You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नायजर : संदिग्ध कट्टरपंथीय हल्ल्यात 79 लोकांचा मृत्यू
नायजरमध्ये संदिग्ध इस्लामी कट्टरपंथियांनी केलेल्या हल्ल्यात 79 जण मृत्यूमुखी पडल्याची बातमी आहे. मालीच्या सीमेजवळील एका गावात कट्टरपंथीयांनी हा हल्ला केला.
या हल्ल्यात 20 लोक जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना टिल्लाबेरी भागातील चोमोबांगोऊ नावाच्या गावात हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या भागात 2017 पासून आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यात या भागात शेजारी देश मालीमधून आलेल्या संदिग्ध कट्टरपंथियांकडून अनेक हल्ले झाले आहेत.
एएफपी या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, दोन गावांवर हल्ला झाला असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या किमान 70 असू शकते.
एएफपीच्या वृत्तानुसार जारोमदारेय नावाच्या गावावरही हल्ला झाला असून अनेक लोक मृत्यूमुखी पडलेले असू शकतात.
या हल्ल्यांवर अजूनपर्यंत नीजेर सरकारनं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
पश्चिम आफ्रिकेतील देश नीजेरमध्ये अल् कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित कट्टरपंथीयांनी यापूर्वीही हल्ले केले आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या हल्यात शेकडो लोक मारले गेले होते.
नीजेरचा शेजारी देश असलेल्या नायजेरियामध्ये सक्रीय असलेल्या बोको हराम या कट्टरपंथीय संघटनेनं आग्नेय भागातील दीफा इथं हल्ला करून 27 लोकांची हत्या केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)