इंडोनेशिया : विमान कोसळल्याचं ठिकाण सापडलं - नौदल

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

जकार्ता इथून उड्डाणानंतर बेपत्ता झालेल्या विमानाचं ठिकाण सापडल्याचा दावा इंडोनेशियाच्या प्रशासनाने केला आहे.

श्रीविजया एयर बोइंग 737चा जकार्ताच्या कलिमनतन प्रांतातल्या रस्त्यात संपर्क तुटला. त्यानंतर विमान बेपत्ता झालं होतं. या विमानात 62 प्रवासी होते.

नौदलातील चालक असलेल्या 10 हून अधिक बोटी विमान कोसळल्याच्या ठिकाणाकडे रवाना झाल्या आहेत.

परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानाचा शोध घेण्यासाठी बचावपथकांना सक्रिय करण्यात आलं आहे.

मात्र, शोधकार्य रात्री अंधारामुळे थांबवण्यात आले होते. मात्र, पहाटेपासून पुन्हा शोधकार्यास सुरुवात करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

श्रीविजया एअर हे प्रवासी विमानानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील विमानतळावरून शनिवारी (9 जानेवारी) स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी उड्डाण घेतलं.

काही मिनिटांनंतर म्हणजे 2 वाजून 40 मिनिटांनी या विमानाशी शेवटचा संपर्क झाला होता. SJY182 असा कॉल साईन होता, अशी माहिती परिवहन मंत्रालयानं दिली.

या विमानातून कुठल्याही संकाटाचा सिग्नल पाठवण्यात आला नव्हता, अशी माहिती इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोधकार्य आणि बचावकार्य यंत्रणेचे प्रमुख एअर मार्शल बगस पुरुहितो यांनी दिली.

फ्लाइट ट्रैकिंग वेबसाइट फ्लाइटरडार 24 डॉट कॉमनुसार, हे विमान एका मिनिटापेक्षा कमी वेळात 10 हजार फूट खाली आलं.

एका प्रत्यक्षदर्शीनं एका मोठा आवाज ऐकल्याचं सांगितलं. सोलिहिन नावाच्या एका मच्छीमारानं बीबीसीच्या इंडोनेशियन सर्व्हिसशी बोलताना म्हटलं की, त्यांनी हा अपघात होताना पाहिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कॅप्टनसोबत बेटावर परतण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी म्हटलं, "विमान विजेच्या वेगानं समुद्रात कोसळलं आणि मोठा आवाज झाला. आम्ही जवळच होतो. काही तुकडे आमच्या जहाजावरही येऊन आदळले."

जकार्तामधील बीबीसी प्रतिनिधी जेरोमी विरावान यांच म्हणणं आहे की, विमान अपघाताची ही घटना इंडोनेशियासमोर काही प्रश्नं उपस्थित करणारी आहे. या देशाची एअरलाइन इंडस्ट्री 2018 मधील भीषण विमान अपघातानंतर अतिशय कठोर अशा समीक्षेला सामोरी जात आहे.

नॅशनल सर्च अँड रेस्क्यू एजन्सीचे एक अधिकारी बामबैंग सुरयो अजी यांनी म्हटलं, "आम्ही अपघाताचं अचूक स्थान शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आज रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागेल, अशी आम्हाला आशा आहे. समुद्राची खोली जवळपास 20-23 मीटर आहे."

'26 वर्षं जुनं होतं विमान'

बीबीसीचे प्रतिनिधी थियो लेगेट यांच्या मते इंडोनेशियातील अनेक विमानं खूप जुनी झाली आहेत.

शनिवारी बेपत्ता झालेलं विमान 26 वर्षं जुनं होतं. सुरक्षित विमान उड्डाणांबाबत इंडोनेशियाचा इतिहास फारसा चांगला नाहीये. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात बनलेली अनेक विमानं इंडोनेशियात अजूनही वापरली जातात.

इंडोनेशियामध्ये याआधीही दोन मोठे विमान अपघात झाले होते, ज्यामध्ये 737 मॅक्स बोइंग विमानं दुर्घटनाग्रस्त झाली होती.

शनिवारी (9 जानेवारी) जकार्ताहून टेक ऑफ केलेलं विमान 737 मॅक्स श्रेणीतलं नाहीये.

ऑक्टोबर 2018 मध्ये इंडोनेशियातील लायन एअरच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात 189 लोक मृत्यूमुखी पडले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)