You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेत जे घडलं त्याची तुलना 'तिसऱ्या जगा'शी करणं किती योग्य?
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, वॉशिंग्टन डीसीहून
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेची इमारत असलेल्या कॅपिटल हिलवर हल्ला करण्याच्या घटनेकडे अनेकजण 'Third World' म्हणजेच तिसऱ्या जगातील घटनेप्रमाणे पाहत आहेत.
एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "ट्रंप यांचं वागणं तिसऱ्या जगाप्रमाणे/कम्युनिस्ट हुकूमशहासारखे आहे. मतमोजणी पूर्ण होण्याआधीच त्यांनी स्वतःला विजयी घोषित केलं होतं."
राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी निवडुकीतला पराभव सहजासहजी मान्य केला नव्हता. यावरून त्यांच्यावर बरीच टीका होतेय.
निवडणुकीत घोटाळा झाल्याचं ट्रंप समर्थकांपैकी अनेकांना वाटतं. त्यांना त्यांच्या नेत्याच्या निराधार वक्तव्यांवर पूर्ण विश्वास होता.
बुधवारी (6 जानेवारी) घडलेली घटना अमेरिकेचं राजकीय आणि वैचारिक विभाजन अधोरेखित करते. अराजकतेच्या या दृश्याने नाचक्की आणि स्वतःकडे बघायला लावलं.
तिसरं जग म्हटलं की ज्या ठिकाणी विद्यमान संस्था उद्ध्वस्त करून अराजक शासन व्यवस्था उभी राहिली, असं काहीसं चित्र उभं राहतं.
फ्लोरिडाचे खासदार मार्क रुबियो आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, "कॅपिटल हिलवर जे घडतंय त्यात राष्ट्रभक्तीसारखं काहीच नाही. ही तिसऱ्या जगातली अमेरिकाविरोधी अराजकता आहे."
या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
मात्र, तिसरं जग खरंच इतकं वाईट आहे का?
घटनेच्या दृश्यांवर लेखक आतिश तासीर म्हणाले, "तिसऱ्या जगातही हे घडणार नाही."
ते म्हणतात, "मी पाकिस्तानात अशा निवडणुकाही बघितल्या आहेत जिथे लोकांना ठार करण्यात आलं, निवडणुकीत प्रचंड घोटाळे झाले, गोळीबारही झाला… मात्र, ही घटना वेगळी आहे."
श्रृती राजगोपालन यांनी मार्को रुबियो यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, "मी तिसऱ्या जगातच लहानाची मोठी झाले आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही निवडणुकीनंतर अशापद्धतीने सत्ता हस्तांतरण करत नाही."
एकजण विचारतो, "तिसऱ्या जगाचा एक प्रॉडक्ट या नात्याने मी अभिमानाने सांगू इच्छितो की कृपया, असं काही म्हणू नका."
शीतयुद्धानंतर नाटो किंवा सोव्हिएत युनियन यापैकी कुणाच्याही बाजूने जे नव्हते त्यांना 'थर्ड वर्ल्ड' म्हणजेच तिसरं जग म्हणण्यात आलं. मात्र, आता हा शब्द व्यापक अर्थाने विकसनशील किंवा अल्प किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसाठी वापरला जातो.
'तिसरं जग' या शब्दाचा वापर जगातल्या काही देशांना सभ्य पाश्चिमात्य राष्ट्रांच्या सरकारच्या तुलनेने जास्त अराजक आणि बंडखोरीची शक्यता अधिक असणारे देश, हे सांगण्यासाठीही केला जातो.
मात्र, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्यांच्या स्वतःच्या रक्तरंजित इतिहासाकडे बघायला नको का?
'यरुशलेम पोस्ट'चे संपादक सेथ फ्रेंट्जमॅन लिहितात, "वॉशिंग्टनमध्ये जी अराजकता दिसली 100 वर्षांपूर्वीपर्यंत बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये अशाचप्रकारची अराजकता आणि बंडखोरीचे प्रयत्न होत होते."
ते पुढे लिहितात, "1920 आणि 1930 च्या दशकात अराजकतेने युरोपला विश्वयुद्ध आणि होलोकास्टकडे नेलं. त्याचप्रमाणे 1920 आणि 1930 च्या दशकात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि कट्टरतावाद होता."
"महिलांना 1971 साली स्वित्झर्लंडमध्ये मतदानाचा अधिकार मिळाला. स्पेनमध्ये 1978 साली लोकशाहीची स्थापना झाली आणि ग्रीक कर्नलांनी 1974 सालापर्यंत देशाचं नेतृत्त्व केलं. आर्यलँडच्या उत्तर भागात सुरू असलेला राजकीय हिंसाचार 1990 च्या दशकात संपुष्टात आला आणि पूर्व युरोपात 1990 च्या दशकातच लोकशाही प्रस्थापित झाली."
"अमेरिकेतल्या अराजकतेला तिसऱ्या जगातली म्हणणं खूप सोपं आहे. गेल्या काही वर्षात जे मुद्दे समोर आले ते अमेरिकी जनतेच्या मनातले आहेत. कदाचित त्यातले काही मुद्दे 'हृदयभूमीतील' आहेत म्हणून किंवा मग न्यूयॉर्क शहरातल्या एका प्रॉपर्टी मालकापासून शोमॅन बनलेल्या एका व्यक्तीमुळे. अशी व्यक्ती जी राष्ट्राध्यक्षाची भूमिका गॉडफादर चित्रपटाप्रमाणे निभावत होता."
अमेरिकासुद्धा एक असं राष्ट्र आहे जो मानवाधिकार, व्यापार शक्ती आणि लोकशाहीच्या मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी उपदेश देत असतो. मात्र, जॉर्ज फ्लॉईड, ब्रेओना टेलर आणि तशाच इतर हत्यांवरून 'ब्लॅक लाईव्ह मॅटर' चळवळ सुरू करणाऱ्या निदर्शकांविरोधात बळाचा वापर केल्याने अमेरिकेच्या पोलीस खात्यावरही बरीच टीका झाली होती.
अमेरिकी पोलिसांच्या हातून दरवर्षी शेकडो नागरिक मारले जातात. मात्र, काही मोजक्या प्रकरणांमध्येच पोलीस अधिकाऱ्याला कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतं.
2019 साली एका कृष्णवर्णीय महिलेला तिथल्या पोलिसांनी तिच्या बेडरुमच्या खिडकीतून गोळी झाडत ठार केलं होतं. गेल्यावर्षी पोलिसांनी एका कृष्णवर्णीय व्यक्तीला गोळी घालून ठार केलं आणि एका घरगुती प्रकरणाला प्रत्युत्तर देताना ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या घटनांची कॅपिटल हिलच्या घटनेशी तुलना केली तर तिथे बहुतांश श्वेतवर्णीय नागरिकांनी पोलिसांन धक्काबुक्की केली. कॅपिटल हिल इमारतीच्या आतल्या भागात तोडफोड केली. भिंतीवर चढले, खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि संसदेच्या आतही घुसले.
तासीर म्हणतात, "इतका गंभीर गुन्हा करूनही त्यांना दुसऱ्या समाजाला (कृष्णवर्णियांना) ज्यापद्धतीची वागणूक दिली जाते तशी दिली गेली नाही."
घटनेच्या दुसऱ्या दिवशी मी कॅपिटल हिलबाहेर जेसी जेम्स यांना भेटलो. त्यांनी अंगावर ट्रंप यांचं समर्थन करणारं बॅनर घातलं होतं. आदल्या दिवशी कॅपिटल हिलवर हल्ला चढवणाऱ्या जमावात ते होते.
मात्र, आपण कुठल्याच हिंसाचारात सहभाग घेतला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
ते म्हणाले, "लोक फक्त फिरत होते. आम्हाला वाटलं आम्ही पायऱ्यांवर उभं राहू शकतो. त्यामुळे अनेकजण पायऱ्यांवर उभे होते. कुणीच आम्हाला खाली उतरायला सांगितलं नाही."
"आम्ही तिथेच होतो, असं नॅशनल गार्डचं म्हणणं आहे. पण, मला ते कुठेच दिसले नाही. कदाचित ते असतीलही. पण मी बघितलं नाही."
कार्यकर्त्यांच्या मते पोलीस दुटप्पीपणे वागत आहेत आणि तिसऱ्या जगाचं याकडे लक्ष आहेत.
रिपब्लिकन शहाब करनी म्हणाले, "एखाद्या आफ्रिकी-अमेरिकन नागरिकाने कॅपिटल हिलची एक काच जरी फोडली असती तर पोलीस आणि नॅशनल गार्डने कशी प्रतिक्रिया दिली असती, याचा तुम्हीच विचार करा. वॉशिंग्टन डी. सी. पेटताना दिसलं असतं."
ते म्हणाले, "सध्या जी कारवाई करण्यात आलेली आहे ते ढोंग आहे. असं वाटतंय जणू अमेरिका दोन भागात विभागली गेली आहे आणि मध्ये एक रेष ओढण्यात आली आहे."
ही घटना शहराची प्रतिमा अधोरेखित करेल का, असा प्रश्न रानिया अबुजिद यांनी नॅशनल जिओग्राफिकच्या एका लेखात उपस्थित केला आहे.
त्या लिहितात, "बगदाद, बैरूत, बोगोटा यासारखी शहरं सहसा त्यांच्या वाईट प्रतिमेमुळे लक्षात राहतात. वॉशिंग्टन डीसीलाही त्याच शहरांच्या यादीत टाकावं का?"
"या घटनेनंतर काही श्वेतवर्णियांनी केलेल्या हिंसाचारामुळे अमेरिकेतल्या सर्वच श्वेतवर्णियांना दंगलखोर म्हणायचं का आणि त्यांच्या वर्णाच्या लोकांनी केलेल्या गुन्ह्यासाठी इतरांनी माफी मागावी का?"
कॅपिटल हिलची घटना कितीही वाईट असली तरी आतिश तासीर यांना यातही आशेचा किरण दिसतो. एक राष्ट्राध्यक्ष स्वतःचा पक्ष आणि उपाध्यक्षांवर निवडणुकीचे निकाल रद्द करण्यासाठी दबाव टाकत असतानाही व्यवस्था टिकून होती, हे आशादायी चित्र असल्याचं तासीर म्हणतात.
ते म्हणाले, "यातून एकच संदेश मिळतो - संस्था… संस्थाा… संस्था…"
हडसन इंस्टिट्युटच्या अपर्णा पांडे म्हणतात, "सर्वच ठिकाणी लोकशाही नाजूक आहे."
"बेंजामिन फ्रँकलिन यांना एकदा विचारण्यात आलं होतं की अमेरिका काय आहे. त्यावर त्यांचं उत्तर होतं, एक लोकशाही - जर तुम्ही ती टिकवून ठेवली तर..."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)