You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंडोनेशिया विमान अपघात : दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स सापडला, पण विमानसेवेवर उपस्थित होत आहेत प्रश्न
इंडोनेशियातील दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स शोधण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, समुद्रात विमानाचा ब्लॅकबॉक्स कुठे आहे, याचं निश्चित ठिकाण सापडलं आहे.
सोमवारी शोधकार्य पुन्हा सुरू झाल्यानंतर समुद्रात असलेले ब्लॅकबॉक्स बाहेर काढण्यात येतील. ब्लॅकबॉक्सच्या तपासणीनंतर, बोईंग विमान कोणत्या कारणामुळे क्रॅश झालं याची माहिती समोर येईल.
इंडोनेशियाच्या नॅशनल ट्रास्पोर्टेशन सेफ्टी कमिटीचे प्रमुख सोर्जेंटो तजाहोनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, "विमानाचे दोन्ही ब्लॅकबॉक्स कुठे आहेत याचं ठिकाण सापडलं आहे. आता नेव्हीचे अधिकारी हे फ्लाईट डाटा रेकॉर्डर शोधण्याचा प्रयत्न करतील. आम्हाला आशा आहे की ब्लॅकबॉक्स शोधण्यासाठी फार वेळ लागणार नाही."
विमान दुर्घटनेनंतरच्या शोध मोहिमेत विमानाचे अवशेष, मृत व्यक्तींच्या शरीराचे अवशेष आणि प्रवाशांच्या वस्तू शोधपथकाला सापडल्या आहेत.
जकार्ता पोलिसांचे प्रवक्ते यूसरी यूनुस सांगतात, "शोध मोहिमेदरम्यान बचाव पथकाला दोन बॅग मिळाल्या आहेत."
ते पुढे सांगतात, "पहिल्या बॅगेत विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं सामान आणि दुसऱ्या बॅगेत मृत प्रवाशांचे अवशेष आढळून आले आहेत. पोलीस याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत."
विमान दुर्घटनेत सापडलेल्या मृत व्यक्तींच्या अवशेषांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कुटुंबीयांना डीएनए सॅम्पल आणि दातांचे नमुने देण्याची विनंती केली आहे.
शनिवारी स्रिविजया एअरवेजचं 62 प्रवाशांना घेऊन जाणारं बोईंग 737 विमान अचानक गायब झालं होतं.
नक्की काय झालं?
स्रिविजया एअरवेजच्या 62 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाने दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी जकार्ता एअरपोर्टवरून टेक-ऑफ केलं.
इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी या विमानाशी शेवटचा संपर्क करण्यात आला होता.
बोर्नियो बेटांच्या पश्चिमेकडे असलेल्या पोंतिअनकला जाण्यासाठी साधारणतः 90 मिनिटं लागतात.
इंडोनेशियाच्या नॅशनल सर्च अॅंड रेस्क्यू एजेंसीचे प्रमुख एअर मार्शल बैगस पुरूहितो सांगतात, 'विमानाने कोणताही आपात्कालीन संदेश पाठवला नव्हता.'
फ्लाइट ट्रॅकिंग करणाऱ्या एका वेबसाइटच्या माहितीनुसार, एका मिनिटापेक्षा कमी वेळेत विमान 10 हजार फूट खाली आलं होतं.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्यांनी एक स्फोट झालेला पाहिला आणि ऐकला होता.
बीबीसी इंडोनेशियाशी बोलताना स्थानिक मच्छीमार सोलिहिन सांगतात, "त्यांनी एक दुर्घटना पाहिली आणि कॅप्टनने पुन्हा बंदरावर जाण्याचा निर्णय घेतला."
ते पुढे सांगतात, "विमान समुद्रात विजेच्या वेगाने पडलं. पाण्यात पडताच विमानात स्फोट झाला. ही दुर्घटना आमच्या फार जवळ घडली. लाकडाची एक वस्तू आमच्या बोटीवर आदळली होती."
जवळच असलेल्या बेटावरील रहिवासी बीबीसीशी बोलताना सांगतात, आम्हाला काही वस्तू मिळाल्या आहेत. बहुदा या वस्तू विमानातील प्रवाशांच्या आहेत.
विमानात प्रवासी कोण होते?
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 50 प्रवाशी होते. यात सात लहान मुलं, 3 नवजात अर्भकं, विमानातील 12 कर्मचारी होते. या विमानाची प्रवासी क्षमता 130 असल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवाशी इंडोनेशियाचे नागरीक होते. त्यांचे कुटुंबीय पोंतिअनक आणि जकार्ता एअरपोर्टवर गोळा झाले आहेत.
यामन जाईंना अश्रू अनावर होत आहेत. ते पत्रकारांशी बोलताना म्हणतात, "विमानात माझे चार कुटुंबीय प्रवास करत होते. माझी पत्नी आणि तीन मुलं. पत्नीने मला फोटो पाठवला होता. माझं जीवन उध्वस्त झालंय."
विमानाबद्दलची माहिती
रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांवरून मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग 737-500 विमान 26 वर्षं जुनं होतं. स्रिविजया एअरवेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफर्सन इरविन जौवेना यांच्या माहितीनुसार, विमान प्रवासासाठी सुस्थितीत होतं.
ते पुढे सांगतात, 'पावसामुळे विमान उड्डाणात 30 मिनिटांचा उशीर झाला."
स्रिविजया एअरवेज 2003 मध्ये अस्तित्वात आली. ही इंडोनेशियातील लो-कॉस्ट एअरलाइन आहे.
इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून 20 किलोमीटर उत्तरेला या विमानाचा संपर्क तुटला. याच ठिकाणी 2018 मध्ये विमान दुर्घटना घडली होती. लायन एअरचं विमान उड्डाणानंतर 12 मिनिटात कोसळलं होतं. या दुर्घटनेत 189 लोकांचा मृत्यू झाला होता.
विमानाच्या डिझाईनमुळे दुर्घटना घडल्याचं चौकशीत सांगण्यात आलं होतं. पण नंतर पायलटची चूक समोर आली होती. या विमान दुर्घटनेमुळे बोईंग 737 मॅक्स विमानांवर उड्डाणाला बंदी घालण्यात आली होती.
त्यानंतर चौकशी आणि डिझाईनमध्ये बदल केल्यानंतर डिसेंबरमध्ये विमानाला उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली.
जकार्तामध्ये उपस्थित असलेले बीबीसी रिपोर्टर जेरोम विरावन यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लायन एअर विमान दुर्घटनेनंतर इंडोनेशियातील एअरलाइन इंडस्ट्रीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)