वाटेतला दगड शेतकऱ्याने बाजूला ठेवला आणि दोन देशांची सीमारेषाच बदलली

फोटो स्रोत, DAVID LAVAUX
बेल्जियमच्या एका शेतकऱ्याने अनवधानाने आपल्या देशाच्या सीमेलगत असलेली फ्रान्सची सीमारेषाच बदलली.
एका स्थानिक इतिहासकाराला जंगलात फिरत असताना लक्षात आले की, दोन्ही देशाच्या सीमेला चिन्हांकित करणारा दगड 2.29 मीटर (7.5 फूट) सरकला आहे.
बेल्जियमच्या एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरच्या मार्गावर हा दगड कायम येत होता. त्यामुळे तो खूप हैराण होता आणि त्याने हा दगड फ्रान्सच्या भागात सरकवला असं मानलं जात आहे.
पण गंमत म्हणजे या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही गदारोळ झाला नाही तर याउलट सीमेच्या दोन्ही बाजूला हसू उमटलं.
बेल्जियममधील एरक्वेलाईन्स गावाचे महापौर डेविड लावॉक्स यांनी फ्रेंच टिव्ही चॅनेल टीएफ 1 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "या शेतकऱ्याने बेल्जियमला मोठं आणि फ्रान्सला लहान केलं. ही चांगली कल्पना नाही."
अशा प्रकारच्या घटनांमुळे जमीन मालकांमध्येही वाद निर्माण होतात, हा तर दोन शेजारील देशांच्या सीमेचा प्रश्न आहे.
सीमांकन
फ्रान्स आणि बेल्जियम दरम्यान 620 किमीची सीमा आहे. वॉटरलू येथे नेपोलियनच्या पराभवानंतर पाच वर्षांनी 1820 मध्ये कोरेट्रिकच्या करारानंतर ही सीमारेषा निश्चित करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images
शेतकऱ्याने आपल्या मार्गावरून हटवलेला दगड 1819 मध्ये सीमा निश्चित करण्यासाठी ठेवण्यात आला होता.
बेल्जियमच्या महापौरांनी हसत सांगितलं, "माझं शहर मोठं झाल्यामुळे मला आनंद झाला, पण फ्रेंच भागातील महापौरांना ते मान्य नव्हतं."
शेजारच्या फ्रेंच गावातील महापौर वेलोंक हसत हसत म्हणाले, "आम्ही आणखी एक नवीन सीमायुद्ध टाळण्यात यशस्वी होऊ."
बेल्जियमचे स्थानिक अधिकारी आता त्या शेतकऱ्याला तो दगड पुन्हा जुन्या ठिकाणी ठेवण्यास सांगणार आहेत.
असे घडले नाही तर हे प्रकरण बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे जाईल आणि 1930 पासून निष्क्रिय असलेल्या फ्रँको-बेल्जियम सीमा आयोगापर्यंत जाऊ शकते.
शेतकऱ्याने अधिकाऱ्यांचे ऐकले नाही तर त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो असंही बेल्जियमचे महापौर लावॉक्स यांनी स्पष्ट केलं.
ते म्हणाले, "जर त्यांनी चांगला प्रतिसाद दिला तर कोणतीही अडचण येणार नाही आणि हे प्रकरण आम्ही सामंजस्याने सोडवू."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























