You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्ससाठी सहमती घेण्याच्या अॅपवरून गदारोळ
सेक्ससाठी सहमती नोंदवण्यासाठी एखाद्या अॅपचा वापर करता येईल अशी कल्पना ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी मांडली आहे. मात्र आता त्याच्याविरोधातही मतं व्यक्त केली जात आहेत.
सेक्ससाठी सहमती डिजिटली नोंदली जाऊ शकते असं अॅपचे पुरस्कर्ते मिक फ्युलर यांचं मत आहे. सकारात्मक सहमती नोंदवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो असं ते म्हणतात.
मात्र अनेक लोकांनी हा प्रस्ताव अल्पकाळापुरता टिकणारा आणि यातून छळ होऊ शकतो अशी भीती व्यक्त करुन त्यावर टीका केली आहे. याचा वापर सरकार पाळत ठेवण्यासाठी करेल अशीही काळजी व्यक्त केली गेली आहे.
गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक छळ यावर चर्चा सुरू आहे. या अपराधांना विरोध करण्यासाठी सोमवारी हजारो महिलांनी मोर्चे काढले.
न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी गुरुवारी (18 मार्च) ही अॅपची कल्पना मांडली.
याबाबत नाइन नेटवर्कशी बोलताना आयुक्त मिक फ्युलर म्हणाले, "या अॅपवर तुम्हाला शंका असतील पण हे अॅप सर्वांनाच वाचवणारं आहे."
लैंगिक छळाच्या खटल्यांमध्ये सहमती सिद्ध करणं ही एक मोठी समस्या असते. पीडित व्यक्तीच्या मदतीसाठी या अॅपचा फायदा होऊ शकतो. ही कल्पना न्यू साऊथ वेल्स सरकारकडे मांडलेली आहे.
मात्र स्त्रियांच्या वकिलांनी या अॅपमुळे अनेक प्रश्न तयार होतील याकडे लक्ष वेधलं आहे. त्या म्हणतात, "सहमती नोंदवण्यात फेरफार केली जाऊ शकते, तसेच एखाद्या व्यक्तीने मत बदललं तर सहमतीचं उल्लंघन होऊ शकतं."
छळ करणारा माणूस पीडितेला ते अॅप वापरण्यासाठी बळजबरी करू शकतो, असं ट्वीट न्यू साऊथ वेल्सच्या राज्याच्या महिला छळप्रतिबंध सेवेने केलं आहे.
महिला खासदारांनीही या अॅपवर टीका केली असून पीडितांच्या मदतीसाठी कायदे आणि जनजागृतीची गरज असल्याचं सांगितलं.
जेनी लिओंद या खासदारांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, "सहमतीबद्दल कायद्यात सुधारणा हवी, परिपूर्ण शिक्षणाची आम्हाला गरज आहे. पुरुषांनी स्वतःला वाटेल तसं वागण्याला थांबवण्याची गरज आहे. आम्हाला अॅप नकोय."
डेन्मार्कमध्ये एका कंपनीने अशाच प्रकारचं एक अॅप सुरू केलं होतं. डेन्मार्कमध्ये सहमतीविना सेक्सला गुन्हा ठरवण्यात आल्या नंतर हे अॅप सुरू केलं होतं. मात्र लोकांनी आणि माध्यमांनी त्यावर टीका केली होती.
सहमतीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावा यासाठी न्यू साऊथ वेल्सच्या शाळकरी मुलींनीही आंदोलन केले.
हजारो महिलांनी शाळेत शिकत असताना आपला लैंगिक छळ झाल्याचं सांगितलं आहे.
ही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)