अलेक्सी नवालनी : रशियात पुन्हा आंदोलनं, 500 जणांना अटक

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

नवालनी यांना ताब्यात घेतल्यानंतर रशियामध्ये लाखो लोक निदर्शनं करत आहेत. अनेक निदर्शकांवर पोलिसांनी लाठीमारही केला आहे. आज रविवारी होत असलेल्या आंदोलनात 500 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

गेल्या आठवड्यात 3000 लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

दहा हजारांहून अधिक लोकांनी सुरक्षा दलांच्या उपस्थितीत आंदोलनात सहभाग घेतल्याचे वृत्त आहे. अलीकडच्या काही वर्षांत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरुद्धचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे सांगितले जात आहे.

मॉस्कोतील पोलीस आंदोलनकर्त्यांना मारताना आणि ओढून नेताना दिसून येत होते. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे विरोधक नवालनी यांना 17 जानेवारीला अटक करण्यात आली. आपल्या अटकेनंतर समर्थकांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

साथीदार अटकेत

पूर्वेच्या खाबारोवस्क परिसरात आंदोलनांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. स्थानिकांना घरीच राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

नवालनी यांच्या जवळील साथीदारांना शनिवारी (23 जानेवारी) आंदोलनापूर्वीच अटक करण्यात आली. त्यांचे वकील आणि प्रवक्ते यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

नवालनी हे व्लादिमीर पुतीन यांचे सर्वात हाय-प्रोफाईल टीकाकार आहेत. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी समाज माध्यमांवरही जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. विरोध आणि आंदोलन करण्यासाठी ते आवाहन करत आहेत. यानंतर रशियातील जवळपास 60 शहरांमध्ये आंदोलन होण्याची शक्यता आहे.

ते बर्लिनहून मॉस्कोला आले असता त्यांना अटक करण्यात आली. मॉस्कोला पोहचताच नवालनी यांना अटक करण्यात आली आणि पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आलं. आपला आवाज बंद करण्यासाठी अशाप्रकारे कारवाई करण्यात येत असल्याचे नवालनी यांचे म्हणणे आहे आणि यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांना याविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

आतापर्यंत काय घडलं?

रशियाच्या फार ईस्टला शनिवारी (23 जानेवारी) आंदोलन करण्यात आले. पण या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांबाबत विरोधाभास असणाऱ्या बातम्या येत आहेत.

बातमी देणारे स्वतंत्र माध्यम सोटाने सांगितले, "व्लाडीवोस्टकमध्ये कमीत कमी 3 हजार लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. पण स्थानिक प्रशासनाने 500 लोकांनी सहभाग घेतल्याचे सांगितले आहे."

रॉयटर्सनुसार, एका व्हीडिओमध्ये दंगल रोखणारे पोलीस दल आंदोलनकर्त्यांच्या मागे धावताना दिसत आहे. दुसऱ्याबाजूला सायबेरियातील शहर याकुटस्क मध्ये उणे 50 डिग्री सेल्सिअस एवढ्या थंडीतही लोक रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत.

पोलिसांनी देशभरातून आतापर्यंत 48 लोकांना ताब्यात घेतले आहे. यामधील 13 लोक खाबरोवस्कमधून ताब्यात घेतले आहेत अशी माहिती ओवीडी इंफो या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे.

संपूर्ण देशात 60 हून अधिक शहरांमध्ये अनधिकृत रॅली काढण्याचे नियोजन केले गेले आहे. पोलिसांनी स्क्वेअरच्या चारही बाजूंनी शेकडो मेटल बॅरिकेट्स लावले.अनधिकृत निदर्शने आणि उत्तेजक घडामोडी तात्काळ थांबवल्या जातील असे पोलिसांनी सांगितले.

रशियाच्या शिक्षण मंत्रालयाकडून पालकांनी आपल्या मुलांना आंदोलनात सहभाही होण्याची परवानगी देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

नवालनी यांना अटक का?

रशियन अधिकाऱ्यांनी नवालनी यांना डिसेंबरमध्ये हजर व्हायला सांगितलं होतं, मात्र त्यांनी या सूचनेकडे लक्ष दिलं नाही. कारण हजर झालो, तर अटक होऊ अशी भीती त्यांना होती.

नवालनी यांना एका फसवणुकीच्या प्रकरणी दोषी ठरविण्यात आलं आहे आणि जेल सर्व्हिसच्या मते नवालनी यांनी त्यांच्यावरील निर्बंधांचं उल्लंघन केलं आहे. आपल्यावरील सर्व खटले हे राजकीय विरोधातून दाखल केल्याचं नवालनी यांचं म्हणणं आहे. रशियन तपास समितीनं त्यांच्याविरोधात फसवणुकीच्या प्रकरणी नवीन फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यांच्यावर अनेक एनजीओंना पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यामध्ये नवालनी यांच्या अँटी करप्शन फाउंडेशनचा समावेश आहे.

हे सर्व पुतिन घडवून आणत असल्याचं नवालनी यांचा दावा आहे. बर्लिन एअरपोर्टवर जगातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवालनी यांना मॉस्कोला जाताना कव्हर करण्याच्या उद्देशाने ते उपस्थित राहिले होते. मात्र रशियन फेडरल टीव्ही चॅनेल आणि वृत्त संस्थांनी त्यांच्या येण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं.

नवालनी यांच्यासोबत काय घडलं होतं?

रशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अलेक्सी नवालनी यांना हॉटेलमधील पाण्याच्या बाटलीतून विष देण्यात आल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे. विमानप्रवास करण्याआधी नवालनी हे एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथेच पाण्याच्या बाटलीतून विष दिल्याचा दावा करण्यात येत आहे.

नवालनी यांना विमानतळावर विष दिल्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली आहे. "आता आम्हाला लक्षात आलंय की, विमानतळावर येण्यासाठी जिथे थांबले होते, तिथेच विषप्रयोग झाला होता," असं नवालनी यांच्या सहकाऱ्याने इन्स्टाग्रामवरील व्हीडिओ पोस्टमधून म्हटलंय.

ऑगस्ट महिन्यात रशियातील सायबेरिया प्रांतात हवाई प्रवासादरम्यान अॅलेक्सी नवालनी अचानक आजारी पडले. त्यानंतर त्यांना विमानानं बर्लिनमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं.

अलेक्सी नवालनी यांना 'नोविचोक नर्व्ह एजंट'द्वारे विष देण्यात आल्याचा दावा जर्मन सरकारनं केला होता.

कोण आहेत नवालनी?

अॅलेक्सी नवालनी रशियातील भ्रष्टाचारविरोधी पक्षाचे सुप्रसिद्ध कार्यकर्ते आहेत.

ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कडवे विरोधक मानले जातात. पुतिन सरकारवर टीका करतानाचे, सरकारला जाब विचारातानाचे त्यांचे व्हीडिओ दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत. रशिया सरकारसाठी ते सलणाऱ्या काट्याप्रमाणे आहेत.

नवालनी यांना टॉम्स्क विमानतळावर 20 ऑगस्ट रोजी चहामधून विष देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विमान प्रवासादरम्यानच ते बेशुद्ध होऊन खाली पडले. त्यानंतर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. दोन दिवसांनी नावालनी यांना उपचारासाठी जर्मनीला हलवण्यात आलं.

2018 मध्ये इंग्लंडमध्येही अशाच प्रकारे नोव्हिचोक ग्रुपमधील नर्व्ह एजंट रसायनाचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांच्या मुलीवर इंग्लंडच्या सॅल्सबरी भागात विषप्रयोग करण्यात आला. त्यामध्ये दोघे सुखरूप वाचले पण तिसरीच एक महिला विषाच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यूमुखी पडली होती.

हे प्रकरण जगभरात प्रचंड गाजलं. याप्रकरणी ब्रिटनने रशियावर विषप्रयोगाचा आरोप केला होता. पण रशियाने ते आरोप साफ फेटाळून लावले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)