इराण : परराष्ट्र मंत्र्यांच्या संभाषणाची ऑडिओ टेप उघड झाल्याने खळबळ

इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ
    • Author, कासरा नाजी
    • Role, बीबीसी फारसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांच्या संभाषणाची एक ऑडिओ टेप लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या आणि जगभरातल्या इतर देशांबाबतच्या अनेक मुद्द्यांवर ते या संभाषणात बोलताना ऐकू येतात. येत्या काळात या टेपचे राजकीय आणि धोरणात्मक परिणाम होण्याचा अंदाज आहे.

देशाच्या परराष्ट्र धोरणांवर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डसचा दबदबा असून इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सनीच रशियाच्या इशाऱ्यांवरून इराणला सीरियातल्या अंतर्गत युद्धात सहभागी व्हायला लावल्याचं ते बोलताना या ऑडिओ टेपमध्ये ऐकू येतं.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होतेय. सोशल मीडियावरून अनेकांनी या वक्तव्याबद्दल आश्चर्य आणि खेद व्यक्त केलाय.

जवाद जरीफ हे एक उदारमतवादी, तोलून-मापून बोलणारे अनुभवी राजकारणी असल्याचं मानलं जातं आणि त्यांनी असं विधान केल्याबद्दलही लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी लीक झाली टेप

या संभाषणाची टेप नेमकी कोणी लीक केली, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण इराणमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बरोबर आधी हे संभाषण लीक झालेलं आहे. परिणामी इराणमधल्या सत्ता संघर्षाला एक नवं वळण मिळू शकतं.

आपण राष्ट्राध्यक्ष हसन रुहानींची जागा घेण्याच्या शर्यतीत नसल्याचं जरीफ यांनी म्हटलंय. पण इराणमधल्या कट्टर विचारसरणीच्या गटाचा त्यांच्यावर विश्वास नाही.

इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ

फोटो स्रोत, AHMAD AL-RUBAYE/GETTY

पण कट्टर विचारसरणी असणारा गट आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांच्यासोबतच देशातल्या प्रमुख राजकारण्यांसमोरच्या अडचणी या टेपमुळे वाढणार हे स्पष्ट आहे.

इराणमधल्या सगळ्या सरकारी बाबींवर अजूनही अयातुल्लाह अली खोमेनींचं मत निर्णायक असतं आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स या इराणमधल्या सगळ्यात शक्तिशाली सुरक्षा दलावर त्यांचंच नियंत्रण आहे.

घोटाळा?

हे टेप लीक प्रकरण म्हणजे एक घोटाळा असल्याचं इराणमधल्या एका वर्तमानपत्राने म्हटलंय.

बीबीसी आणि इतर परदेशी माध्यमांपर्यंत तीन तासांची एक टेप आलेली आहे. दोन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या सात तासांच्या एका व्हीडिओतला हा एक भाग असावा, असं या टेपवरून वाटतंय.

राष्ट्राध्यक्ष रुहानींचे पदावर दोन कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता.

या टेपमध्ये इराणचे परराष्ट्रमंत्री जरीफ हे आपलं म्हणणं पुढची अनेक वर्षं कोणीही ऐकणार नसल्याचं आपल्याला वाटतं, असं दोनदा म्हणताना ऐकू येतात.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स देशाची धोरणं ठरवतं आणि देशाचं परराष्ट्र धोरण त्यांच्या युद्धनीतिनुसार ठरवलं जात असल्याची तक्रार वारंवार करतात.

इराणची प्रतिक्रिया

या टेपमधला आवाज परराष्ट्र मंत्र्यांचा नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलेलं नाही. पण जरीफ यांची ठराविक वक्तव्यं संदर्भापासून वेगळी काढत प्रसिद्ध करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. गरज पडल्यास ही संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या टेपचं रेकॉर्डिंग परराष्ट्र मंत्रालयाकडे नसून ते सुरक्षित ठेवणं परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी नसल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलंय.

माजी जनरल सुलेमानी स्वतःचं म्हणणं खरं करत - जरीफ

रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे माजी कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा जरीफ या टेपमध्ये उल्लेख करतात. ते अनेकदा स्वतःच्या कामासाठी आपल्याकडे येत, असं म्हणतात. जानेवारी 2020मध्ये जनरल सुलेमानी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेले होते.

रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये कशी ठराविक भूमिका घेण्यात यावी अशी सुलेमानींची इच्छा होती, याबद्दल ते सांगतात.

इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ

फोटो स्रोत, Reuters

सीरिया सरकारला पाठिंबा देण्यासाठी करण्यात येणाऱ्या रशियाच्या हवाई हल्ल्यांना पूरक म्हणून इराणी दलाने जमिनीवर उतरावं अशी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची इच्छा होती आणि म्हणून जनरल सुलेमानी यांनी कसं इराणला सीरियाच्या युद्धात उतरवलं याबद्दल ते सांगतात.

सुलेमानींनी इराणची सरकारी विमान कंपनी - इराण एअरच्या विमानांचा वापर सीरियामध्ये सैन्य नेण्यासाठीच्या उड्डाणांसाठी केल्याची तक्रारही ते करतात. असं करणं धोक्याचं होतंच पण इराणच्या प्रतिष्ठेसाठीही चांगलं नसल्याचं ते म्हणतात.

इराणने प्रवासी विमानांचा वापर गोळाबार करण्यासाठी आणि जवानांची ने आण करण्यासाठी केल्याचा आरोप करणाऱ्या बातम्या पूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे या वृत्तांना दुजोरा मिळतो.

अणु करार करण्यापासून रशियाने इराणला रोखलं

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी 2015मध्ये इराणला सहा जागतिक बलाढ्य देशांसोबत अणु करार करण्यापासून थांबवण्यासाठी शक्य ते सगळं केल्याचं परराष्ट्र मंत्री जरीफ यांनी या टेपमध्ये म्हटलंय. या सहा देशांमध्ये रशियाचाही समावेश होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

लावरोव यांच्यासोबत जरीफ यांचे संबंध चांगले असल्याचं मानलं जातं आणि रशिया हा इराणचा जवळचा साथीदार असल्याचं मानलं जात असल्याने जरीफ यांचं हे विधान गोंधळात टाकणारं आहे. अणु करार पुन्हा करण्यासाठी अमेरिकेसोबतच इराणची व्हिएन्नामध्ये अप्रत्यक्ष चर्चा सुरू असताना ही टेप लीक झाली आहे.

यापूर्वी 2018मध्ये अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणवर पुन्हा निर्बंध लावले होते. त्यानंतर इराणने त्यांनी केलेले करार मोडायला सुरुवात केली होती.

रिव्होल्यूशनरी गार्ड्सना अणु करार नको होता आणि म्हणून त्यांनी हा करार रोखण्यासाठी सगळे प्रयत्न केल्याचं परराष्ट्रमंत्री सांगताना या टेपमध्ये ऐकू येतात.

इराकच्या सैन्यतळावरच्या हल्ल्याबद्दल काय बोलले जरीफ?

कासिम सुलेमानींच्या हत्येनंतर 8 जानेवारी 2020ला उत्तरादखाल करण्यात आलेल्या कारवाईमध्ये इराकी सैन्य तळावर हजर असणाऱ्या अमेरिकन सैन्यावरच्या हल्ल्याबद्दल जरीफ बोलताना ऐकू येतात. या हल्ल्याला 2 तास उलटून गेल्यावरही आपल्याला याबद्दल माहिती नव्हतं, असं त्यांनी म्हटलंय.

तेहराणमधून उड्डाण केलेलं युक्रेनचं प्रवासी विमान एअर डिफेन्स युनिटने चुकून पाडलं, त्याबद्दलही ते बोलतात.

या विमानातल्या सगळ्या 176 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होती. इराणने यानंतर स्वतःची चूक स्वीकारू नये यासाठी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या कमांडर्सनी आपल्यावर दबाव आणल्याचं परराष्ट्र मंत्री जरीफ यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)