You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळात सेक्सचं आकर्षण का कमी झालं आहे?
- Author, जेसिका क्लेन
- Role, बीबीसी वर्क लाईफ
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोव्हिडची साथ येण्याआधी अनेक जोडपी "प्रत्येक रात्री जवळून जाणाऱ्या दोन समुद्री जहाजांसारखे होते", असं अमेरिकेतील टेक्सासमधील सेक्स थेरपिस्ट एमिली जेमिया सांगतात.
घराबाहेर आपापल्या कामांमध्ये व्यग्र असणाऱ्या अनेक जोडप्यांसाठी लॉकडाउन विसाव्याची एक संधीच घेऊन आला.
घरीच असल्यामुळे जोडप्यांना एकमेकांसोबत घालवायला निवांत वेळ मिळाला.
जेमिया यांच्या म्हणण्यानुसार, "सुरुवातीला या साथीने जोडप्यांना एकमेकांच्या जवळ येण्याची संधी दिली. सुट्ट्यांमध्ये एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवायचे, अगदी तसंच."
मात्र, ही साथ अधिकाधिक पसरत गेली तसतसे याचे दुष्परिणामही समोर येऊ लागले. विशेषतः शरीर संबंधांवर. जेमिया यांच्या मते, "अनेक जोडप्यांमध्ये शरीरसुखाची इच्छा कमी झाली आहे."
जगभरात अशीच परिस्थिती आहे का?
जगभरात करण्यात आलेल्या वेगवेगळ्या अभ्यासांवरून हेच चित्र दिसतंय.
तुर्की, इटली, भारत आणि अमेरिकेत यादृष्टीने संशोधन करण्यात आलं. आपला जोडीदार किंवा इतर कुणाबरोबर एकदा होणारे शरीरसंबंध कमी झाल्याचं संशोधकांना आढळलं आणि याचा थेट संबंध लॉकडाउनशी होता.
अमेरिकेतील किन्से इन्स्टिट्युटमध्ये हे संशोधन करण्यात आलं. तिथले रिसर्च फेलो जस्टिन लेहमिलर यांच्या मते, "मला वाटतं याचं एक मोठं कारण म्हणजे लोक चिंतेत होते."
या जागतिक साथीमुळे अनेकांच्या मनात भीती आणि अनिश्चिततेचं सावट होतं. अनेकांना स्वतःच्या प्रकृतीविषयी चिंता (अँक्झाईटी) असल्याचं आढळलं. पैशांबाबतही अनिश्चितता होती. शिवाय, आयुष्यात इतरही अनेक बदल ते अनुभवत होते.
या सर्व कारणांमुळे त्रासलेले असताना जोडीदारासोबत जास्त वेळ घालवणं आणि ते ही बंद खोलीत, याचा त्यांच्या नात्यावर वाईट परिणाम झाला आणि शरीर संभोगाचं प्रमाण घटलं.
एका अर्थाने कोव्हिडची साथ सेक्ससाठी अत्यंत वाईट ठरली. मात्र, आपण जुन्या नात्यांकडे परत जाऊ शकू की हा परिणाम दीर्घकाळ राहणार आहे?
संभोगाची इच्छा नसणे
जेमिया यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला अनेक जोडपी लॉकडाउनमध्ये सेक्स लाईफ इन्जॉय करत होते.
टेक्सास विद्यापीठात सह प्राध्यापक आणि सोशल सायकोलॉजिस्ट असणारे रोएंडा बल्जारियन यांच्या मते तो काळ जोडप्यांसाठी 'हनिमून पिरेड'सारखा होता. लोक तणावाचा उत्तम प्रकारे सामना करू शकत होते.
ते म्हणतात, "त्या काळात लोकांनी एकत्र येऊन काम केलं. कदाचित यात शेजाऱ्यांना टॉयलेट पेपर सारखी छोटी-छोटी मदत करणंही असू शकेल."
"मात्र, काळ जसजसा पुढे सरकत गेला साधनसामुग्री कमी होत गेली. तणाव वाढला. ताकद कमी होऊ लागली. निराशा वाढू लागली. या सर्वांमुळे दोघांमधलं नातंही बदलू लागलं."
बल्जारियन आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने 18 वर्षांपेक्षा मोठ्या लोकांमध्ये हा अभ्यास केला. यात 57 देशांमधल्या लोकांनी भाग घेतला. या अभ्यासात त्यांना वरील निरीक्षण आढळलं.
बल्जारिनी सांगतात की साथीच्या सुरुवातीला आर्थिक आघाडीवर असणाऱ्या चिंतेमुळे लैंगिक इच्छा वाढल्या.
मात्र, हळू-हळू लोक साथीमुळे येणारा ताण किंवा एकटेपणा किंवा सामान्य ताण अनुभवू लागले. यामुळे त्यांची शरीरसुखाची इच्छा कमी झाली.
खूप जास्त एकत्र राहणं
बल्जारियन सांगतात की अनेक जोडप्यांनी त्यांना दिवसा एकत्र आंघोळीला किंवा पोहायला जायचो असं सांगितलं. मात्र, हळूहळू तेही संपलं.
जोडप्यांमध्ये एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या. ते एकमेकांच्या छोट्या-छोट्या चुका काढू लागले.
लेहमिलर याला "जास्त काळ एकत्र राहिल्याचा परिणाम" म्हणतात. जास्त काळ एकत्र राहिल्यास आपल्याला जोडीदाराच्या छोट्या-छोट्या गोष्टींचा त्रास होऊ लागतो, असं लेहमिलर सांगतात.
बल्जारियन सांगतात की एकाने त्याला सांगितलं होतं की लॉकडाउनच्या आधी आपला जोडीदार जेवताना एवढा आवाज करतो, हे देखील माहिती नव्हतं.
खूप जास्त वेळ एकत्र राहिल्यानेही संभोगाची इच्छा कमी होते.
लेहमिलर सांगतात, "दीर्घकाळ एकत्र राहण्यामागे एक मोठं कारण असतं की तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात आणि तुम्हाला त्या जाणून घ्यायच्या असतात."
"मात्र, जेव्हा तुम्ही दिवसभर एकमेकांना बघत असता त्यावेळी एकमेकांना जाणून घेण्याची इच्छा कमी होते."
दुसरं असं की इतके दिवस साथीच्या आजारात राहिल्यामुळे लोकांमध्ये अनेक बदल होतात. याचा परिणाम सेक्सविषयीचा कॉन्फिडंस आणि परफॉर्मन्स यावरही होतो.
विशेषतः महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण त्यांना त्यांच्या ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त घरातली कामं, मुलांचा सांभाळ आणि त्यांचे ऑनलाईन क्लास ही जबाबदारीही पार पाडावी लागली.
जेमिया सांगतात, "स्त्रियांसाठी हा खूप कठीण काळ होता. करियर स्वतःच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग असतो आणि हे सगळं एका बेडरुममध्ये अडकून बसलं. हे इतकं अचानक घडलं की आपण कोण आहोत, हेच कळत नव्हतं."
सगळं पूर्वीप्रमाणे होईल का?
अशी परिस्थिती असली तरीही सेक्स संपलेला नाही.
किन्से इन्स्टिट्युटमधील संशोधकांच्या मते या काळात अनेकांनी बेडमध्ये काही नवीन करून बघण्याचा प्रयत्न केला.
लेहमिलर सांगतात, "लोकांनी नव्या गोष्टींची मदत घेत प्रयत्न केले आणि त्यामुळे सुधारणा झाली."
या प्रयत्नांमध्ये "नवनव्या पोझिशन्स, फॅन्टसी" या सगळ्यांचाही समावेश आहे.
मात्र, ज्यांचे लैंगिक संबंध बिघडलेत आणि अजूनही त्यात सुधारणा झालेली नाही त्यांचं भविष्य काय?
लेहमिलर यांच्या मते काही लोक यातून बाहेर पडतील. मात्र, काहींच्या बाबतीत असं घडणार नाही. "कारण दोघांमध्ये अनेक दिवसांपासून कनेक्शन तुटलंय."
या काळात अनेकांनी आपल्या जोडीदाराचा विश्वासघात केल्याचंही त्यांच्या संशोधनात आढळून आलं आहे आणि अशा प्रकारचा विश्वासघात नातं पुन्हा सुधारण्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. याशिवाय अनेकांना या जागतिक साथीमध्ये रोजगार आणि आर्थिक कारणांचाही त्रास होऊ शकतो आणि त्याचाही परिणाम नात्यावर पडतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)