कोरोना लस: WHO चा इशारा, 'गरीब देशांमधला लशींचा साठा संपत चाललाय'

फोटो स्रोत, Getty Images
जगातल्या अनेक गरीब देशांना कोव्हॅक्स या जागतिक लस वाटपाच्या कार्यक्रमांअंतर्गत लशी मिळत आहेत. पण आता ही योजना चालू ठेवण्यासाठी लशींचे पुरेसे डोस शिल्लक नाहीत असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
WHO चे वरिष्ठ सल्लागार डॉ ब्रुस आयलवॉर्ड यांनी म्हटलं की, "कोव्हॅक्स अंतर्गत 131 देशांमध्ये 9 कोटी डोस वाटले गेले. पण हे डोस या देशांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात नगण्य आहेत, विशेषतः हा विषाणू जगभर वेगात पसरत असताना लोकांचं संरक्षण करू शकत नाहीत."
दक्षिण आफ्रिकेसारख्या देशात कोरोनाची तिसरी लाट आली असताना आता लशींचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सोमवारी, 21 जूनला, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी "श्रीमंत देशांनी गरजेपेक्षा जास्त लशी साठवणं बंद करावं," असं म्हटलं. दक्षिण आफ्रिकेतली तिसरी लाट रोखायला सध्या त्यांचं सरकार झगडत आहे.
"आफ्रिका खंडाची गोष्ट करायची झाली तर आत्तापर्यंत फक्त 4 कोटी डोसेस या खंडातल्या देशांमध्ये दिले गेलेत आणि याचं प्रमाण आफ्रिका खंडाच्या एकूण लोकसंख्येच्या 2 टक्क्यांहून कमी आहे," असं रामाफोसा म्हणाले.
यावर उपाय काढण्यासाठी त्यांचं सरकार दक्षिण आफ्रिकेत कोव्हॅक्स प्रादेशिक केंद्र उभं करण्याच्या प्रयत्नात आहे ज्यायोगे दक्षिण आफ्रिकेला जास्तीत जास्त लशी मिळतील.
कोव्हॅक्सची स्थापना मागच्या वर्षी झाली होती. याचा उद्देश गरीब देशांना लशी सवलतीच्या दरात लशी मिळाव्यात आणि या सवलतींचा खर्च श्रीमंत देशांनी उचलावा असा होता.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हॅक्सचं नेतृत्व WHO आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलं होतं. या योजनेअंतर्गत गरीब देशांना लशींचे कमीत कमी 2 अब्ज डोस पुरवावेत असं प्राथमिक उदिष्ट होतं. यामुळे गरीब देशांमधल्या कमीत कमी 20 टक्के लोकसंख्येला संरक्षण मिळू शकेल अशी अपेक्षा होती.
पण उत्पादनात उशीर, पुरवठा साखळीत अडथळे यामुळे अनेक देशांना वेळेत लशी मिळाल्या नाहीत जे लशींसाठी पूर्णपणे कोव्हॅक्सवर अवलंबून होते.
युगांडा, झिंबाब्वे, बांगलादेश, त्रिनिदाद आणि टोबॅगो हे काही देश आहेत ज्यांच्याकडच्या लशी आता संपून गेल्यात.
जिनिव्हा, स्वित्झरलँडमध्ये WHO च्या एका बैठकी बोलताना डॉ आयलवॉर्ड यांनी मान्य केलं की लशींची कमतरता हा गंभीर प्रश्न आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हॅक्सचा भाग असणाऱ्या 80 कमी उत्पन्न देशांपैकी "निम्म्या देशांकडे त्यांचे लसीकरण कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी आता लशी शिल्लक नाहीयेत," असं डॉ आयलवॉर्ड म्हणाले.
"या देशांमध्ये रोज काय घडतंय ते पाहिलं तर कळेल की निम्याहून जास्त देशांकडचा लशींचा साठा संपलाय आणि ते अधिक लशींची मागणी करत आहेत. पण प्रत्यक्षात परिस्थिती जास्त गंभीर आहे."
डॉ आयलवॉर्ड म्हणाले की "ज्या देशांनी आपल्याकडची लशींची कमतरता दूर करण्यासाठी इतर मार्गांनी लशी मिळवण्याचा केला त्यांना वाईट परिणाम सहन करावे लागले. जसं की बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करावी लागणं."
लशींचा पुरवठा कमी झाल्यामुळे काही श्रीमंत देशांनी कोव्हॅक्स आणि इतर मार्गांनी लशी दान करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
21 जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने घोषणा केली ते गरजू देशांना साडेपाच कोटी लशी देणार आहेत.
यापैकी 4.1 कोटी लशी कोव्हॅक्सला दिल्या जातील तर उरलेल्या 1.4 कोटी लशी ज्या देशांना अधिक गरज आहे अशांना दिल्या जातील.

फोटो स्रोत, Getty Images
याव्यतिरिक्त 50 कोटी डोस अमेरिका कोव्हॅक्सला देईल असं राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी म्हटलं होतं. बायडन यांनी ही घोषणा या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या G7 परिषदेत केली होती.
G7 परिषदेचा भाग असणाऱ्या श्रीमंत राष्ट्रांनी एकत्रितरित्या 1 अब्ज डोस गरीब राष्ट्रांना देऊ असं म्हटलंय.
पण टीकाकारांचं म्हणणं आहे की या नुसत्या गप्पाच आहेत. पाश्चिमात्य देशांचे नेते जगातली कोरोना व्हायरसची साथ संपवण्यासाठी गंभीर नाहीयेत.
कादी तज्ज्ञांना वाटतं की जागतिक साथ संपवण्यासाठी जितक्या लोकांचं लसीकरण करावं लागले ते होण्यासाठी कित्येक महिन्यांनाच कालावधी लागू शकतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























