You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनका लस घेतल्यानंतर युकेमध्ये 7 जणांचा रक्तात गुठळ्या होऊन मृत्यू
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
युकेमध्ये ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाची लस देण्यात आल्यानंतर रक्तामध्ये गुठळ्या झाल्याने 7 जणांचा मृत्यू झालाय.
24 मार्चपासून युकेमध्ये 1.8 कोटी लोकांना ही लस देण्यात आली त्यापैकी 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या अशा गुठळ्या झाल्याचं आढळलं. पण हा योगायोग आहे की लशीचा दुष्परिणाम हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
पण या लशीच्या धोक्यांच्या तुलनेत लशीचे फायदे कित्येक पटींनी जास्त असल्याचं युकेच्या औषध नियामकांनी म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटना - WHO आणि युरोपियन मेडिसिन एजन्सीनेही याला दुजोरा दिलाय.
तर 'रुग्णांच्या सुरक्षिततेला कंपनीचं सर्वाधिक प्राधान्य' असल्याचं अॅस्ट्राझेनकाच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
पण यानंतर जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड आणि कॅनडा या देशांनी अॅस्ट्राझेनकाच्या लशीचा वापर फक्त ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित ठेवलाय.
युकेच्या औषध नियामकांनी शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार रक्तात गुठळ्या होण्याच्या म्हणजेच सेरेब्रल व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिस (CVST) होण्याच्या 22 केसेस आढळल्या आहेत. हा मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होण्याचा एक प्रकार आहे.
या सोबतच या लोकांच्या रक्तातील प्लेटलेट्सचं प्रमाणाम कमी झालं होतं. शिवाय 8 लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांच्या इतर तक्रारीही आढळल्या आहेत.
यामुळे 7 जणांचा युकेमध्ये मृत्यू झाल्याचं युकेच्या औषध नियामकांनी बीबीसीला ईमेलद्वारे सांगितलं.
युकेच्या औषध नियामक MHRA चे चीफ एक्झिक्युटिव्ह डॉ. जून रीन म्हणाले, "कोव्हिड 19चा संसर्ग रोखण्यासाठी लशीमुळे होणारे फायदे आणि लशीमुळे होणारी गुंतागुंत यांची तुलना केल्यास फायदे हे धोक्यांच्या तुलनेने कित्येक पटींनी जास्त आहेत. आणि लोकांनी त्यांची पाळी आल्यावर लस घेत रहावी."
अॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे रक्तात गुठळ्या झाल्या का?
रक्तामध्ये अशाप्रकारे दुर्मिळ गुठळ्या होण्याचे प्रकार अॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे होत आहेत, का याचा तपास सध्या करण्यात येतोय. तर 'हे सिद्ध झालं नसलं, तरी असं होण्याची शक्यता असल्याचं' युरोपियन मेडिसिन्स एजन्सीने या आठवड्यातच म्हटलं होतं.
पण यातल्या दोन बाबींमुळे शंका निर्माण झाल्या आहेत. एकतर रक्तामध्ये ज्या प्रकारे गुठळ्या निर्माण झाल्या, प्लेटलेट्सची संख्या कमी झाली ही एक बाब आहे. तर दुसरीकडे रक्तामध्ये आढळलेल्या दुर्मिळ अँटीबॉडीजचा संबंधही रक्ताच्या इतर प्रकारच्या गुठळ्या होण्याशी आहे.
"सेरेब्रल व्हीनस सायनस थ्रॉम्बोसिसच्या या दुर्मिळ आणि वेगळ्या घटनांमध्ये लस हे अनेक कारणांपैकी एक ठरलं असण्याची शक्यता आहे, पण हे अद्याप ठामपणे म्हटलं जाऊ शकत नाही. यावर तातडीने अधिक संशोधन होणं गरजेचं आहे," युएलसी इन्सिट्यूट ऑफ न्यूरोलॉजीचे प्रा. डेव्हिड वेरिंग सांगतात.
ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनका आणि फायझर - बायोएनटेकच्या लशींमधला फरक, हा आणखी एक वेगळा मुद्दा आहे.
युकेमध्ये फायझरची लस दिल्यानंतर CVSTची दोन प्रकरणं झाली. एकूण 1 कोटी लोकांना आतापर्यंत फायझरची लस देण्यात आली आहे. आणि रक्ताच्या गाठी झालेल्या दोघांच्या शरीरातली प्लेटलेट्सची पातळी कमी झाली नव्हती.
शिवाय एरवीही किती जणांमध्ये अशाप्रकारे रक्ताच्या गुठळ्या होतात, याविषयीही स्पष्टता नाही. एका अंदाजानुसार दर दहा लाखांमधल्या 2 ते 16 जणांना दर वर्षी अशा प्रकारचा त्रास होतो. पण कोरोना व्हायरसमुळे अशा प्रकारच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण कदाचित वाढलं असावं.
जर्मनीमध्ये 27 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यांच्यापैकी 31 जणांना CVST च्या रक्ताच्या गुठळ्या झाल्या. तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्रास झालेल्यांमध्ये बहुतेक तरूण आणि मध्यमवयीन महिलांचा समावेश आहे.
युकेमध्ये अशाप्रकारचा त्रास किती जणांना झाला याचा डेटा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. पण विविध वयोगटाच्या लोकांना या त्रास झाला असल्याचा अंदाज आहे.
रक्तात या गुठळ्या होण्याचा टथोडाफार संबंध' लशीशी असल्याचं सांगणारे पुरावे वाढत असल्याचं एका संशोधकांनी बीबीसीला सांगितलं. पण असं असलं तरीही धोक्यांच्या तुलनेत लशीचे फायदे जास्त आहेत, आणि लस न घेण्यात जास्त धोका असल्याचं या संशोधकांनी म्हटलंय.
ईस्ट अँग्लिया विद्यापीठातले मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट प्रा. पॉल हंटर यांनी बीबीसी रेडिओ 4 ला सांगितलं, "योगायोगाने काही दुर्मिळ घटना एकाचवेळी घडणं नवीन नाही. पण समजा या घटना एकदा लोकसंख्येच्या एका गटात घडल्या आणि मग दुसरीकडे झाल्या - म्हणजे आधी जर्मनीत आणि आता युकेमध्ये, तर यांचा एकमेकांशी संबंध नसण्याच्या शक्यता अतिशय कमी असतात. यावर अधिक संशोधन व्हायला हवं, हे स्पष्ट आहे. पण सध्याच्या घडीला तरी पुरावे पाहता याचा काहीसा संबंध असल्याचं वाटतं."
पण अशा प्रकारच्या घटना दुर्मिळ असल्याचं एडिंबरा विद्यापीठाच्या पब्लिक हेल्थ एक्सपर्ट प्रा. लिंडा बॉल्ड म्हणतात. बीबीसी ब्रेकफास्ट शोमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं, "या घटनांचा लशीसोबतच कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याचं सध्यातरी समोर आलेलं नाही. रक्तामध्ये गुठळ्या होण्याचा धोका कोव्हिडमुळे मोठ्या प्रमाणात वाढतो. आणि कदाचित म्हणूनही या प्रकारच्या घटनांचं प्रमाण वाढलं असावं."
जेम्स गॅलाघर यांचं विश्लेषण
सगळी औषधं, मग ती लस असो वा पॅरासिटमॉल, त्यांचे काही साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असतेच.
फ्लूसाठी जी लस घेतली जाते त्यामुळेही गिलियन - बारे सिंड्रोम (Guillain-Barre syndrome) हा मज्जासंस्थोवर दुष्परिणाम होण्याची शक्यता दहा लाखांत एक असते.
मग प्रश्न उभा राहतो - असे धोके पत्करणं खरंच फायद्याचं आहे का?
या समस्या लशीमुळेच निर्माण झाल्या, हे अजून सिद्ध झालेलं नाही. आकडेवारी पाहिली तर लस घेतलेल्या 25 लाख लोकांमागे एकाचा मृत्यू झालाय.
पण कोरोना व्हायरसमुळे जे धोके निर्माण होतात, त्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचा तपास होणं महत्त्वाचं आहे.
समजा 60 वर्षांच्या 25 लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला तर जवळपास 50,000 जणांचा जीव जाण्याची शक्यता आहे. जर हेच लोक 40 वर्ष वयाचे असतील तर 2,500 जणांचा जीव जाण्याची शक्यता आहे.
कोव्हिड 19 साठीचं लसीकरण जसजसं तरूण वयोगटापर्यंत पोहोचेल, जसजसा अधिक डेटा येईल, तसतसा लशीचे फायदे आणि धोके यांचा अभ्यास होत राहील. जगभरामध्ये या आकडेवारीचा सखोल अभ्यास केला जातोय. पण याचे निष्कर्ष यायला काही काळ लागेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)