लष्कर कमांडर जकी-उर-रहमानला पाकिस्ताननं अचानक अटक का केली?

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई येथे 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी-उर-रहमान-लखवी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. याबाबतचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.
पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाने लखवीला दहशतवादाला पैसे पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
येत्या काही आठवड्यातच FATF ची पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवावं की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जकी-उर-रहमान लखवी याला अटक करण्यात आली आहे.
फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATF ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेचा प्रमुख उद्देश आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी धोरण निश्चित करणं हा असतो.
वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ल्यानंतर कट्टरतावादाला होणारा पैशांचा पुरवठा रोखण्यासाठीचा उद्देशही यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रवक्त्यांनी लखवीच्या अटकेबाबत अधिक माहिती दिली.
लखवीवर एक औषधालयाच्या माध्यमातून दहशतवादासाठी पैसा जमा करण्याचा आरोप आहे. त्याने औषधालयातून निधी गोळा करून त्याचा वापर दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्यासाठी तसंच खासगी उपयोगासाठीही केला.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) लखवीला प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत टाकलेलं आहे. त्यामुळे विना-परवानगी तो कोणत्याही निधीचा वापर करू शकत नाही, असंही प्रवक्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
या प्रकरणाची सुनावणी लाहोरच्या दहशतवादविरोधी कोर्टात केली जाणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
'द हिंदू'ने दिलेल्या एका बातमीनुसार, भारतीय अधिकाऱ्यांनी या कारवाईच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. FATF बैठकीच्या समोर दहशतवादी चेहऱ्यांना फक्त दाखवण्यासाठी अटक केली जाते. हे आता नेहमीचंच झालं आहे, असं भारताने म्हटलं.
एप्रिल 2015 मध्ये मुंबई हल्ल्याचा कथित मास्टरमाईंड जकी-उर-रहमान लखवी याला अडियाला तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. त्यावेळी लाहोर हायकोर्टाने लखवीची नजरकैद संपवली. लखवीला 10 लाखांच्या दोन जातमुचलक्यांवर मुक्त करण्याचे आदेश त्यावेळी कोर्टाने दिले होते.
लखवी हाच 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं भारताचं म्हणणं आहे. या हल्ल्यानंतर 7 डिसेंबर 2008 ला लखवीला पाकिस्तानात अटकही झाली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)
























