पाकिस्तान : 12 व्या वर्षी अपहरण, धर्मांतर आणि अपहरणकर्त्याशीच लग्न

    • Author, माईक थॉम्सन
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

12 वर्षांची ख्रिश्चन धर्मीय फराह सांगत होती...गेल्या उन्हाळ्यात तिला पाकिस्तानातल्या तिच्या घरून उचलून नेण्यात आलं, तिला बेदम मारहाण करण्यात आली, बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला आणि तिच्या अपहरणकर्त्याशीच तिचं लग्न लावून देण्यात आलं. दरवर्षी पाकिस्तानातल्या शेकडो तरुण हिंदू, ख्रिश्चन, शीख मुलींच्या वाट्याला हे जीणं येतंय.

गेल्या वर्षी 25 जून रोजी फराह फैसलाबाद शहरातल्या तिच्या घरात होती. घरात तिचे आजोबा, तीन भाऊ आणि दोन बहिणीही होत्या. कुणीतरी दरवाजा ठोठावला. तिच्या आजोबांनी दार उघडलं. दार उघडताच तीन पुरूष आत घुसले. त्यांनी फराहला फरफटत बाहेर नेलं आणि बाहेर उभ्या व्हॅनमध्ये कोंबलं.

त्यावेळी फराहचे वडील आसिफ कामावर गेले होते. "मुलीला परत मिळवण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे", अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिल्याचं ते सांगतात.

या घटनेची तक्रार द्यायला आसिफ जवळच्या पोलीस ठाण्यात गेले. फराहचे आजोबा त्या तिघांपैकी एकाला ओळखायचे. त्यांनी पोलिसांना त्या व्यक्तीचं नावही सांगितलं. पण, तक्रार नोंदवून घेण्यात आणि मदत करण्यात पोलिसांना रसच नव्हता, असं आसीफ सांगतात.

ते म्हणाले, "त्यांनी अजिबात सहकार्य केलं नाही. गुन्हा नोंदवून घ्यायलाही नकार दिला. इतकंच नाही तर त्यांनी मला ढकलून शिवीगाळही केली."

त्यानंतरही त्यांनी तक्रार नोंदवण्याचा बराच प्रयत्न केला. अखेर तीन महिन्यांपूर्वी त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. मात्र, कारवाई शून्य.

दरम्यान, इकडे 12 वर्षांच्या फराहला अपहरणकर्त्यांनी 110 किमी अंतरावर असलेल्या हफिझाबाद शहरातल्या एका घरात कोंडून ठेवलं. तिच्यावर बलात्कार केला. बेदम मारहाण केली. आपल्याला गुलामासारखी वागणूक मिळाल्याचं ती सांगते.

ती म्हणते, "दिवसातून बराच वेळ मला साखळीने बांधून ठेवलं जाई. इतर वेळी अपहरकर्त्याचं घर स्वच्छ करण्याचं, बाहेरच्या अंगणातल्या गुराढोरांची काळजी घेण्याचं काम मला करावं लागे."

"ते माझ्या पायात साखळी बांधत आणि मला दोरखंडाने बांधून ठेवत. मी तो दोर कापण्याचा आणि साखळीतून स्वतःला मुक्त करण्याचा खूप प्रयत्न करायचे. पण, ते कधीच शक्य झालं नाही. मी रोज रात्री देवाकडे यातून सुटका कर, अशी प्रार्थना करायचे."

मागच्या जनगणेनुसार पाकिस्तानात जवळपास 20 लाख ख्रिश्चन लोकसंख्या आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास 1 टक्का आहे.

पाकिस्तानातील मानवाधिकार संघटनांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानात दरवर्षी एक हजार ख्रिश्चन, हिंदू आणि शीख मुलींचं अपहरण होतं. शरिया कायद्यानुसार मुलगा-मुलगी दोघंही मुस्लीम असतील तर 16 वर्षाखालील लग्नही कायद्याने वैध आहे. त्यामुळे अपहरण केलेल्या मुलींचं बळबजरीने धर्मांतर करतात. फराहच्या बाबतीतही हेच घडलं. तिलाही इस्लाम धर्म स्वीकारायला भाग पाडण्यात आलं आणि त्यानंतर ज्याने तिचं अपहरण केलं त्याच तरुणाशी तिचं लग्न लावून देण्यात आलं.

पाकिस्तानातील नॅशनल काऊन्सिल ऑफ चर्चेसच्या (NCCP) म्हणण्यानुसार अशाप्रकारे अपहरणाचं प्रमाण वाढतंय.

एनसीसीपीचे सरचिटणीस बिशप व्हिक्टर अझारिया म्हणतात, "शेकडो, शेकडो मुलींचं अपहरण होतंय. अनेक जण हा गुन्हा करतात. पण, प्रशासन काही काही करत नाही."

फराहच्या वडिलांना तिची खूप काळजी लागून होती. पोलिसांकडून मदत मिळत नसल्याचं बघून त्यांनी स्थानिक चर्चकडे मदत मागितली. चर्चने त्यांना कायदेशीर मदत दिली.

तब्बल 5 महिने झोकून देऊन पाठपुरावा केल्यानंतर अखेर गेल्या डिसेंबर महिन्यात पोलिसांनी कारवाई केली.

फराह सांगते, "चार पोलीस अपहरणकर्त्याच्या घरी आले आणि म्हणाले की मी त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात जावं, असे कोर्टाचे आदेश आहेत."

5 डिसेंबर रोजी फराहची केस फैसलाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी पुढचा तपास होईपर्यंत तिची रवानगी महिला आणि बालकल्याण शिबिरात केली.

मात्र, तरीही फराहमागचं दुष्टचक्र संपलेलं नव्हतं.

फराहचे पालक कोर्टाच्या निकालाची वाट बघत असतानाच फराहने धर्मपरिवर्तन आणि लग्न दोन्ही मंजूर असल्याचं सांगितल्याने आपण तपास थांबवत असल्याचं पोलिसांनी फराहच्या वडिलांना सांगितलं.

फराहनेही 23 जानेवारीला कोर्टात हेच सांगितलं. मात्र, फराह कुणाच्यातरी दबावाखाली असल्याचा संशय कोर्टातल्या अधिकाऱ्यांना आला. खोलात चौकशी केल्यावर फराहनेही हे मान्य केलं.

ती सांगते, "मी कोर्टात तसं म्हणाले कारण अपहरणकर्त्या तरुणाने मला धमकावलं की मी नकार दिला तर ते आधी मला ठार करतील आणि नंतर माझ्या वडिलांना आणि भावंडांनाही. माझ्या सर्व कुटुंबीयांना ते ठार करतील, याची भीती मला वाटली आणि म्हणून ते सांगतील ते सर्व ऐकायला मी तयार झाले."

फराहचं लग्न योग्यरित्या नोंदवण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे त्याला मान्यता देता येणार नाही असा निकाल 16 फेब्रुवारी रोजी म्हणजेच फराहचं अपहरण केल्यापासून तब्बल 8 महिन्यांनंतर कोर्टाने दिला.

एका तांत्रिक चुकीमुळे तिची सुटका झाली आणि तिला पुन्हा आपल्या कुटुंबाकडे परत जाता आलं.

मात्र, अनेक मुलींची सुटका होऊनही त्यांची अग्निपरीक्षा काही संपत नाही. बरेचदा मुलींना पुन्हा अपहरणाच्या, कुटुंबीयांना ठार करण्याच्या धमक्या मिळत असतात. त्यामुळे एका मानसिक धक्क्यात त्या कायमच्या गुरफटल्या जातात.

हेच 14 वर्षांच्या मारियाच्या बाबतीतही घडलं. मारिया ख्रिश्चन आहे. तिचंही अपहरण करून बळजबरीने धर्मांतर करून अपहरणकर्त्याशीच लग्न करायला भाग पाडण्यात आलं होतं. पण, तिने अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तेव्हापासून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना सतत धमक्या मिळतात. त्यामुळे त्यांना सतत राहण्याचं ठिकाण बदलावं लागतं.

मारियाला मदत करण्यासाठी युकेतल्या एका स्वयंसेवी संघटनेने आणि Aid to the Church in Need या संस्थेने 12,500 नावं असलेली एक याचिका युके सरकारला दिली आहे. यावर युकेतल्या 30 पेक्षा जास्त खासदाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मारियाला युकेमध्ये आश्रय देण्यात यावा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

Aid to the Church in Need संस्थेचे प्रवक्ते जॉन पॉन्टिफेक्स म्हणतात, "या मुलींच्या मनावर आधीच आघात झालेला असतो. त्यात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या धमक्या येतात त्यामुळे या आघाताची तीव्रता आणखी वाढते. मारियाप्रमाणे इतरही अनेकींसाठी यूकेमध्ये आश्रय हीच सुरक्षित जीवनाची आशा आहे."

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही अशाप्रकारे बळजबरीने होणाऱ्या धर्मांतर प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

इमरान सरकारमधले धार्मिक सलोखाविषयक विशेष प्रतिनिधी ताहीर मेहमूद अशरफी यांनी नुकतच म्हटलं होतं, "लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं अपहरण, धर्मपरिवर्तन आणि बळजबरीने लग्न हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत."

मात्र, आसिफ यांचा पोलिसांचा अनुभव बघता अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असं म्हणावं लागेल. आपल्या मुलीचं अपहरण करणाऱ्या तिन्ही गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं आसिफ सांगतात.

फराह आता 13 वर्षांची झाली आणि घरी परतल्याचा तिला खूप आनंदही आहे. तिच्याबरोबर जे काही घडलं त्या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची ती मदतही घेतेय. आपल्यासारख्याच इतर मुलींच्या सुटकेसाठीही प्रयत्न करावे, अशी तिची इच्छा आहे.

ती म्हणते, "ईश्वराचं पाकिस्तानातील प्रत्येक मुलाकडे लक्ष आहे आणि तो त्या सर्वांचं रक्षण करेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)