ओव्हरटाईम काम केल्यामुळे लवकर मृत्यूचा धोका?

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

जगात अगदी मोजक्याच कंपन्या असतील ज्या कामाचे तास, कामाच्या ठिकाणचं वातावरण, कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रजा, या सगळ्यांची काळजी घेतात. लाँग वर्किंग आवर्स किंवा ओव्हर टाईम, हे तर भारतातलं अगदी सर्रास दिसणारं चित्रं आहे.

मात्र, या लाँग वर्किंग आवर्सचे अत्यंत जीवघेणे परिणाम होऊ शकतात, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

उशिरापर्यंत ऑफिसचं काम केल्यामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका संशोधनात आढळून आलं आहे.

यासंदर्भात पहिल्यांदाच जागतिक पातळीवर संशोधन करण्यात आलं आहे. 2016 साली उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून ऑफिसचं काम केल्यामुळे स्ट्रोक आणि हृदयासंबंधी आजारांमुळे 7 लाख 45 हजार जणांचा मृत्यू झाल्याचं, या संशोधनात आढळलं.

या अहवालानुसार दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम पॅसिफिक क्षेत्रात याचं प्रमाण सर्वाधिक आहे.

कोरोना संकटामुळे ही परिस्थिती आणखी चिघळू शकते, असंही जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

दर आठवड्याला 35 ते 40 तासांच्या तुलनेत आठवड्याला 55 तासांहून जास्त वेळ काम केल्याने स्ट्रोकचा धोका 35 टक्क्यांनी तर हृदयासंबंधी विकारांनी मृत्यू होण्याचा धोका 15 टक्क्यांनी वाढतो, असं हा अहवाल सांगतो.

जागतिक कामगार संस्थेच्या (ILO) सहकार्याने हे संशोधन करण्यात आलं. या संशोधनात मृत्यू झालेल्यांमध्ये एक तृतिआंश वृद्ध किंवा मध्यम वयोगटातले असल्याचं दिसून आलं. शिवाय, अनेकांचा मृत्यू त्या काळापासून अनेक वर्षांनी किंवा दशकांनी झाला ज्यावेळी ते उशिरापर्यंत ऑफिसचं काम करायचे.

कोरोनामुळे परिस्थिती चिघळण्याची भीती

जगावर कोरोना संकट कोसळल्यानंतरच्या काळातली माहिती या संशोधनात संकलित करण्यात आलेली नाही. मात्र, घरून काम करण्याची सोय आणि आर्थिक मंदी यामुळे अनेकजण जास्त वेळ काम करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे टेक्निकल ऑफिसर फ्रँक पेगा यांच्या मते, "काही पुराव्यांवरून असं दिसतं की देशव्यापी लॉकडाऊन लागू झाल्यास त्याठिकाणी कामाच्या तासात 10 टक्क्यांची वाढ होते."

या अहवालानुसार कामामुळे येणाऱ्या ताणामध्ये एक तृतिआंश वाटा हा उशिरापर्यंत काम करण्याचा असतो. यावरुनच जास्त तास काम करणं, हे कामामुळे येणाऱ्या ताणाचं सर्वात मोठं कारण असल्याचं स्पष्ट होतं.

संशोधकांच्या मते उशिरापर्यंत काम केल्यामुळे दोन प्रमुख समस्या भेडसावतात - पहिली समस्या म्हणजे जास्त तास काम केल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि दुसरं म्हणजे उशिरापर्यंत काम करत बसल्याने तंबाखू खाणे, धूम्रपान, मद्यपान अशी व्यसनं लागणे, पुरेशी झोप न होणे, व्यायाम न करणे आणि पौष्टिक आहार न घेण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

"मी कायम मानसिक तणावात असायचो"

इंग्लंडच्या लीड्समध्ये काम करणारे 32 वर्षांचे इंजीनिअर अँड्र्यू फॉल्स आपल्या अनुभवाविषयी सांगताना जुन्या ऑफिसमध्ये खूप उशिरापर्यंत काम करावं लागे आणि याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचं सांगतात.

ते म्हणाले, "तिथे 50 ते 55 तास काम करणं सामान्य बाब होती. मी अनेक आठवडे घरापासून लांब रहायचो. तणाव, नैराश्य, अँक्झाईटी, वाईट शेरा हे सगळंसुद्धा सामान्य होतं. मी कायम मानसिक तणावात असायचो."

पाच वर्षं काम केल्यानंतर अँड्र्यू फॉल्स यांनी ती नोकरी सोडली.

"यापुढे मी दिवस-दिवसभर झूम मिटिंगवर घालवत नाही"

पाच आठवड्यांआधी 45 वर्षांचे जोनाथन फ्रॉस्टिक यांनी लिंकडेनवर एक पोस्ट टाकली होती. ही पोस्ट बरीच शेअर झाली होती. उशिरापर्यंत काम केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांविषयीची ती पोस्ट होती.

HSBC मध्ये रेग्युलेटरी प्रोग्राम मॅनेजर असणारे जोनाथन एका रविवारी पुढील आठवड्याच्या कामाचं नियोजन करण्यासाठी बसले आणि अचानक त्यांच्या हृदयाची धडधड वाढली, घसा, जबडा आणि हातात वेदना जाणवू लागल्या. श्वास घ्यायलाही त्रास होता.

ते म्हणतात, "मी बिछान्यावर आराम करण्यासाठी बेडरुममध्ये जात होतो तेवढ्यात माझ्या बायकोने मला बघितलं आणि तिने ताबडतोब 999 ला (आरोग्यसेवा) कॉल केला."

जोनाथन फ्रॉस्टिक यांना हार्ट अटॅक आला होता. या अनुभवानंतर जोनाथन यांनी आपला कामाबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, "आता मी दिवस-दिवसभर झूम मीटिंगवर घालवत नाही."

जोनाथन यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी जास्त वेळ काम केल्याने त्यांच्या आरोग्यावर झालेल्या परिणामांचे अनुभव सांगितले.

जोनाथन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कंपनीला दोष दिलेला नाही. मात्र, त्यांच्या पोस्टवर आलेल्या एका प्रतिक्रियेत यूजरने "कंपन्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार न करता त्यांच्याकडून अमाप काम करून घेतात."

मात्र, HSBC ने जोनाथन यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत कर्मचाऱ्यांना खाजगी आयुष्य आणि काम यांच्यात उचित समतोल साधता यावा, याबाबत कंपनीही दक्ष असल्याचं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना संकट ओढावण्याआधी जास्त वेळ काम करण्यांची संख्या वाढत होती आणि हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या 9% होतं.

तर यूकेमध्ये ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स या संस्थेनेही एक संशोधन केलं आहे. या संशोधनानुसार कोरोना संकटामुळे घरून काम करणारे आठवड्याला सरासरी 6 तास ओव्हरटाईम करत आहेत तर ऑफिसमधून काम करणारे सरासरी जवळपास साडेतीन तास ओव्हरटाईम करत आहेत.

कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि कामामुळे त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी विचार करायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

कामाची वेळ ठरवून द्यायला हवी. यामुळे कामाचा दर्जाही सुधारतो, असंही संघटनेचं म्हणणं आहे.

पेगा यांच्या मते, "आर्थिक मंदीच्या या काळात कामाचे तास न वाढवणे अधिक फायदेशीर ठरेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)