अॅलेक्सी नवालनी यांच्यासाठी निदर्शनं करणाऱ्या युरोपीय मुत्सद्दी अधिकाऱ्यांची हकालपट्टी

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात उभे ठाकलेले कार्यकर्ते अॅलेक्सी नवालनी यांच्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला नवालनी यांना अटक झाली होती.

या अटकेविरोधात संपूर्ण रशियात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत. या निदर्शनात भाग घेतल्याचा ठपका ठेवत रशियाने जर्मनी, स्वीडन आणि पोलंडच्या (मुत्सद्दी अधिकारी) हकालपट्टी केली आहे.

23 जानेवारीला झालेल्या 'बेकायदेशीर निदर्शनांमध्ये' सहभागी झाल्यामुळे तिघांवर ही कारवाई करण्यात आल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

या तिन्ही देशांसह यूके, फ्रान्स आणि युरोपीय महासंघानेही या कारवाईचा निषेध केला आहे.

युरोपीय महासंघाचे परराष्ट्र विषयाचे प्रमुख जोसेप बोरेल यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांची मॉस्कोत भेट घेतल्यानंतर काही तासांतच ही कारवाई करण्यात आली.

पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेले अॅलेक्सी नवालनी यांच्या अटकेनंतर संपूर्ण रशियात 23 आणि 31 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली. यात हजारो आंदोलकांना अटक करण्यात आली.

राजनयिकांना हद्दपार करण्याची ही कारवाई 'अजिबात योग्य नाही' आणि रशियाने आपल्या कारवाईवर पुनर्विचार केला नाही तर त्याला 'उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही', अशा इशारा जर्मनीने दिला आहे.

तर 23 जानेवारीला झालेल्या निदर्शनांमध्ये आमच्या राजनयिकांनी भाग घेतल्याचा आरोप निराधार असल्याचं आणि या कारवाईला योग्य ते प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला अधिकार असल्याचं स्वीडनचं म्हणणं आहे.

या कारवाईमुळे 'द्विपक्षीय संबंध आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचं' पोलंडने म्हटलं आहे.

"आम्ही या निर्णयाचा तीव्र निषेध करतो आणि राजनयिक म्हणून आपल्या कार्याशी विसंगत कृती केल्याचा आरोप आम्ही फेटाळून लावतो", अशी प्रतिक्रिया युरोपीय महासंघाच्या वतीने बोरेल यांनी दिली.

दरम्यान, नवालनी यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे युरोपकडून निर्बंध लादले गेल्यास ते बेकायदेशीर असतील, असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे रशियाच्या कारवाईनंतर जर्मनी आणि पोलंडने रशियन राजदूतांना तलब करून नाराजी व्यक्त केली. रशियाच्या कारवाईनंतर पोलंड आणि जर्मनीही रशियाच्या राजनयिकांची हकालपट्टी करून जशास तसे उत्तर देतील, अशीही शक्यता व्यक्त होतेय.

बीबीसीच्या मॉस्को प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांचं विश्लेषण

नवालनी यांच्या विरोधातली निदर्शनं होऊन आठवडा लोटला आहे. त्यामुळे रशियाने राजनयिकांच्या हकालपट्टीची जी कारवाई केली ती याआधी कधीही करता येऊ शकली असती. मात्र, युरोपीय महासंघाचे जोसेप बोरेल रशियात असताना रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही घोषणा केली.

त्यामुळे या कारवाईची वेळ बघता यातून रशियाला एक संदेश द्यायचा होता, हे स्पष्टच आहे. तो असा - तुम्ही आम्हाला मानवाधिकार आणि स्वातंत्र्य यावर कितीही उपदेश करा. मात्र, आम्ही तेच करू जे आम्हाला करायचं आहे आणि तुम्ही काय विचार करता याने आम्हाला तिळमात्र फरक पडत नाही.

इतकंच नाही तर हजारो निदर्शकांना अटक केल्यावरून जी टीका होतेय, त्याचं उत्तरही रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आधीच तयार करून ठेवलं होतं. त्यांनी अमेरिका आणि युरोपमधल्या पोलिसी हिंसाचाराचे व्हीडिओ एकत्र करून ते या राजनयिकांना सुपूर्द केले आहेत.

सर्गेई लॅव्हरोव्ह या खेळातले जुने अनुभवी खेळाडू आहेत. 2014 साली युक्रेनचा क्रिमिया हा रशियन भाषिक प्रांत सार्वमताच्या जोरावर रशियात समाविष्ट झाला. त्यावेळीही बरीच टीका झाली आणि रशियावर निर्बंधही टाकण्यात आले होते. तेव्हापासूनच लॅव्हरोव्ह या विषयावर उघडपणे मतभेद व्यक्त करत आले आहेत.

आंतरराष्ट्रीय दबावामुळे रशियाच्या वागणुकीत तेव्हाही फरक पडला नव्हता आणि आता 'नवालनी यांचा मुद्दाही' त्याच पद्धतीने हाताळण्याची तयारी रशियाने सुरू केली आहे.

अॅलेक्सी नवालनी कोण आहेत?

44 वर्षांचे अॅलेक्सी नवालनी राजकीय कार्यकर्ते आहेत. 2011 सालापासून त्यांनी रशियातील भ्रष्टाचार आणि राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पूर्व रशियामध्ये त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप आहे. जर्मनीमधल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. यानंतर रशियन सरकारने अटकेचा इशारा देऊनही जानेवारीच्या शेवटी ते रशियात परतले.

रशियात परतल्यानंतर रशियन पोलिसांना त्यांना अटक केली. 2014 सालच्या एका घोटाळ्यात त्यांना साडे तीन वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, स्थानबद्ध असल्याने त्यांची एक वर्षाची शिक्षा कमी करण्यात आली होती. निलंबित शिक्षेच्या अटींचं उल्लंघन केल्याचं कारण देत नवालनी यांना आता अटक करण्यात आली आहे.

राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं प्रशासन भ्रष्टाचाराची बजबजपुरी असल्याचे आणि पुतीन यांनी आपल्यावर विषप्रयोग करून आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप नवालनी यांनी केले आहेत.

रशियामध्ये परतल्यानंतर नवालनी यांनी एक यूट्यूब व्हीडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी भव्य ब्लॅक सी महाल दाखवत रशियातल्या एका गर्भश्रीमंती व्यक्तीने हा महाल राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेट दिल्याचा आरोप केला होता. हा व्हीडिओ तब्बल 10 कोटी लोकांनी बघितला.

मात्र, पुतीन यांनी आपण या महालाचे मालक नसल्याचं म्हटलं आहे. गेल्याच आठवड्यात पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अब्जाधीश उद्योगपती आर्काडी रोटनबर्ग यांनी दोन वर्षांपूर्वी हा महाल आपण विकत घेतल्याचा दावा केला होता.

दरम्यान, 12 फेब्रुवारी रोजी नवालनी यांना दुसऱ्या महायुद्धातील सैन्यनायकांचा अवमान केल्याप्रकरणात न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)