You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : डार्कनेटवर मिळतेय लस आणि बनावट निगेटिव्ह सर्टिफिकेट
डार्कनेटवर कोव्हिड-19 ची लस, व्हॅक्सिन पासपोर्ट आणि कोव्हिड-19 चाचणीचे बनावटच निगेटिव्ह रिपोर्ट यांची विक्री होतेय.
इथे अॅस्ट्राजेनका, स्पुतनिक, साइनोफार्म किंवा जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसींच्या एका डोससाठी 500 ते 750 डॉलरपर्यंत रक्कम उकळली जाते.
इतकंच नाही तर काही लोक 150 डॉलर्समध्ये कोरोना लस घेतल्याचं बनावट सर्टिफिकेटही बनवून देत आहेत.
डार्कनेटवर 'मोठ्या संख्येने' कोरोना लसीसंबंधी जाहिराती दिसत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. मात्र, डार्कनेटवर जी लस विकली जाते ती खरी आहे की बनावट, याची सत्यता बीबीसी पडताळू शकत नाही.
डार्कनेटला डार्क वेब नावानेही ओळखतात. काही खास ब्राउजर्सच्या माध्यमातून इंटरनेटच्या या जगात प्रवेश करता येतो.
'चेक प्वाईंट' या सायबर सुरक्षा कंपनीचे सायबर तज्ज्ञ यावर्षी जानेवारीपासून डार्कनेटवर हॅकिंग फोरम्स आणि इतर मार्केट प्लेसवर पाळत ठेवून आहेत. याच काळात कोरोना लशीसंबंधीच्याा जाहिरात या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा झळकल्या.
तेव्हापासून आतापर्यंत या जाहिरातींचं प्रमाण तिप्पट झाल्याचं आणि त्यांची संख्या सध्या 1200 च्या जवळपास असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
अमेरिका, स्पेन, जर्मनी, फ्रान्स आणि रशियातले लोक डार्कनेटवर लस विकत असावे, असा अंदाज आहे. सायबर तज्ज्ञांच्या या टीमला रशियन आणि इंग्रजी भाषेतल्या अनेक जाहिराती दिसल्या.
या जाहिरातींमध्ये ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्रॅजेनका यांनी तयार केलेल्या लसीची किंमत 500 डॉलर्स आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने आणि स्पुतनिक यांनी तयार केलेल्या लसीची किंमत 600 डॉलर्स तर चीनच्या साइनोफार्म लसीची किंमत 750 डॉलर्स आहे.
तात्काळ किंवा दुसऱ्याच दिवशी लस हवी असल्यास, आमच्याशी संपर्क करा, असंही एका जाहिरातीत म्हटलेलं आहे.
दोन घ्या, एक मोफत
एका हॅकिंग फोरमवर कोव्हिड-19 चाचणीचे बनावट रिपोर्ट देऊ शकतो, असंही एका विक्रेत्याने म्हटलं आहे. त्यात म्हटलं आहे, "परदेशात जाणाऱ्यांसाठी किंवा नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आम्ही नेगेटिव्ह कोव्हिड रिपोर्ट देतो. दोन नेगेटिव्ह कोव्हिड रिपोर्ट खरेदी करा आणि एक मोफत मिळवा."
काही हॉलीडे टूर कंपन्या ग्राहकांकडे नेगेटिव्ह कोव्हिड रिपोर्टची मागणी करतात.
प्रवाशांना बार, स्पोर्ट्स स्टेडियम्स यासारख्या ठिकाणी जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी 'कोरोना व्हॅक्सिन पासपोर्ट' व्यवस्था लागू करण्याचा ब्रिटनचा विचार आहे.
तर युरोपीय अधिकाऱ्यांनी 'ग्रीन डिजीटल सर्टिफिकेट' लागू करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे. कोरोनाची लस घेतलेल्यांना किंवा कोव्हिड चाचणी निगेटिव्ह असणाऱ्यांना किंवा एकदा कोव्हिड-19 होऊन गेल्यावर त्यावर यशस्वीपणे मात करणाऱ्यांना हे सर्टिफिकेट देण्यात येईल आणि हे सर्टिफिकेट असणाऱ्यांना युरोपीय महासंघाच्या देशात प्रवासाची परवानगी असणार आहे.
आणि म्हणूनच डार्कनेटवर कोव्हिड-19 शी संबंधित बनावट सर्टिफिकेट्सची विक्री होत असल्याचं दिसतं.
अनेक विक्रेते तर बिटक्वाईन या क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातूनही बनावट सर्टिफिकेट विकत असल्याचं 'चेक प्वाईंट'च्या सायबर तज्ज्ञांना आढळून आलंय.
क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहाराची माहिती मिळवणं अवघड असतं. डार्कनेटवर क्रिप्टोकरंसी स्वीकारणारे एक विक्रेते ब्रिटनचे असल्याचं दिसतं. ते 150 डॉलर्समध्ये कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट देत आहेत.
सायबर तज्ज्ञांनी या विक्रेत्याशी संपर्क साधला. यावेळी विक्रेत्याने त्यांना त्यांचं नाव आणि सर्टिफिकेटवर लसीकरणाची कुठली तारीख टाकायची एवढीच माहिती विचारली.
विक्रेत्याने त्यांना केलेल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, "काळजी करू नका. हे आमचं काम आहे. आम्ही अनेकांसाठी हे काम केलं आहे आणि उत्तम काम केलं आहे."
'चेक प्वाईंट' कंपनीच्या प्रॉडक्ट व्हलनरेबिलिटीज रिसर्च विभागाचे प्रमुख ओडेड वनुनु म्हणतात, "अशाप्रकारे बेकायदेशीरपणे लस खरेदी करणं, लसीकरणाचं सर्टिफिकेट खरेदी करणं किंवा बनावट कोव्हिड-19 निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं अत्यंत घातक आहे, हे लोकांना कळायला हवं. हॅकर्सना केवळ तुमचा पैसा, तुमची माहिती आणि तुमच्या ओळखीचा फायदा लाटायचा असतो."
वनुनु यांनी 750 डॉलर्स देऊन चीनची सायनोफार्मा लस खरेदी केली, मात्र लस अजून डिलिव्हर झाली नसल्याचं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
कदाचित सायनोफार्मा लस विकणारे विक्रेते बनवाटही असू शकतात, असं टचेक प्वाईंटटच्या टीमचं म्हणणं आहे. त्यामुळे इतर विक्रेते खरंच लस विकत असतील, हे खात्रीशीरपणे सांगता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
या अत्यंत गंभीर विषयात कुठलीच फसवेगिरी होऊ नये, यासाठी प्रत्येक देशाने क्यूआर कोडच्या माध्यमातून कोरोना लसीसंबंधी माहितीचं डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं असल्याचंही 'चेक प्वाईंट'च्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)