बलात्काराच्या एका आरोपामुळे का ढवळून निघालंय ऑस्ट्रेलियाचं राजकारण?

    • Author, फ्रॅन्सीस माओ
    • Role, बीबीसी न्यूज, सिडनी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

15 दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या माजी राजकीय सल्लागार ब्रिटनी हिगिन्स यांनी आरोप केला की, संसद भवनात त्यांच्यावर बलात्कार झाला होता. या आरोपामुळे ऑस्ट्रेलियात एकच गदारोळ माजला आहे.

ब्रिटनी हिगिन्स यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर पुरुष सहकाऱ्याने लैंगिक हिंसाचार केला होता. हा सहकारी सत्ताधारी लिबरल पार्टीमध्ये 2019 साली एका मंत्र्याच्या कार्यालयात सल्लागार होता.

ब्रिटनी हिगिन्स यांनी ही घटना सांगितल्यानंतर अनेक महिला पुढे आल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या राजकारणातील लैंगिक हल्ल्यांचे आपापले अनुभव सांगू लागल्यात.

यात सर्वात स्फोटक आरोप म्हणजे 1988 सालचा आहे. हे प्रकरण एका अज्ञात कॅबिनेट मंत्र्याचा आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोमवारी (1 मार्च) म्हटलं की, मंत्र्याने बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेत्यावरही बलात्काराचा आरोप करण्यात आलाय. तसं प्रकरण पोलिसांकडे आलंय. अशा सर्व स्थितीत मॉरिसन सरकारवर उत्तरासाठी दबाव वाढत चालला आहे.

ब्रिटनी हिगिन्स यांच्यासोबत काय घडलं होतं?

ब्रिटनी हिगिन्स यांचं म्हणणं आहे की, त्या त्यावेळी 24 वर्षांच्या होत्या आणि हा त्यांचा ड्रीम जॉब होता. शिवाय, या नोकरीवर लागून त्यांना काही आठवडेच उलटले होते.

मार्च 2019 मध्ये एका वरिष्ठ सहकाऱ्याने त्यांना नाईट आऊटनंतर संसदेत नेलं. दारू जास्त प्यायल्याने ब्रिटनी यांना मंत्र्यांच्या कार्यालयातच झोप आली. ब्रिटनी सांगतात, जेव्हा त्या जाग्या झाल्या, तेव्हा त्या सहकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं कळलं.

त्या सहकाऱ्याला काही दिवसातच काढून टाकण्यात आलं. त्याला केवळ लैंगिक अत्याचारप्रकरणी बरखास्त करण्यात आलं नव्हतं, तर त्याने कार्यालयाचे सुरक्षा नियमही तोडले होते. कारण रात्रीच्या वेळेस संसदेत कुणालाही जाण्याच परवानगी नाही.

ब्रिटनीने तिची बॉस आणि तत्कालीन सुरक्षा उद्योगमंत्री लिंडा रिनॉल्ड्स यांनी लैंगिक हल्ल्याबाबत सांगितलं. लिंडा यांच्यासोबत ब्रिटनी यांची चर्चा त्याच रुममध्ये झाली, जिथे त्यांच्यावर लैंगिक हल्ला झाला होता.

लिंडा यांनी ब्रिटनी यांना पाठिंबा देण्याचा विश्वास दिला आणि पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यासही सांगितलं.

ब्रिटनी या तेव्हा खूप दबावात होत्या. या सगळ्यामुळे नोकरी जाऊ नये, असं त्यांना वाटत होतं. ब्रिटनी म्हणतात, "लिबरल पार्टीने मला गप्प बसवलं होतं. मात्र, मॉरिसन ज्यावेळी लैंगिक हिंसाचाराविरोधात बोलत होते, तेव्हा मी बोलण्याचा निर्णय घेतला."

न्यूज डॉट कॉम एयूशी बोलताना ब्रिटनी यांनी सांगितलं, "मॉरिसनच्या बाजूला एक महिला उभी होती, जी लैंगिक हिंसाचाराने पीडित महिलांच्या अधिकारांसाठी अभियान चालवते. मला वाटलं की एकीकडे हे चित्र आहे आणि दुसरीकडे यांचंच सरकार मला गप्प बसवू पाहत आहे. हा धोका आहे. हे चूक आहे."

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर टीकेचा भडीमार

ब्रिटनी यांनी त्यांच्यासोबतचा प्रसंग सांगितल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी माफी मागितली आहे. दोन वर्षांपूर्वी ब्रिटनी यांची तक्रार ज्या पद्धतीने हाताळली गेली, त्याबाबत त्यांनी जाहीरपणे खंत व्यक्त केली. पंतप्रधानांनी संसदेतील कार्यसंस्कृती आणि पॉलिटिकल स्टाफच्या मदतीबाबत चौकशीचं वचन दिलं.

या प्रकरणात मॉरिसन यांनी केलेल्या एका वक्तव्याबाबतही खूप चर्चा झाली. मॉरिसन यांनी म्हटलं की, ब्रिटनी प्रकरण मला तेव्हा नीट समजलं, जेव्हा माझ्या पत्नीने सांगितलं की, आपल्या दोन मुलींना लक्षात ठेवून या सर्व प्रकरणाकडे पाहा.

"माझ्या पत्नीने मला म्हटलं की, तुम्ही या प्रकरणाकडे एका वडिलांच्या नजरेतून पाहायला हवं. जर तुमच्या मुलींबाबत असं झालं असतं, तर तुम्ही काय केलं असतं?" असंही मॉरिसन यांनी पत्रकारांना सांगितलं.

मॉरिसन यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे. न्याय देण्यासाठी वडील असणं आवश्यक नाही. पंतप्रधान म्हणूनही ते न्याय देऊ शकत होते. अनके महिलांनी म्हटलंय की, ऑस्ट्रेलियाला वडिलांची नव्हे, एका पंतप्रधानांची आवश्यकता आहे.

पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर टीका होतेय, कारण हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेतलं नसल्याचं म्हटलं जातंय. मॉरिसन आणि त्यांच्या मंत्र्यांवर हेही आरोप लावले जात आहेत की, ते लोकांच्या प्रश्नांपासून पळ काढत आहेत.

त्यांना विचारलं जातंय की, या सर्व प्रकरणाची सरकारमध्ये कुणाला माहिती होती का आणि कधी माहित पडलं? जर माहित होतं तर न्याय देण्यासाठी आतापर्यंत काय काय केलं?

हे प्रकरण मॉरिनस यांच्या मंत्रिमंडळातील किमान तिघांना माहित होतं. मॉरिसन यांचं म्हणणं आहे की, देशातील इतर लोकांना जेव्हा माहित पडलं, तेव्हाच त्यांनाही माहित पडलं.

मात्र, ब्रिटनी हिगिन्स यांच्या मते, पंतप्रधानांकडूनच पीडितेवर आरोप करण्याची मानसिकता अधिक त्रासदायक आहे.

त्या म्हणतात, "हे केवळ माझ्यासाठी नाही, तर इतर असंख्य पीडितांसाठीही आहे."

आणखी महिलाही आल्या समोर

ब्रिटनी हिगिन्सनंतर इतर चार महिलाही स्थानिक माध्यमांसमोर आल्या आहेत आणि त्यांनी लैंगिक हिंसाचार, अत्याचाराचे आरोप केले आहेत.

एक महिलेने द ऑस्ट्रेलियनशी बोलताना म्हटलं, "2020 मध्ये एका पुरुषाने माझ्यावर बलात्कार केला. त्याच्यासोबत मी ड्रिंक आणि डिनर केलं होतं. जर सरकारने 2019 मध्ये ब्रिटनी प्रकरण नीट हाताळलं असतं, तर माझ्यासोबत 2020 मध्ये हे झालं नसतं."

आणखी एका महिलेसोबत 2017 मध्ये नाईट आऊटनंतर बलात्कार झाला होता. एबीसीच्या वृत्तानुसार, तिसऱ्या एका महिलेने ब्रिटनी हिगिन्स समोर आल्यानंतर तिच्याबाबत घडलेल्या घटनेबाबत पोलिसात तक्रार केली आहे. त्या महिलेच्या आरोपानुसार, 2017 साली सहकाऱ्यांसोबत डिनरला गेली असताना, एका व्यक्तीनं तिच्या जांघेतून हात फिरवला होता.

गेल्या बुधवारी चौथ्या महिलेने news.com.au ला सांगितलं की, एका व्यक्तीने तिच्यासोबत सेक्ससाठी दबाव आणला होता.

ब्रिटनी हिगिन्स प्रकरणावर ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील काही सदस्यांनी चुप्पी साधल्याचं बोललं जात आहे.

कॅबिनेट मंत्रीच बलात्कार प्रकरणातील आरोपी

शुक्रवारी (27 फेब्रुवारी) विरोधी पक्षातील (लेबर पार्टी) खासदार पेनी वोंग आणि ग्रीन्स सीनेटर सारा हँन्सोन-यंग यांनी एएफपी वृत्तसंस्थेला मिळालेल्या एका पत्राचा उल्लेख केला.

आरोप असा आहे की, एक व्यक्ती, जी आता कॅबिनेट मंत्री आहे, तिने 1988 साली 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी त्या मंत्री आणि कथित पीडितेची ओळख सार्वजनिक केली नाहीय.

त्या महिलेने गेल्यावर्षी वयाच्या 49 व्या वर्षी आत्महत्या केली. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला त्या महिलेने न्यू साऊत वेल्स पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र, तिच्या मृत्यूनंतर चौकशी थांबवण्यात आली.

गेल्या आठवड्यात त्या महिलेच्या मित्रांनी पंतप्रधान मॉरिसन आणि इतर खासदारांना पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मॉरिसन यांनी ही मागणी नाकारली होती आणि म्हटलं होतं की, हे प्रकरण पोलिसांकडे आहे. मॉरिसन यांनी सोमवारी पत्रकारांनी म्हटलं की, ज्या व्यक्तीवर आरोप आहे, त्याने ते स्पष्टपणे फेटाळले आहेत.

ज्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे, त्यांचं म्हणणं आहे की, कथित पीडित महिला मृत्युमुखी पडली आहे. अशावेळी पोलिस चौकशी पुढे सुरू ठेवणं फारच कठीण दिसतंय. कारण अशा प्रकरणात तक्रारदाराशी चौकशीदरम्यान बोललं जातं.

दुसरीकडे, रविवारी एका विद्यमान सरकारच्या एका खासदाराने लेबर पार्टीच्या खासदाराविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

सर्वसामान्य जनतेचा दबाव

गेल्या 15 दिवसात ऑस्ट्रेलियातील राजकीय संस्कृती आणि लैंगिक भेदभाव यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या आठवड्यात मॉरिसन यांनीही हे मान्य केलं होतं की, व्यवस्थेत कमकुवत गोष्टी आहे आणि कामाच्या ठिकाणाला सुधारण्याची आवश्यकता आहे. मात्र, लोकांचा दबाव आहे की, काहीतरी ठोस काम करावं.

टीकाकारांचं म्हणणं आहे की, एका कॅबिनेट मंत्र्यांवर गंभीर आरोप आहे, तर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. मात्र, सरकारने या मागण्या फेटाळल्या आहेत.

दुसरीकडे, ब्रिटनी हिगिन्स यांचं म्हणणं आहे की, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांना वाटतं की, व्यवस्थेत सुधारणा व्हावी, जेणेकरून संसदेत अशा प्रकरणांना नीट हाताळलं जाऊ शकेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)