कॅण्डिडा ऑरिस बुरशी काय आहे? या बुरशीचा संसर्ग घातक का ठरू शकतो?

कॅण्डिडा ऑरिस बुरशी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

कोरोना व्हायरसवरची लस आली, आता लवकरच साथ आटोक्यात येईल असं वाटून आता कुठे आपण सुस्कारा टाकत असतानाच कोरोनापेक्षाही भयंकर ठरू शकणाऱ्या काही सूक्ष्मजीवांबद्दलचं संशोधन प्रसिद्ध झालंय.

निपाह व्हायरस, स्वाईन फ्लू ज्यामुळे होतो, तो H1N1 आणि कॅण्डिडा ऑरिस नावाची बुरशी हे तीन सूक्ष्मजीव पुढच्या जागतिक साथीसाठी कारणीभूत ठरू शकतात, असा इशारा देण्यात आलाय.

कॅण्डिडा ऑरिस काय आहे?

निपाह व्हायरस, स्वाईन फ्लू ही नावं आपण ऐकलेली आहेत. कारण या साथी यापूर्वी येऊन गेलेल्या आहेत. पण कॅण्डिडा ऑरिस हे नाव कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजेच CDCने याविषयीची माहिती प्रसिद्ध केलीय.

कॅण्डिडा ऑरिस ही एक प्रकारची बुरशी आहे ज्यामुळे गंभीर इन्फेक्शन होऊ शकतं. हे कॅण्डिडा यीस्ट बहुतेकदा आपल्या त्वचेवर असतं पण त्यामुळे काही अपाय होत नाही. पण आपण दीर्घकाळासाठी आजारी पडलो, किंवा या बुरशीचा चुकीच्या ठिकाणी शिरकाव झाला तर ही बुरशी रक्तातून पसरते त्यामुळे हे इन्फेक्शन झपाट्याने शरीरभर पसरू शकतं.

2009मध्ये जपानमध्ये या कॅण्डिडा ऑरिसचा रुग्ण पहिल्यांदा आढळला होता. पण आता जगातल्या 30 पेक्षा जास्त देशांमध्ये या संसर्गाचे रुग्ण आढळल्याने या बुरशीला - Emerging Pathogen म्हणजे रोगासाठी कारणीभूत ठरणारा सूक्ष्मजीव म्हटलं गेलंय.

कॅंडिडा

फोटो स्रोत, Getty Images

ही बुरशी नेहमीच्या बहुतांश औषधांना दाद देत नसल्याने या संसर्गावर उपचार करणं तुलनेने कठीण आहे. शिवाय हा संसर्ग ओळखणं कठीण असल्याने चुकीचे उपचार दिले जाण्याचीही यात शक्यता असते.

मुंबईतल्या फोर्टिस हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर डायरेक्टर डॉ. राहुल पंडित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "कॅण्डिडा ऑरिस ही बाकीच्या फंगल इन्फेक्शन्सपेक्षा थोडी वेगळी आहे. प्रामुख्याने ती रक्तामध्ये येऊ शकते किंवा एखाद्या दुसऱ्या अवयवांत उदाहरणार्थ फुफुस्सं, यकृत किंवा किडनीमध्येही येऊ शकते. मुख्यतः यात घाबरण्याची गोष्ट म्हणजे यातला मृत्यूदर जवळपास 50 टक्के आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर हे झालं तर ती व्यक्ती जगणार नाही याची शक्यता 50 टक्के असते."

कॅण्डिडा ऑरिसचा संसर्ग कोणाला होऊ शकतो?

डॉ. राहुल पंडित सांगतात, "सामान्य व्यक्तीने घाबरण्याची गरज नाही, कारण ही बुरशी प्रामुख्याने ICUमध्ये, हॉस्पिटल्समध्ये आढळते. ज्यांना रोग प्रतिकार शक्ती कमी आहे, त्या लोकांमध्ये ही जास्त आढळते. भारतामध्ये देखील केसेस रिपोर्ट झालेल्या आहेत. परंतु घाबरण्याची गरज नाही की कोव्हिड 19 सारखं पँडेमिक करेल. पण हॉस्पिटल्समध्ये इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल कडक झाले पाहिजेत."

कॅण्डिडा ऑरिस बुरशी

फोटो स्रोत, Getty Images

या कॅण्डिडा ऑरिसमुळे जखमांमध्ये इन्फेक्शन होणं, कानात इन्फेक्शन होऊ शकतं. जे लोक दीर्घकाळ हॉस्पिटलमध्ये आहेत, किंवा ज्यांना श्वसनासाठी किंवा अन्न देण्यासाठी ट्यूब लावलेली आहे, युरीन कॅथेटर लावलेली आहे अशांना कॅण्डिडा ऑरिसचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे.

हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे किंवा हॉस्पिटलमध्ये ही बुरशी असणाऱ्या पृष्ठभागाला वा उपकरणाला स्पर्श केल्याने पसरू शकतो.

डॉ. पंडित सांगतात, "कॅण्डिडा ऑरिसचा एखादा पेशंट आढळला, तर त्याबद्दल योग्य दक्षता घेऊन त्या पेशंटपुरतं त्या कॅण्डिडाला आपण नियमित ठेवलं पाहिजे. नाहीतर पसरलं तर आयसीयूमध्ये बरेचसे असे पेशंट असतात ज्यांना इन्फेक्शन व्हायची भीती असते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)