहेत. ग्राहकाचं नाव देशाच्या नोंदणीत समाविष्ट करणं ही सगळ्यांत महागडी सेवा आहे. तर लसीकरण झाल्याबद्दलचं कागदी प्रमाणपत्र मिळवणं हे स्वस्तातलं काम आहे.
मॉस्कोतल्या अधिकाऱ्यांनी नुकतंच जाहीर केलं आहे की, अधिकृतपणे क्यूआर कोडच लसीकरण झाल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जातील.
पण, जे कागदी प्रमाणपत्र विक्रेते आहेत त्यांचा दावा आहे की, अतिरिक्त शुल्क भरल्यानंतरच त्यांना लसीकरणासाठीच्या नोंदणीच्या राष्ट्रीय ऑनलाईन यंत्रणेत प्रवेश मिळतो.
रोमन हे एक प्रमाणपत्र विक्रेते आहेत. त्यांनी सांगितलं की, "तो फक्त कागदी प्रमाणपत्र विकतो आणि डिजिटल डेटाबेसमध्ये त्याला प्रवेश नाही."
तुम्हाला लस मिळत असेल तर नक्कीच घ्या, असं ते म्हणतात.
"कधीकधी लोक मला लसीकरणाबदद्ल सल्ला विचारतात, तेव्हा मी त्यांना लस घ्यायला सांगतो. सोव्हियत राजवटीत आम्हाला सगळ्यांना लस दिली गेली असती आणि आम्ही सगळे बरे झालो असतो. पण, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपण हळूहळू पण मोठ्या प्रमाणात मरत आहोत."
रोमन यांनी लशीचा एक डोस घेतला आहे.
मार्च महिन्यात रशियात कोरोना लसीकरणाची खोटी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा काळाबाजार सुरू झाला.
त्यावेळी लोक विदेशात जाऊन सुट्टी साजरी करण्याचा विचार करत होते, पण इतर देशांनी मात्र व्हॅक्सिन पासपोर्ट असलेल्या पर्यटकांनाच प्रवेश द्यायचं जाहीर केलं होतं.
प्रमाणपत्रं देणाऱ्या बहुतेक जाहिराती निश्चितपणे त्या फसव्या लोकांनी तयार केल्या आहेत, ज्यांना राज्य नोंदणी प्रणालीमध्ये प्रवेश नाही, असं कास्पर्स्की लॅब सायबर सेक्युरिटीचे दिमित्री गॅलोव्ह सांगतात.
"हे शक्य आहे की काही लोक या सेवा विकत आहेत आणि काही लोक राज्याच्या डेटाबेसमध्ये नावे समाविष्ट करण्यास सक्षम आहेत. पण, हे तपासणे फार कठीण आहे. हे ऑनलाइन मार्केट नाही, जिथं आपण प्रत्येक विक्रेत्याचं नाव तपासून पाहू शकतो."
असेही काही लोक आहेत, ज्यांना खोटी प्रमाणपत्रं मिळवल्याचा पश्चात्ताप होतो आहे.
दिमित्री हे अरखानगिस्क प्रांतातील डॉक्टर आहेत. गावातल्या लोकांना लस मिळावी म्हणून त्यांनी स्पुटनिच्या काही लशींची ऑर्डर दिली. त्याचवेळी त्यांनी स्वत:चं नाव लस घेतलेल्या लोकांच्या यादीत समाविष्ट केलं. पण, त्यांच्या वाट्याचा लशीचा डोस त्यांनी बाहेर फेकून दिला.
त्यानंतर लगेच त्यांच्या आईचं कोरोनानं निधन झालं. "आईला लस का दिली नाही," असं अनेकांनी त्यांना विचारलं.
आपण आईला लस घेण्यासाठी आग्रह केला नाही म्हणून आता त्यांना दु:ख वाटतं, असं त्यांचे मित्र सांगतात.
"आता तर त्यांना स्वत:ला लस घ्यायची आहे, खरीखुरी लस. पण, ते आता लस घेऊ शकत नाहीत, कारण राज्याच्या लस घेतलेल्या लोकांच्या डेटाबेसमध्ये त्यांचं नाव आधीच समाविष्ट आहे," असंही त्यांचे मित्र सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)